आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Story Of Corona Worrier : The Strength Of The 5 year old Girl's Words And Her Husband's Encouragement

कोरोना महिला योद्ध्यांच्या यशोगाथा:एकीकडे रुग्णवाढ, सहकारी कोरोनाग्रस्त, तरीही सज्ज ग्रेसी; 5 वर्षांच्या मुलाचे बोल आणि पतीच्या प्रोत्साहनाने मिळाले बळ

महेश घोराळे | अकोला2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गत 6 महिन्यांपासून दररोज चाैदा तास कर्तव्यावर; संकटांची मालिका न संपणारी...

काेराेनाकाळात कुठे प्रशासनातील कडी म्हणून, कुठे दवाखान्यातील सेवा म्हणून, तर कुठे थेट सामाजिक बांधिलकीचा वसा जपत माणुसकीचे कर्तव्य पार पाडणाऱ्या ‘मिळून साऱ्या जणीं’च्या यशोगाथांवर महिला - बालविकास विभाग आणि ‘दिव्य मराठी’चा प्रकाशझोत.

कितीही बिकट साथ असो, गंभीर अपघात असोत वा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील अधिसेविका ग्रेसी मारियन यांनी अशी कित्येक संकटे लीलया हाताळली. परंतु या वेळचे संकट वेगळेच होते. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत होती आणि त्यांची सेवा करणारा स्टाफही रुग्ण होत होता. पण यामुळे डगमगून न जाता ग्रेसी या बाक्या प्रसंगात गेल्या सहा महिन्यांपासून किल्ला लढवत आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेकांना कौटुंबिक प्रेमाचा अनुभव मिळाला, पण अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिसेविका मात्र वाढत जाणाऱ्या रुग्णांची, आजारी पडणाऱ्या स्टाफची, कुटुंबाची रात्रंदिवस सेवा करीत होत्या. गेले सहा महिने त्या सकाळी ९ वाजता घर सोडतात ते १४ तासांनी घरी परततात. या सहा महिन्यात त्यांच्या पुढे येणारा प्रत्येक प्रसंग परीक्षा घेणारा होता. तपासणीसाठी रांगा, रुग्णांचा लोंढा, अत्यावस्थ रुग्ण, आॅक्सिजनची आणीबाणी अशी संकटांची मालिका वाढत जाणारी. त्यात ज्यांच्यावर कामाची भिस्त त्या वॉर्डात काम करणाऱ्या इतर परिचारिका पॉझिटीव्ह होत होत्या. एकीला १२ दिवस व्हेंटीलेटरवर ठेवावे लागले. अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. स्टाफची संख्या रोडावली होती. पण मारियन मात्र या साऱ्यात जिद्दीने लढत राहिल्या. प्रशासकीय आदेशांनुसार उपचार देणे, उरलेल्या स्टाफच्या ड्यूटी लावणे, कोविड वार्डांचे राऊंड घेणे, तक्रारींचे निराकरण, औषधोपचाराचा आढावा, ऐनवेळी वाढणाऱ्या रुग्णांचे नियोजन, स्टाफ आजारी पडल्यास पर्यायी व्यवस्था, आॅक्सिजन आणि आयसीयुतील रुग्णांची क्षणाक्षणाची दक्षता अशा अनेक अटीतटीच्या प्रसंगांना समर्थपणे सामोरे जात त्यांनी कर्तव्य पार पाडले.

मम्मी, तू कोविडमध्ये काम कर : ५ वर्षांच्या मुलाचे बोल आणि पतीचे प्रोत्साहन... याने मिळाले बळ

ग्रेसी मारियन सांगतात की माझा पाच वर्षांचा मुलगा आणि माझे पती मला कायम प्रोत्साहन देत आले आहेत. मुलगा आजारी असला तरी मी घरी थांबावं यासाठी तो कधीच हट्ट करीत नाहीत. उलट ‘मम्मी, तू कोविडमध्ये काम कर’ म्हणून तो ड्यूटीवर जाण्यास सांगतो. त्यामुळे संकट कितीही मोठं असलं तरी यामुळेच बळ मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...