• Home
  • Dvm originals
  • Symptoms of corona were not found in 'those' calves found in Chandrapur district; Now the search for his mother begins

दिव्य मराठी विशेष / चंद्रपूर जिल्ह्यात सापडलेल्या ‘त्या’ बछड्यात आढळली नाहीत कोरोनाची लक्षणे; आता त्याच्या आईचा शोध सुरू

  • हैदराबाद येथील सीसीएमबी प्रयोगशाळेत पाठवले वाघिणींच्या विष्ठेचे नमुने

दिव्य मराठी

May 20,2020 07:34:00 AM IST

नागपूर. (अतुल पेठकर)
चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील सुशी (दाबगाव) येथे २४ एप्रिल रोजी ३ ते ४ महिन्यांचा वाघाचा मादी बछडा सापडला होता. त्याला चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेेंट सेंटरमध्ये ठेवले होते. त्यात १४ दिवसांत काेरोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्याने वन विभागाला मोठाच दिलासा मिळाला आहे. आता या बछड्याच्या आईचा शोध घेण्यासाठी वाघिणींच्या विष्ठेचे नमुने हैदराबादच्या सेंटर फाॅर सेल्युलर अँड माॅलिक्युलर बायोलाॅजी (सीसीएमबी) येथे पाठवल्याची माहिती चंद्रपूरचे विभागीय वनाधिकारी ए. एल. सोनकुसरे यांनी “िदव्य मराठी’ला दिली.

सुशी (दाबगाव) परिसरात ३ बछडे असलेल्या २ वाघिणी फिरत आहे. या दोघींपैकी नेमकी कोणती वाघीण बछड्याची आई आहे, याची डीएनए चाचणी करण्यासाठी दोन्ही वाघिणींच्या तसेच बछड्याच्या विष्ठेचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल २ ते ३ दिवसांत येणे अपेक्षित आहे. त्यानंतर बछड्याला त्याची आई मिळेल, असे सोनकुसरे यांनी सांगितले.

चार पथकांच्या माध्यमातून वाघिणींवर आहे लक्ष

बछड्याच्या आईचा शोध घेण्यासाठी वनविभागाने एनजीओचे प्रतिनिधी, गावकऱ्यांचा समावेश असलेल्या चार टीम तयार केल्या आहेत. जंगल परिसरात २९ कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. डीएनएचा अहवाल आल्यानंतर हा शोध संपेल.

केवळ काळजी म्हणून पाठवला बछड्याचा स्वॅब

केवळ काळजी म्हणून या बछड्याचा स्वॅब नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. मात्र, पशुवैद्यकीय महाविद्यालयाने तांत्रिक कारणास्तव हा नमुना परत केला. त्यानंतर बछड्यांत कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे नव्याने नमुने तपासणीसाठी न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. - नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

X