आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:17 वर्षांच्या सेवेत खंड, स्टॉलधारक अडचणीत; कवडी पाटचे विजय चांदणे 20 वर्षांपासून करत आहेत फुलाची शेती

रमेश पवार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाज्या गोळा करून किमान कुुटुंबाचे पोट तरी भरता आले

कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक बरोबर गर्दी ठिकाणे, सर्व मंदिरे बंद ठेवली आहेत. त्यामुळे पूजेच्या फुलांची मागणी घटली आहे. मंदिर परिसरातील पूजेचे साहित्य विकणारे स्टॉलधारक अडचणीत आहेत. फुलांच्या शेतीवर झालेला खर्च, कर्मचाऱ्यांची मजुरी निघावी यासाठी कवडी पाटचे शेतकरी विजय चांदणे यांचा संघर्ष सुरू आहे. २० वर्षांपासून फुलांची शेती करीत असून बाजारात आवाक-जावक थांबली आहे. हडपसरपासून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर कवडी पाट येथील शेतकरी विजय चांदणे गुलाबासह इतर फुलांची शेती करतात. पुण्यातील इस्काॅनची दोन व जैन समाजाच्या १० मंदिरांना ३६५ दिवस गुलाबसह इतर फुले पुरवतात. ही सेवा १७ वर्षांपासून अविरत सुरू आहे. तीन महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने त्यांच्या सेवेमध्ये खंड पडला आहे. हा खंड भरून निघावा, मजुरांचा पगार व फवारणी इतर खर्च वसूल व्हावा यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सकाळपासून फुलांची विक्री करण्यासाठी मार्केटमध्ये ठाण मांडून आहेत. त्याच्या शेतामध्ये गुलाब, शेवंती, गुलछडी, सोफ्या, तुळस आदीचे उत्पन्न घेतात. मात्र मागील २० वर्षांत पहिल्यांदाच अशा स्थितीचा सामना करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या गोल टेकडी मार्केटमध्ये फुलांची मोठी बाजारपेठ आहे. सकाळपासून दुपारी दोनपर्यंत बाजारपेठ असते. लॉकडाऊन शिथिल हाेऊनही फुले खरेदीचे प्रमाण नगण्य आहे. पुण्याच्या मार्केट यार्डात फुल बाजार आडत असोसिएशन १५० हून अधिक नोंदणीकृत फुल स्टॉलधारक आहेत. लॉकडाऊनपूर्वी फुलांना चांगले दर होते. लॉकडाऊनन शिथिल केल्यानंतर फुलांची आवक वाढली,मात्र मागणी घटल्याने फुल शेतीवर संकट आले आहे. गुलछडी फुलाला चांगली मागणी असते. परंतु सध्या ती १० ते २० रुपये किलो दराने मिळत आहे. मात्र लॉक डाऊनच्या काळात १०० ते ८० रुपये प्रतिकिलो दर होता. मात्र सध्या २० टक्के आवक असून दर कमी आहेत. असे फुल बाजार अडत असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले.

भाज्या गोळा करून किमान कुुटुंबाचे पोट तरी भरता आले

यार्डाच्या शेजारीच बैठ्या चाळीत ते राहतात. मार्केट यार्डातून आणि परिसारातून रद्दी गोळा करायची आणि विकायची यावर त्यांची गुजराण. त्यातूनच ते दोन्ही मुलांना शिकवताहेत. लेक वैद्यकीय शिक्षण घेतेय. मुलगा बारावीला आहे. अजयसारख्या अनेकांचा कष्टाला कधीच नकार नव्हता. किंबहुना कष्ट करून पोट भरायची त्यांची आयुष्याची सवय, पण कोरोनानं या कष्टालाच ‘लॉक' लावल्याने त्यांच्यावर टाकून दिलेली भाजी गोळा करून गुजराण करण्याची वेळ आली आहे. पहिला एक - दीड महिना घरातील शिलकीवर संसार चालला. लॉकडाऊन वाढत गेल्याने संचयातील खड्डाही वाढत गेला. दुसरा काही व्यवसाय करायचा तरी मार्केट बंद व हाती भांडवल नाही या कात्रीत सापडले. त्यातल्या त्यात थोडी वर्दळ होती मार्केट यार्डात. यार्डात मोठ्या प्रमाणात एकाच प्रकारचा भाजीपाला येतो. त्यातील काही टाकूनही दिला जातो आणि टाकलेल्या मालात बराचसा चांगलाही असतो. तेव्हापासून त्यांनी हाच धंदा निवडला. रोज यार्डात यायचं, टाकून दिलेल्या भाजीच्या ढिगातून चांगली भाजी निवडायची, दिवसभर ती विकायची आणि उरली तर तीच घरी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी न्यायची. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. 'असे दिवस येतील असं कधी वाटलंही नव्हतं, ' अजय सांगत होते, भाज्या गोळा करून किमान पोट तरी भरता येते. रोजच्या पुरते पैसेही मिळतात आणि खाण्यापुरती भाजीही. ही परिस्थिती किती दिवस राहाणार कुणालाच शाश्वती नाही.