आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तनातली स्त्रीशक्ती:लास्ट पर्सन यावा फर्स्ट लाइनमध्ये...

सुप्रिया सुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजसेवेसाठी राजकारणात आलो, असं म्हणणारे ढीगभर राजकारणी आहेत. त्यांच्यापैकी किती जणांनी खरंच समाजसेवेला प्राधान्य दिलं हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो. आणि म्हणूनच राजकारणासारख्या क्षेत्रात राहूनही समाजातल्या शेवटच्या घटकाचा विचार करणारे सुप्रिया सुळेंसारखे राजकारणी अपवादानेच आढळतात. एलजीबीटी समुदायासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, या समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या करत असलेले प्रयत्न पाहता त्यांना परिवर्तनातील स्त्री शक्तीचे रुप मानता येईल.चौकटीपलीकडच्या अशा सामाजिक बदलांमागे असलेली त्यांची भूमिका आणि इथपर्यंत झालेला प्रवास त्यांच्याच शब्दांत...

‘नवरात्र’ देवीच्या जागरचा. हा जागर मानवाच्या सुख, समृद्धी, यश, आनंदाचा. समाजातील चुकीच्या धारणा आणि अपप्रवृत्तीचे दहन करून विजयादशमी साजरा करण्याचा. एलजीबीटी समुदायाबद्दल समाजात असलेल्या चुकीच्या धारणा, गैरसमज आणि या समुदायाबद्दल समाजात असलेल्या अपप्रवृत्ती कायमच्या नष्ट व्हाव्यात आणि या समुदायालाही समाजात सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगता यावे अशी माझी व्यक्तिश: इच्छा होती. यशस्विनी अभियान, युवा धोरण, शिक्षण विकास मंच, दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे असलेले विकास मंच, एकल महिलाच्या हक्कासाठी स्वतंत्र धोरण अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आमचे काम सुरूच आहे, पण त्याचबरोबर एलजीबीटीसारख्या महत्त्वाच्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून काहीतरी ठोस स्वरूपाचे काम होण्याची आवश्यकता मला भासत होती. त्या दृष्टीने ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या प्रश्नासाठी आणि हक्कासाठी मी कायम लोकसभेत आवाज उठवत आलेेले आहे.

माझी भूमिका
राजकारण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी पुरोगामी विचारसरणीचा स्वीकार करते. पुरोगामी विचार हा कायम कृतीतून समोर आणला पाहिजे. देशात पहिल्यांदा महिला आरक्षण हे महाराष्ट्रात सुरू झालं. पहिल्यांदा युवती काँग्रेस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालं आणि आता एलजीबीटी सेल हा आम्ही सुरू केला. या सेलमार्फत एलजीबीटी समुदायाचे आर्थिक, सामाजिक प्रश्न सुटावेत हा यामागचा हेतू आहे. समाजातील विविध वर्गापर्यंत, तळागाळातील वंचितांपर्यंत राजकारण पोहोचतं, पण एलजीबीटी समुदाय राजकीयदृष्याही वंचित राहिला होता. या समुदायाला राजकारणात स्वत:चे प्रश्न, स्वत:चे म्हणणे मांडण्यासाठी स्वत: स्थान मिळाले पाहिजे ही भूमिका आणि उद्देश समोर ठेवून राष्ट्रवादीने स्वत:च्या पक्षात एलजीबीटी सेलची स्थापना केली. एलजीबीटी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक स्तरांवर प्रयत्न केले जातात, पण हे प्रयत्न राजकीय स्तरावरही होणे अपेक्षित आहे म्हणून एलजीबीटी सेल स्थापन करून राजकीयदृष्ट्या त्यांना महत्त्व देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.

एलजीबीटी सेल आणि त्या समुदायासोबतचा अनुभव
एलजीबीटी समुदायाबद्दल अजूनही समाजातील सर्वच स्तरामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समज-गैरसमज आहेत. या धारणा दूर करण्यासाठी धोरणात्मक बदल होणे अपेक्षित आहे. यासाठी मी माझ्या स्तरावर प्रयत्नशील आहे. अनेक जण मला भेटतात तेव्हा त्यांच्याशी बोलताना लक्षात येते की, या समुदायाबद्दल मनात काहीशी भीती-गोंधळ आहे. ही भीती, मनातील गोंधळ दूर करण्यासाठी काम केले पाहिजे. याची सुरुवात कुठून करायची, तेव्हा आम्ही पवार पब्लिक स्कूलच्या माध्यमातून प्रथम शिक्षकांना एलजीबीटी समुदायातील लोक म्हणजे नेमकं काय? यावर चर्चा घडवून आणल्या. या चर्चा करण्यासाठी एलजीबीटी समुदायातील विकी शिंदे, माधुरी सरोदे-शर्मा यांची महत्त्वाची मदत झाली. जेव्हा विकी आणि माधुरी हॉलमध्ये प्रवेश करत, स्टेजवर उभे राहून मांडणी करायला सुरुवात करत त्या वेळी बहुतांश शिक्षकांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न असायचे. मात्र जेव्हा खुली चर्चा होत असे त्या वेळी शिक्षकांचे आलेले प्रतिसाद, एलजीबीटी समुदायाला समजून घेण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे होते. मला एका शिक्षकाने सांगितलेला ट्रान्सजेंडर व्यक्तीने त्यांच्या कुटुंबाला केलेल्या मदतीचा अनुभव चांगला आठवतो. त्या शिक्षकाची आई आजारी असायची. घरात त्यांच्यासोबत लहान भावंड असे कुटुंब होते. त्या वेळी त्याच्या वस्तीत येणाऱ्या एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने वर्षभर त्याच्या कुटुंबाला जेवण तयार करून देण्याची आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी निभावली होती. पुढे ती ट्रान्सजेंडर व्यक्ती त्याच्या कुटुंबाची सदस्य म्हणूनच त्यांच्या घरी येत असे. दुसरा अनुभव म्हणजे चांदवलीच्या शाळेत विकी आणि माधुरीने टाळी वाजवत प्रवेश केला होता तेव्हा जवळपास सर्वच शिक्षकांनी त्यांना पैसे देण्यासाठी खिशात हात घातला होता. याच्यामागचे कारण होते की, पैसे देऊन त्यांच्यापासून दूर जाणे किंवा ट्रान्सजेंडर जवळ आले की भीती वाटणे. ही भीती, ट्रान्सजेंडर व्यक्तीबद्दल असलेले गैरसमज दूर करणे हा मुख्य उद्देश या चर्चेमागचा होता. खरं तर हा समुदाय म्हणून वेगळा अनुभव सांगायचा झाला तर मी हेच म्हणेल की, इतकी वर्षे हा समुदाय दुर्लक्षित राहिला हाच वाईट अनुभव आहे. व्यक्ती म्हणून एलजीबीटी समुदाय त्याच्या रेनबो झेंड्याप्रमाणे कलरफूल फूल ऑफ लाइफ आहेत. कुटुंबाने आणि समाजाने स्वीकारले पाहिजे ही भूमिका आवश्यक आहे.

एलजीबीटी समुदाय आणि समाजाचा मुख्य प्रवाह
देश स्वतंत्र झाल्यापासून देशातील प्रत्येक व्यक्तीची समानता महत्त्वाची राहिली आहे. अजूनही एलजीबीटी समाजाला समानतेची वागणूक मिळत नाही. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आजही पूर्वग्रहदूषित आहे. तो बदलण्यासाठी देशपातळीवर काम होणे गरजेचे आहे. संविधानातील मूल्य समाजातील सर्वच स्तरामध्ये रुजवले जाण्याची मोहीम सातत्याने सुरू असली पाहिजे. एलजीबीटी समुदायातील व्यक्तीसोबत बोलताना लक्षात येते की, कुटुंबातून स्वीकारले जात नाही त्यांना अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागतो. या अडचणी कमी व्हायला पाहिजे. ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या संघर्षाची सुरुवात कुटुंबापासूनच होते. जन्माच्या वेळी मिळालेली ओळख बदलून स्वत:ला मान्य असलेली ओळख स्वीकारून जगत असताना अनेक भेदभावाचा सामना करावा लागतो. त्यांचे कुटुंबीय ही गोष्ट सहजासहजी स्वीकारत नाहीत. परिणामी या समुदायातील व्यक्तींना घर सोडावे लागते. बाहेरच्या जगात जिवंत राहण्यासाठी या समुदायाला यासाठी पेरेंटिंग काउन्सेलिंग हा महत्त्वाचा घटक आहे. अशा व्यक्तीसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काउन्सेलिंग सेंटर सुरू करणे आवश्यक आहे. आणि एकदा का कुटुंबाने स्वीकारले की मग समाजाची मानसिकता बदलणे तुलनेने सोपे जाते. प्रत्येक जिल्ह्यात ट्रान्सजेंडरकरता शेल्टर होम सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. समाजात बदल घडवून आणण्यासाठी चेंज मेकर म्हणून शालेय विद्यार्थी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणून शालेय वयापासून याबद्दलची माहिती समाविष्ट केली गेली पाहिजे. एलजीबीटीच्या प्रश्नासाठी हेल्पलाइन कार्यप्रणाली कशा पद्धतीने सुरू करता येईल यासाठी मी शासनस्तरावर प्रयत्नशील आहे. समाजातील ‘लास्ट पर्सन’ हा माझ्यासाठी कायम ‘फर्स्ट पर्सन’ आहे.

आर्थिक स्वयंपूर्णता
दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे रोजगाराचा. अनेक वेळा या व्यक्ती भीक मागतात म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते. त्यांना तुच्छ वागणूक दिली जाते. विशेष म्हणजे ‘सुशिक्षित माणसं’ही यामध्ये मागे नाहीत. मात्र असे वागताना या व्यक्तींवर भीक मागण्याची वेळ का येते याचा कुणीही विचार करण्याचा त्रास घेत नाही. या समुदायाने भीक मागण्याऐवजी काम करायला पाहिजे असे केवळ बोलले जाते. मात्र त्याच वेळी समाज म्हणून आपणही त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्याची संधी द्यायला हवी याबद्दल कुणीच पुढाकार घेत नाही. वरळीमध्ये राहणारे विकी शिंदे हे ऑनलाइन कपडे विक्रीचे काम करतात. टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करतात. आमच्या एलजीबीटी सेलमधील माधुरी सरोदे-शर्मा खूप छान ज्वेलरी तयार करते. माधुरीशी पहिल्यांदा बोलले तेव्हा माधुरीला ज्वेलरी मेकिंगच्या क्लासमध्ये प्रवेश नाकारला होता. पण त्या यूट्यूबवर पाहून ज्वेलरी तयार करायला शिकल्या. आता त्यांचे हे काम छान सुरू आहे. या व्यक्तीकडे कौशल्य आहे. आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना आपल्यात सामावून घेण्याची. संधी देण्याची. एलजीबीटी सेलच्या माध्यमातून यांचे कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरण यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे.

शब्दांकन : रेणुका कड
divyamarathi.bhaskar.com/magazine/madhurima/

बातम्या आणखी आहेत...