आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करून अभिनेत्री केतकी चितळे सध्या चर्चेत आहे. वादग्रस्त विधानांवरून केतकी चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. तरीही वेळोवेळी तिने आपण एपिलेप्सी या आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटले आहे. याच्याच लक्षणामुळे आपल्याला फिट्स येतात. शरीरावर आणि मेंदूवर ताबा नसतो असेही तिने वेळोवेळी म्हटले आहे. एपिलेप्सीलाच मराठीत अपसमार असेही म्हटले जाते. आता हा आजार नेमका कसा असतो, त्याची लक्षणे काय आहेत? आणि उपचार कसा करावा याबद्दल आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रश्न.1 - 'एपिलेप्सी' मनोविकार आहे काय?
उत्तर - एपिलेप्सी हा मानसिक विकार नव्हे तर मेंदूचा आजार आहे. तो संसर्गजन्य नाही. मेंदूमध्ये एक इलेक्ट्रिक सर्किट असते. ते असामान्यपणे मेंदूला अटॅक करतात. यामुळे मेंदुत काही रासायनिक बदल होतात. मेंदु एक्सिसेव्ह स्टेजमध्ये जातो. यात रुग्णाची शरीर प्रक्रिया बदलते. उदाहरणार्थ, मेंदुतील केमिकल्स व मेंदुच्या प्रक्रियेत झालेल्या बदलांमुळे फिट्सची समस्या उद्भवते. यात वेगवेगळ्या प्रकारची शारिरीक लक्षणे दिसून येतात. काही पेशंट हातवारे करतात. तर काहींचा व्यवहार बदलतो. 'इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम' च्या माध्यमातून हे बदल दिसून येतात. त्यामुळे हा आजार एपिलेप्सी (अपस्मार किंवा फेफरे) असल्याचे चटकन निदान होते.
प्रश्न.2 - एपिलेप्सी कशामुळे होतो?
उत्तर - मेंदुमध्ये एक इलेक्ट्रिक सर्किट असते. ते मेंदूला अटॅक करतात. विशेषतः एखाद्याला ब्रेन ट्युमर किंवा मेंदुत संसर्ग झाला असेल तर या बदलांमुळेही हा आजार होण्याची दाट भीती असते.
प्रश्न.3 - एपिलेप्सीची लक्षणे कोणती आहेत?
उत्तर - 'एपिलेप्सी'चे विविध प्रकार आहे. त्यातील एक म्हणजे 'दुय्यम किंवा लक्षणात्मक अपस्मार'. लक्षणात्मक संसर्गाची कारणे कळू शकतात. असे रुग्ण उपचाराने बरेही होतात. आईच्या उदरात असताना मेंदुला झालेली दुखापत, एखाद्या आघातामुळे मेंदुला होणाऱ्या प्राणवायूच्या पुरवठ्यात खंड पडणे, मेंदुतील गाठ आदी विविध कारणांमुळे हा आजार होतो. या आराजामुळे रुग्णाचे शारिरीक संतुलन बिघडते. त्याची शुद्ध हरपते. शरीर आकडते, झटका येतो, शरिराच्या विचित्र हालचाली होतात. जिभ किंवा ओठ दातांनी चावले जातात. दातखिळी बसते.
प्रश्न.4 - यावर उपचार काय? टोकाच्या स्थितीत काय करता येईल?
उत्तर - या आजारावर उपचार शक्य आहेत. हा आजार औषधांनी बरा न झाल्यास शस्त्रक्रिया हा चांगला मार्ग आहे. सध्या आजाराविषयी विविध गैरसमज आहेत. पण, अचूक माहितीमुळे यासंबंधीच्या उपचारांवरील जनजागृती वाढेल. त्याचा फायदा रुग्णांना होईल. हा आजार फिट्स येणे, आकडी, मिरगी आदी विविध नावांनी ओळखला जातो. त्यात एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये पेशंट जास्त प्रमाणात आक्रमक किंवा हिंसक होतात. यामुळे त्यांना इजा होण्याची भीती असते. एखाद्याला वाहन चालवताना फिट्स आल्या तर मोठा अपघातही होऊ शकतो.
प्रश्न.5 - कुटूंबियांनी काय काळजी घ्यावी, काही विशेष सल्ला? उत्तर - असे काही आढळल्यास कुटुंबियांनी सर्वप्रथम त्या व्यक्तीला लगतच्या रुग्णालयात हलवावे. एखाद्या न्यूरोलॉजिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावे. यामुळे रुग्णाला वेळेवर औषधोपचार मिळतील. एपिलेप्सी असणाऱ्या व्यक्तीला वेळेवर औषधोपचार करावेत. त्यांच्या हातात वाहन देऊ नये. स्विमिंगपासूनही त्यांना दूर ठेवावे. फिट्सचा झटका आल्यानंतर त्यांना झोपवावे. या प्रकरणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा रुग्णांवर घरगुती उपचार करण्यात वेळ वाया घालवू नये. यामुळे धोका होण्याची भीती असते. वैद्यकीय उपचार हाच यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.