आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ऑनलाइनवरही भारी, शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी; व्हॉट्सअॅपवर अभ्यास देऊन राेज 48 विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी

नितीन पोटलाशेरू | कळमनुरी (हिंगोली)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंजकर आजही मुलांच्या दारी जाऊन गृहपाठ तपासत आहेत. - Divya Marathi
गुंजकर आजही मुलांच्या दारी जाऊन गृहपाठ तपासत आहेत.
  • मुख्याधिकारी, एमबीबीएस डॉक्टरांचे पाल्य गुंजकरांच्या शाळेत

गावातल्या चिंचोळ्या गल्लीतून जाताना कुठं मोठ्या दगडावर धुणी आपटण्याचा आवाज, तर कुठं खराट्याने अंगणातील पाणी लोटले जात होते. तितक्यात दारासमोर येऊन शिवानीच्या नावाने कुणीतरी हाक दिली. ती ऐकताच वही हातात घेऊन शिवानीने तिच्या दाराची कुजलेली चौकट ओलांडली. जोडीला श्रेया, मोहिनी अन् रागिणी या मैत्रिणी होत्या. पाहता पाहता तिच्या दारातच शाळा भरली. चक्क शाळेतले मास्तरच सर्वांचा गृहपाठ तपासत अभ्यासाबद्दल सूचना करत होते. हे फक्त एका दिवसाचे चित्र नव्हे, तर लॉकडाऊन सुरू झाल्याच्या साडेतीन महिन्यांपासून न चुकता देविदास गुंजकर गुरुजी शिक्षणाची ज्ञानगंगा चिमुकल्यांच्या दारापर्यंत पोहोचवत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीच्या पश्चिमेला अवघ्या ५ किमी अंतरावर पुयना हे एक हजार लोकवस्तीचे गाव. ६४ पटसंख्या असणाऱ्या जि.प. प्राथमिक शाळेत देविदास गुंजकर (३८) हे पहिली ते चौथीला शिकवतात. अध्यापनातील स्वत:चा पॅटर्न निर्माण करणाऱ्या या शिक्षकाने लॉकडाऊनच्या काळातही शिक्षण देण्याचे काम थांबवले नाही.

मुख्याधिकारी, एमबीबीएस डॉक्टरांचे पाल्य गुंजकरांच्या शाळेत :

गुंजकर यांच्या शिकवण्याची पद्धत आणि त्यांचा पॅटर्न पाहता कळमनुरीतून जवळपास १५ विद्यार्थी पुयनाला येऊन शिकतात. विशेष म्हणजे यात वसमतचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोकराव साबळे यांचा मुलगा अर्णव व कळमनुरीतील एमबीबीएस डॉक्टर शाम वाढोणकर यांच्या दोन मुली गुंजकरांच्या शाळेत शिकत आहेत. नोकरी म्हणून काम करण्यापेक्षा सेवा म्हणून अध्यापन महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे आणि मी तेच करतोय, असे गुंजकर अभिमानाने सांगतात.

पहिली ते चौथीचे वेगवेगळे व्हॉट्सअॅप ग्रुप

गुंजकर गुरुजींनी व्हॉट्सअॅपवर पहिली ते चौथीचे चार वेगळे ग्रुप बनवले. त्याप्रमाणे प्रत्येक वर्गासाठी अभ्यासाची ऑनलाइन शीट तयार केली. ती शीट त्या त्या ग्रुपवर शेअर करून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ते १०.३० पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या दारी जाऊन तपासतात व न कळालेल्या गोष्टी मुलांना समजावून सांगतात. गुंजकर सर कळमनुरीला राहतात, पण दुचाकीने पुयनाला जातात. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या काळात सर्वेक्षणाच्या कामासह चेक पोस्टवरील ड्यूटी करता करता त्यांनी ऑनलाइन गृहपाठ टाकण्याचे काम अविरतपणे सुरूच ठेवले. दरराेज दुपारी २ वाजेपर्यंत ते शाळेच्या कामात व्यग्र असतात. आठवडाभरात केलेल्या अभ्यासावर रविवारी मुलांची परीक्षा घेतली जाते. मागील चार महिन्यांत त्यांनी रविवारचीही सुटी घेतली नाही.

पालकांनाही केले डिजिटल साक्षर : 

पुयनातील बहुतांशी पालक हे शेतमजूर किंवा शेतकरी आहेत. त्यांना मोबाइलची माहिती नव्हती किंबहुना १५ पालकांकडे तर मोबाइलही नव्हता. पहिले त्यांना मोबाइल घेण्यास भाग पाडले व नंतर व्हॉट््सअॅपबद्दलचे प्रशिक्षण दिले.

प्रेरणादायी काम : 

गुंजकर यांच्या कार्याचे करावे तेवढे काैतुक कमी आहे. काेराेनाच्या काळातही त्यांनी फिजिकल डिस्टन्स, मास्क लावत सुरक्षेची काळजी घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पाेहाेचवले. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. - संदीप साेनटक्के, शिक्षणाधिकारी, हिंगाेली.

बातम्या आणखी आहेत...