आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हएका अफगाणी मुलीचे पत्र:तालिबानी राजवटीत मुलींचे शिक्षण सुटले, नोकरदार महिला भीक मागत आहेत

पूनम कौशल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानच्या जाहिदा यांनी पत्र लिहिले आहे. वर्षभरानंतर त्यांचे हे दुसरे पत्र आहे. जाहिदाने पहिले पत्र लिहिले तेव्हा तालिबानी सैन्याने तिच्या शहरात घुसखोरी सुरू केली होती. आता देशात त्यांचे सरकार आहे.

एक वर्षापूर्वी 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवला होता. तालिबानने 20 वर्षांनंतर काबूलमध्ये पुन्हा सत्ता मिळवली. जाहिदा ही 20 वर्षांची आहे. म्हणजेच हे एक वर्ष सोडले तर संपूर्ण आयुष्य त्यांनी निर्बंधांशिवाय घालवले होते.

हा फोटो 15 ऑगस्ट 2021 चा आहे. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देशातून पळून गेल्यानंतर तालिबानी सैनिकांनी राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले होते.
हा फोटो 15 ऑगस्ट 2021 चा आहे. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देशातून पळून गेल्यानंतर तालिबानी सैनिकांनी राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले होते.

या एका वर्षात अफगाणिस्तानात काय बदल झाले ते जाहिदाच्या आयुष्यात झालेल्या बदलावरुन लक्षात येवू शकते.

हे पत्र जाहिदाने लिहिले आहे...

माझे नाव जाहिदा आहे. मी 20 वर्षांची आहे आणि फर्याब प्रांतातील एका शहरात राहते. मी जन्मल्यापासून माझ्या देशात नेहमीच युद्ध पाहिले आहे. वर्षभरापूर्वी तालिबानने देश ताब्यात घेतला तेव्हा मी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मी काबुल युनिव्हर्सिटीमध्ये फार्मसी मेजरमध्ये प्रवेश घेणार होते, पण नंतर मी विद्यापीठ पाहू शकले नाही.

घरच्यांना आमची काळजी वाटत होती म्हणून आम्ही घर बदलले. आई नोकरी करायची. ती शिक्षिका होती. तालिबान सत्तेवर येताच शाळा बंद होऊ लागल्या. आईला अनेक महिने घरी बसावे लागले. सर्व काही सुरळीत व्हायला दोन-तीन महिने लागले, पण दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच बिकट होत गेली.

तालिबान येण्याआधीही आमचे कुटुंब फार श्रीमंत नव्हते, पण जीवन व्यवस्थित जात होते. खाण्यापिण्याची कमतरता नव्हती. आता वर्षभरात आमची अवस्था खूप वाईट झाली. वस्तू विकून पैसे खर्च करावे लागतात. भलेही आमच्याकडे स्वतःसाठी खायला काही नसेल, पण तालिबानी सैनिक घरात घुसले की, त्यांना अन्नपदार्थ पुरवावे लागतात. प्रत्येक कुटुंबाला हे करावेच लागते.

तालिबानी नेते दोन-तीन विवाह करत आहेत. काहींनी तर चार लग्ने केली आहेत. अडचण अशी आहे की त्यांच्या लग्नाचा खर्च आम्हालाच करावा लागतो. तालिबानी सैनिक आमच्या घरातून सामान घेऊन जातात. ज्यांना 14-15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुली आहेत त्यांना भीती वाटते की, तालिबान त्यांच्या मुलीशी लग्न करण्याचा विचार तर व्यक्त करणार नाही.

असाच प्रकार माझ्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या बाबतीत घडला. घरच्यांना तिचे लग्न एका तालिबानी सैनिकाशी करावे लागले. दोन महिन्यांपूर्वी चकमकीत तिच्या पतीचा मृत्यू झाला.

तालिबान राजवटीत मुली आणि महिलांची अवस्था सर्वात वाईट आहे. महाविद्यालयीन मुलींना त्यांच्या घरात कैद केले गेले. ज्या महिला कामाला लागल्या होत्या, त्या अनेक महिला काम सोडून भीक मागत आहेत. महिलांना फक्त वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याची परवानगी आहे. तिथेही ते तेच काम करू शकतात ज्यात पुरुषांजवळ जावे लागत नाही.

माझी एक नातेवाईक आहे. ती शिक्षण मंत्रालयात काम करत होती. त्यांची नोकरीही गेली. त्यांची मुलगी विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ती काबूलमध्ये राहते. मुलीची फी भरणे शक्य नसल्याने तिने तीन महिन्यांपूर्वी घर विकले. घर विकताना ती खूप रडत होती. तालिबान आल्यानंतर अनेक लोक मालमत्ता विकत आहेत. त्यामुळे मालमत्तांचे दरही खूप खाली आले आहेत.

माझ्या शेजारची एक मुलगी काबुलमध्ये काम करायची. एक दिवस ती परत आली. तीला नोकरी गमावावी लागल्याचे तीने सांगितले. आता तीही माझ्यासारखीच घरी राहते. बाहेर जायचे असेल तर सोबत पुरुष नातेवाईक असणे आवश्यक आहे. तालिबानच्या आगमनापूर्वी, मी आणि माझ्या मित्रांनी काबूलला अभ्यासासाठी जाण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यापैकी काहींनी देश सोडला आहे. इथे लोकांकडे पैसे नाहीत. सर्व काही खूप महाग आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांनी चोरीचे प्रकारही सुरू केले आहेत.

सुशिक्षित लोक इतर देशांत निर्वासित झाले. उरलेल्यांनाही पळून जावेसे वाटते, पण संधी मिळत नाही. डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांनी ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली आहे. पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नाही. मात्र, सर्व आशावादी आहेत.

(सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही मुलीची ओळख किंवा ती कुठे राहते हे उघड केलेले नाही.)

जाहिदाने वर्षभरापूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यावेळचे वातावरण सांगितले होते. मला संधी मिळाली तर मीही देश सोडेन, असे लिहिले होते. मात्र, तीला अशी संधी कधीच मिळाली नाही. जाहिदाचं पहिलं पत्र वाचा...

या फोटोंमधून जाणून घ्या अफगाणिस्तानची स्थिती..

अफगाणिस्तानात सार्वजनिक शाळा बंद झाल्या आहेत. आता मशिदींमध्ये मुलींना कुराण वाचायला शिकवले जात आहे.
अफगाणिस्तानात सार्वजनिक शाळा बंद झाल्या आहेत. आता मशिदींमध्ये मुलींना कुराण वाचायला शिकवले जात आहे.
हा फोटो काबुलचा आहे. येथील बाजारपेठांवर लक्ष ठेवण्यासाठी तालिबानी सैनिक तैनात आहेत.
हा फोटो काबुलचा आहे. येथील बाजारपेठांवर लक्ष ठेवण्यासाठी तालिबानी सैनिक तैनात आहेत.
अफगाणिस्तानची मोठी लोकसंख्या उपासमारीच्या मार्गावर आहे. एका अहवालानुसार, 65% मुलांना अन्न मिळत नाही.
अफगाणिस्तानची मोठी लोकसंख्या उपासमारीच्या मार्गावर आहे. एका अहवालानुसार, 65% मुलांना अन्न मिळत नाही.

पंजशीर आणि अंदराब मध्ये बंडखोरांशी युद्ध

तालिबानने सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण देशावर नियंत्रण मिळवला असल्याचा दावा केला होता. वास्तविक, अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात अजूनही अनेक गटांनी याला आव्हान दिले आहे. पंजशीरमध्ये अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूदच्या नेतृत्वाखालील नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट तालिबानशी लढत आहे. बागलान प्रांतातील अंदराब मध्येही संघर्ष सुरू आहे.

बंड शमवण्यासाठी अनेक हत्या केल्या

यूएनच्या अहवालानुसार, तालिबान बंडखोरी दडपण्यासाठी अपहरण आणि हत्या करत आहेत. बंडखोर गटाचे समर्थक असल्याच्या संशयावरून या हत्या करण्यात आल्या आहेत. ताजिक आणि उज्बेक वंशाच्या लोकांना विशेषतः लक्ष्य केले जात आहे. पंजशीरमध्ये सर्वसामान्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. ह्युमन राइट्स वॉचच्या अहवालानुसार तालिबानने हजारो कुटुंबांना हेलमंद आणि बल्ख प्रांतातील त्यांच्या घरातून आणि जमिनीतून बाहेर काढले आहे.

माध्यमांवर करडी नजर, अनेक प्रकाशने बंद

तालिबानचे मीडियावर करडी नजर आहे. निर्बंधांमुळे, केवळ काही मीडिया संस्थाच रिपोर्ट करत आहेत. त्यांच्यावरही तालिबानचे बारीक लक्ष आहे. शेकडो प्रकाशने बंद झाली आहेत. तालिबानच्या विरोधात बातम्या दाखवण्यावर बंदी आहे. पडद्यावर दिसणाऱ्या महिलांसाठी चेहरा झाकणे अनिवार्य आहे. प्रसारमाध्यमांवरील सेन्सॉरशिपमुळे तेथील परिस्थिती जगाला कळू शकत नाही.

तालिबानचा दावा - परदेशी मदतीशिवाय सरकार चांगले चालवले

तालिबान नेते अनस हक्कानी म्हणतात की, गेल्या 40 वर्षांत पहिल्यांदाच संपूर्ण देशावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, देशात किती बदल झाला आहे ते तुम्ही पाहू शकता. आम्ही परकीय कब्जा संपवला. सरकार परदेशी मदतीशिवाय चांगले काम करत आहे. देशात आता एकही अतिरेकी गट सक्रिय नाही.

भारताने अपूर्ण प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची विनंती

भारताने 20 वर्षात अफगाणिस्तानमध्ये सुमारे 22 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या पैशांतून 400 हून अधिक लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवण्यात आली आहे. 1996 ते 2001 दरम्यान, जेव्हा देशावर तालिबानची सत्ता होती, तेव्हा भारताने अफगाणिस्तानशी संबंध तोडले होते. तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यावर भारतातील सर्व प्रकल्प ठप्प झाले. आता तालिबानने विनंती केली आहे की, भारताने अफगाणिस्तानमधील त्यांच्या अपूर्ण योजनांवर पुन्हा काम सुरू करावे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल कहर बल्खी म्हणाले की, आम्ही आमचे प्राधान्य भारताला कळवले आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी अफगाणिस्तानातून पळून अबू धाबीत

हा फोटो 14 ऑगस्ट 2021 चा आहे. त्यानंतर तालिबानने काबूलला वेढा घातला होता. दुसऱ्या दिवशी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले.
हा फोटो 14 ऑगस्ट 2021 चा आहे. त्यानंतर तालिबानने काबूलला वेढा घातला होता. दुसऱ्या दिवशी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले.

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे सध्या अबुधाबीमध्ये आहेत. तालिबान काबूलमध्ये घुसण्यापूर्वी त्यांनी देश सोडला. सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, एक दिवस मी अफगाणिस्तानला परत जाईल, अशी मला आशा आहे. ते माझे घर आहे. घनी म्हणाले की, तालिबानच्या सुटकेमध्ये देशासमोर गंभीर आव्हाने आहेत. मला माझ्या देशाला मदत करायची आहे. याचाही विचार जगाने करायला हवा.

बातम्या आणखी आहेत...