आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Tamasha Artist, Garbage Collector, Savior Of Widows And Orphans; Annapurna Meena Bhosle Who Is Preventing The Hunger Of The Deprived

कोरोना महिला योद्ध्यांच्या यशोगाथा:तमाशा कलावंत, कचरावेचक, विधवा-निराधार, अनाथ बालके यांच्या तारणहार; वंचितांची उपासमारी रोखणाऱ्या अन्नपूर्णा मीना भोसले

अमोल पाटील | धुळे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाहतुकीमुळे ठप्प झालेले एआरटी उपचार पूर्ववत केले

काेराेनाकाळात कुठे प्रशासनातील कडी म्हणून, कुठे दवाखान्यातील सेवा म्हणून तर कुठे थेट सामाजिक बांधिलकीचा वसा जपत माणुसकीचे कर्तव्य पार पाडणाऱ्या ‘मिळून साऱ्याजणीं’च्या यशोगाथांवर महिला -बालविकास विभाग आणि ‘दिव्य मराठी’चा प्रकाशझोत.

वंचितांची उपासमारी रोखणाऱ्या अन्नपूर्णा मीना भोसले

लॉकडाऊन जाहीर झाले आणि परिघावरील वंचितांच्या खाण्याचेही हाल सुरू झाले. केंद्र सरकारने मोफत रेशनची घोषणा करण्याआधीच, धुळ्याच्या मीना भोसले या साऱ्यांसाठी मदतीचा आधारस्तंभ बनल्या. कोरोनाच्या संकटाचे त्यांनी जनसेवेच्या संधीत रूपांतर केले.

हाताला काम नाही, खायला दाणा नाही अशा कात्रीत सापडलेल्या वंचित समूहाचे प्रश्न धुळ्याच्या मीनाताईंनी अचूक हेरले आणि सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या माध्यमातून त्वरित मदत कार्याला सुरुवात केली. धुळे शहरातील साक्रीरोड परिसरात वास्तव्यास असलेल्या तमाशा कलावंतांवर, महामार्गावर पोट भरणाऱ्या तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ आली होती. मीनाताईंनी त्यांच्यापर्यंत घरपोहाेच किराणा पोहोचवला. देहविक्री करणाऱ्या महिलांच्या खाण्याचे हाल सुरू झाले होते. घरकाम करणाऱ्या महिलांचे उत्पन्न तुटले होते. निराधार विधवा, कचरावेचक महिला, साऱ्यांचे डबे रिकामे पडले होते. मीनाताईंच्या संस्थेने अशा तीनशे वंचित कुटुंबांपर्यंत किराणा, मास्क आणि सॅनिटायझर पोहोचविले.

झोपडपट्टीमध्ये जाऊन ऑक्सिमीटरच्या साहाय्याने तपासणी व तापमानाची तपासणी केली. छत्तीस दिव्यांग कुटुंबांना आधार दिला. भिक्षा मागून पोट भरणाऱ्या ५० अनाथ मुलांच्या भोजनाची व्यवस्था केली. ममता महिला आश्रमात महिनाभराचा किराणा भरला तसेच मुला-मुलींच्या सुधारगृहात सॅनिटायझर आणि मास्क पाठवले. शहराची काळजी घेणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा साधने पुरविली. मोफत रेशन सुरू झाल्यावर ते आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. काही गावांना पिण्याच्या पाण्याचे मोफत टँकरही उपलब्ध करून दिले. खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांना दोन वेळच्या डब्याची व्यवस्था केली.

वाहतुकीमुळे ठप्प झालेले एआरटी उपचार पूर्ववत केले

एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी नित्यनियमाने घ्यावयाच्या एआरटी उपचारांमध्ये लॉकडाऊनमुळे खंड पडण्याचा धोका निर्माण झाला होता. या उपचारातील खंड आरोग्याची जोखीम वाढवणारा. ती टाळण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील १५७ रुग्णांना एआरटी औषधे घरपोच दिली. वेळोवेळी आरोग्य तपासणीसाठी समुपदेशन केले.

बातम्या आणखी आहेत...