आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणारे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे नेमके काय? भारत खडकांमध्ये तेल कसे लपवून ठेवतो? जाणून घ्या

आबिद खान2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

भारत सरकारने आपल्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमधून 50 लाख बॅरल सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. भारतापूर्वी अमेरिकेनेही असाच निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत आणखी अनेक देश हा निर्णय घेऊ शकतात.

भारताच्या या घोषणेपासून स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह चर्चेत आहे. स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे काय? भारताचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह कोठे आहेत? या साठ्यांमध्ये कच्चे तेल कसे साठवले जाते? आणि या निर्णयामुळे तुमच्या खिशाला दिलासा मिळेल का?, जाणून घेऊया...

सर्वप्रथम जाणून घ्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे काय?
सोप्या भाषेत समजून घ्यायचे म्हणजे, आणीबाणीच्या परिस्थितीत देशाच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी हा कच्च्या तेलाचा साठा आहे. युद्ध किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होतो तेव्हा देशाच्या ऊर्जेच्या गरजा या साठ्यातून भागवल्या जातात. आणीबाणी व्यतिरिक्त, या साठ्यांचा वापर तेलाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी देखील केला जातो.

भारत आपल्या गरजेच्या 83% कच्च्या तेलाची इतर देशांकडून आयात करतो, त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताने कच्चे तेल देखील राखीव ठेवले आहे. हे राखीव फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाते.

भारताचे स्टॅटेजिक रिझर्व्ह कोठे-कोठे आहे?
भारताने पहिल्या टप्प्यात विशाखापट्टणम, मंगळुरू आणि उडुपीजवळ पडूर येथे स्टॅटेजिक रिझर्व्ह तयार केले होते. या तिन्ही साठ्यांमध्ये 50 लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाचा साठा करता येऊ शकतो. या साठ्याच्या संचालनाची जबाबदारी पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड (ISPR) ला देण्यात आली आहे.

2017-18 या आर्थिक वर्षात, दुसऱ्या टप्प्यांतर्गत, भारताने ओडिशातील चंडीखोल आणि राजस्थानमधील बिकानेर येथे आणखी दोन स्टॅटेजिक रिझर्व्ह निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. भारताचे स्टॅटेजिक रिझर्व्ह सुमारे 10 दिवसांसाठी देशाच्या ऊर्जेची गरज भागवू शकतो.

या ठिकाणी भारताने आपले स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह का बनवले?

भारताचे सर्व स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह पूर्व आणि पश्चिम सागरी किनार्‍यावर रणनीती अंतर्गत तयार केले गेले आहेत.

  • शेजारील देशांशी युद्ध झाल्यास पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भाग उत्तरेकडील भागांपेक्षा अधिक सुरक्षित असतात.
  • बहुतेक तेल शुद्धीकरण कारखाने पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात समुद्र किनार्‍यावर आहेत, कारण तेल शुद्धीकरण कारखाने आणि स्टॅटेजिक रिझर्व्ह एकमेकांना जोडलेले आहेत, त्यामुळे या भागांमध्ये रिझर्व्ह तयार केले गेले आहेत.
  • कच्च्या तेलाचा साठा करण्यासाठी सागरी क्षेत्र अधिक अनुकूल आहेत, कारण पाण्यामुळे पृष्ठभागाचे तापमान कमी असते.

शेवटी, इतके कच्चे तेल कसे साठवले जाते?

तुम्ही विचार करत असाल की इतके कच्चे तेल कसे साठवले जाते. चला जाणून घेऊया, भारत आणि जगभरातील देश त्यांचे स्टॅटेजिक रिझर्व्ह्स कसे साठवतात...

  • भारत आपले स्टॅटेजिक रिझर्व्ह्स रॉक कॅव्हर्न्समध्ये साठवून ठेवतो. रॉक कॅव्हर्न्स म्हणजे खडकांमध्ये गुहेसारखे स्टोरेज. यामध्ये खडक फोडून गुहेसारखा साठा बनवला जातो, ज्यामध्ये कच्चे तेल साठवले जाते. कच्चे तेल साठवण्याची ही पद्धत जगातील सर्वात सुरक्षित मानली जाते.
  • अमेरिका सॉल्ट डोममध्ये आपल्या स्टॅटेजिक रिझर्व्ह्समधील कच्चे तेल साठवतो. सॉल्ट डोम म्हणजे जमिनीच्या 2-4 हजार फूट खाली असलेल्या खडकांमधील मीठ काढून रिकाम्या जागेत कच्चे तेल साठवणे. 'सोल्यूशन मायनिंग' नावाच्या प्रक्रियेद्वारे खडकांच्या मध्यभागातून प्रथम मीठ काढले जाते. नंतर रिकामी जागा पूर्णपणे स्वच्छ पाण्याने स्वच्छ केली जाते. मजबूत खडकांमध्ये कच्चे तेल साठवले जाते. जमिनीखाली असल्याने तेथील तापमानही कमी असते. अमेरिकेचे बहुतेक स्टॅटेजिक रिझर्व्ह्स मेक्सिकोच्या आखाताच्या आसपास आहेत.
  • चीनकडे लायोनिंग, शेडोंग आणि झेजियांगमध्ये स्टॅटेजिक रिझर्व्ह आहे. हे सर्व समुद्रकिनारी आहेत. चीन समुद्राला जोडलेल्या भागात कच्च्या तेलाचा साठा जमिनीखाली ठेवतो. खडकांमध्ये कच्चे तेल साठवले जाते.

या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींचा फायदा पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 2 ते 3 रुपयांनी कमी होऊ शकतात. मात्र, येत्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास किंमती खाली येणे कठीण होईल. कच्चे तेल सध्या प्रति बॅरल 80 डॉलरच्या आसपास आहे.

स्टॅटेजिक रिझर्व्हमधून काढलेले कच्चे तेल कुठे जाईल?

भारतात सध्या सुमारे 3.8 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. या साठ्यातून 50 लाख बॅरल सोडण्यात येणार आहेत. हा साठा मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड (HPCL) यांना विकला जाईल. या दोन्ही रिफायनरी पाइपलाइन स्ट्रॅटेजिक रिझर्व्हशी जोडल्या गेल्या आहेत. या रिफायनरीज कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करून ते बाजारात आणतील.

बातम्या आणखी आहेत...