आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Sting Operation : Gujarat's Private Labs Are Giving Corona Negative Reports Without Samples And Tests

कोरोना काळातील सर्वात मोठा गौप्यस्फोट:व्यक्ती यूपीत असो वा बिहारमध्ये...गुजरातच्या खासगी लॅब नमुने-चाचण्यांविनाच देत आहेत निगेटिव्ह रिपोर्ट

अनुप मिश्रा | सुरतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
18 सप्टेंबरला‌ रात्री 8 ला तेजस लॅबचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळाला.
  • कोरोना काळातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, कोरोना चाचण्यांत खासगी लॅब्जचा कमाईचा गोरखधंदा

गुजरातेत एकीकडे कोरोनाग्रस्तांचा आकडा सव्वा लाखावर गेला आहे, तर दुसरीकडे उद्योगांचाही वेग वाढला आहे. मात्र उद्योगांना गती देणारे स्थलांतरित मजूर गुजरातेत परतण्याआधी होणाऱ्या कोरोना चाचण्यांत प्रचंड गोरखधंदा सुरू आहे. खासगी प्रयोगशाळा (लॅब) पैसे घेऊन मनाजोगा अहवाल देत आहेत. यासाठी न नमुने घेतले जातात, न चाचण्या होतात. इतकेच नव्हे तर, ज्याची चाचणी होणार आहे ती व्यक्तीही उत्तर प्रदेश व बिहारसारख्या राज्यांत असते. त्याच्या नावाने कोविड निगेटिव्ह अहवाल दिला जात आहे. हा गाैप्यस्फोट करण्यासाठी दै. भास्करमध्ये सलग १० दिवस “पैसे दो, रिपोर्ट लो’ हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. सुरतच्या २ खासगी लॅबशी सौदा ठरला. दोन्ही लॅब्ज पैसे घेऊन निगेटिव्ह रिपोर्ट देण्यास तयार झाल्या. मग तो आरटीपीसीआर रिपोर्ट असो की रॅपिड टेस्टचा. आमच्या प्रतिनिधीने ५ सहकाऱ्यांना ते यूपीचे मजूर असल्याचे दाखवत निगेटिव्ह रिपोर्ट मागितला. लॅबने प्रत्येकी २ हजार रुपये घेऊन २ दिवसांत रिपोर्ट दिला.

तेजस लॅब, रिंगरोड, सुरत : तुम्ही चिंताच करू नका, अनेक दिग्गज कंपन्यांना रोज १०० मजुरांचे रिपोर्ट देताहोत

> प्रतिनिधी : आमचे काही मजूर यूपीहून येताहेत, काही मॅनेज होऊ शकते का?

- लॅब कर्मचारी : (विचारांती) हो, थोडं कठीण आहे, पण काम होऊन जाईल. पैसे कसे द्याल? किती अहवाल हवे आहेत?

> प्रतिनिधी : सर्वांचे पैसे आगाऊ मिळतील. तुम्हीच हिशेब करा.... बसमधून येणाऱ्या ४ हजार जणांचे अहवाल तयार करायचे आहे.

- लॅब कर्मचारी : रॅपिड टेस्ट होईल, आरटीपीसीआर नाही.

(कर्मचारी फोनवर मालकाशी बोलणे करवून देतो...)

> प्रतिनिधी : हां, बोला साहेब.

- लॅब कर्मचारी : काम होईल. पैसे आधी द्यावे लागतील. हजीराच्या अनेक मोठ्या कंपन्यांसोबतच काही सुरू आहे.

> प्रतिनिधी : सर्वांंचाच निगेटिव्ह अहवाल मिळेल ना?

- लॅब कर्मचारी : जो खरेच पॉझिटिव्ह असेल, त्याचे नाव तुम्हाला सांगून देऊ. त्याला कामावर ठेवू नका, मात्र त्याचा निगेटिव्ह अहवाल बनवून देऊ.

हेम ज्योती लॅब पांडेसरा पीयूष पॉइंट : ४ दिवसांआधी रिपोर्ट देऊ, पॉझिटिव्ह आल्यास जास्त क्वाॅरंटाइन होणार नाही

> प्रतिनिधी : आमचे लेबरचे काम आहे. आम्हाला बाहेरून येणाऱ्या मजुरांचा निगेटिव्ह अहवाल हवा आहे?

- लॅब : रिपोर्ट तर मिळून जाईल. मात्र तो जर पॉझिटिव्ह आल्यास ७ दिवसांपर्यंत क्वॉरंटाइन करावे लागेल. त्यात दोन अहवाल असतात. सरकारी चाचण्याही करता येऊ शकतात.

> प्रतिनिधी : क्वॉरंटाइनच करावे लागणार असेल तर मजूर बाहेरून आणण्यास काही अर्थ नाही. यामुळेच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत.

- लॅब : त्याला आम्ही काय करणार? मनपा तपासणीसाठी येत असते. मात्र त्यात आम्ही एक मदत करू शकतो.

> प्रतिनिधी : तुम्ही कशी मदत करणार?

- लॅब : मजुरांना घेण्यासाठी बस पाठवाल तेव्हा त्यांची नावे आम्हाला द्या. आम्ही ४ दिवसांअाधीच सॉफ्टवेअरमध्ये नावे टाकून देऊ. ते मजूर इथे आल्यानंतर चाचण्या घ्या, पॉझिटिव्ह आले तरी अडचण नाही. त्यांचे रिपोर्ट आधीच्या तारखेत असतील. १-२ दिवसांनी कामावर बोलावून घ्या.

कारण : १४ दिवस क्वाॅरंटाइन न व्हावे म्हणून

पॉझिटिव्ह मजुरांना घरबसल्या पगार द्यावा लागू नये म्हणून मिल मालक खासगी लॅबशी संपर्क करत आहेत. यामुळे लॅबचालकांनी चक्क अनेक ऑफर्स काढल्या आहेत. निगेटिव्ह रिपोर्ट मिळताच मजुरांना कामास जुंपले जाते.

पद्धत : ना व्यक्ती, ना नंबर, केवळ आधार क्रमांक

तपासणी करून घेणारा लॅबमध्ये गेला नाही, ना लॅबमधून कुणी नमुने घेण्यासाठी आले. केवळ आधार कार्डची झेरॉक्स द्या व रिपोर्ट न्या. चाचण्या झालेल्यांचे फोन नंबरही नंतर घेण्यात आले. लॅबमधील व्यक्ती म्हणाली, तुमचे मजूर यूपी, बिहार कुठूनही येवो. तुम्हाला अहमदाबाद, बडोदा व सुरतेच्या कोणत्याही लॅबचा हवा तो रिपोर्ट मिळेल. मग तो निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह.

(12 लाख मजूर लॉकडाऊनमध्ये सुरतेहून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व ओडिशाला परतले होते. आता मिल्स व कारखाने सुरू होत असल्याने हे कामगारही उपजीविकेसाठी परतत आहेत.)