आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Sudam Munde : Purchase Of Millions Of Medicines From Parli Medical; No 'record' Of Drugs Sold To Munde

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन:परळीच्याच मेडिकलमधून केली लाखोंची औषध खरेदी; मुंडेला विकलेल्या औषधांचे नाही ‘रेकॉर्ड’

अमोल मुळे | बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंडेला मेडिकल चालकाची साथ, वर्षभरात विकत घेतली 15 लाखांची औषधे, मेडिकलचे प्रिस्क्रिप्शन केले जप्त

परवाना रद्द असतानाही वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या परळीच्या सुदाम मुंडेकडे सापडलेला लाखो रुपयांचा औषध साठा कुठून आला, याचा शोध अखेर लागला आहे. परळीच्याच मोंढा भागातील श्री मेडिकल या औषधी दुकानातून मुंडेला औषधींचा पुरवठा केला जात होता. शिवाय मुंडेला विकलेल्या औषधांचे कोणतेही रेकॉर्ड औषध विक्रेत्याकडून ठेवले जात नव्हते. या मेडिकलचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित होऊ शकतो किंवा कायमस्वरूपी रद्दही होऊ शकतो.

अवैध गर्भपात प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा होऊन जामिनावर असलेल्या सुदाम मुंडेंनी वर्षभरापासून परळी शहराजवळ रामनगर भागात रुग्णालय थाटून बिनबोभाट वैद्यकीय व्यवसाय सुरू ठेवला होता. तपासणी करून रुग्णांना औषधीही मुंडेच देत होता. आरोग्य विभागाने टाकलेल्या छाप्यात त्याच्याकडे सुमारे एक लाख रुपयांचा औषध साठा सापडला. यात अँटिबायोटिक, मल्टिव्हिटॅमिन, सलाइन, इंजेक्शन्स याचा समावेश आहे.

इतका पैसा आला कुठून ?

मुंडेकडून दर महिन्याला लाख रुपयांची औषध खरेदी या मेडिकलमधून केली जात होती. वर्षभरापासून नियमितपणे ही औषध खरेदी होत होती. वर्षभरात किमान १२ ते १५ लाख रुपयांची औषध खरेदी मुंडेने अवैधरीत्या केली असल्याचा प्रशासनाचा संशय आहे.

औषध विभागाकडून तपासणी

औषध विभागाचे निरीक्षक रामेश्वर डाेईफोडे यांनी श्री मेडिकलची तपासणी केली आहे. रेकॉर्डमध्ये अनियमितता असून या प्रकरणी नोटीस बजावली असल्याची माहिती डोईफोडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

प्रिस्क्रिप्शन बुक जप्त

श्री मेडिकलचे नाव असलेले प्रिस्क्रिप्शन बुकच मुुंडेच्या रुग्णालयात सापडले आहे. औषध विभागाने हे बुक ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची या मेडिकलशी असलेली लिंक समोर आली आहे.

सगळ्यांचे रेकॉर्ड, मुंडेचे मात्र नाही

सुदाम मुंडेचा वैद्यकीय व्यवसायाचा परवाना रद्द आहे. तो बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करतो याची माहिती मेडिकल चालकाला असण्याची शक्यता आहे. कारण इतर सर्व आैषध विक्रीचे रेकॉर्ड या विक्रेत्याकडे आहे. केवळ जेवढी औषधी सुदाम मुंडेला विक्री केली त्याचे रेकॉर्ड नाही असे औषध विभागाने सांगितले. मात्र, खरेदी आणि विक्री यांच्या रेकॉर्डमध्ये ही तफावत स्पष्टपणे आढळून येत आहे. यावरून आता पोलिस आणि औषध प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

परवाना रद्द, १० वर्षांची शिक्षा, तरीही गुन्हे सुरूच

परळीच्या गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपात प्रकरणात सुदाम मुंडेला बीडच्या सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मुंडेचा वैद्यकीय व्यवसाय परवाना ऑक्टोबर २०१५ मध्येच रद्द केला आहे. यानंतरही मुंडेचे कारनामे सुरूच आहेत. फेब्रुवारीत सर्वाेच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता. त्यानंतर वर्षभरापासून तो परळीत आहे. कोरोना काळात मुंडेने पुन्हा एकदा वैद्यकीय सेवा सुरू केली होती. प्रशासनाला याची माहिती मिळताच त्याच्या घरावर पोलिसांनी व जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यात अनेक धक्कादायक बाबीही उघड झाल्या. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासोबतच मुंडेने या वर्षभरात अवैध गर्भपाताचा जुनाच उद्योग सुरू केला होता का, याचाही पोलिस आता शोध घेत आहेत. माहितीनंतर त्याचे आणखी कारनामे उघड होतील.