आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष:शिक्षणव्यवस्थेतील सांस्कृतिक समानता

लेखक: विनायक काळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय अभ्यासक्रमातून मुलांना साक्षर करणे एवढेच उद्धिष्ट असू नये तर एकमेकांबद्दल तिरस्कार, द्वेष व उच्चनीचपणाची भावना कमी करण्यासाठीचे धडे शालेय जीवनामध्येच दिले पाहिजेत. त्याआधारे प्रत्येक घटकातील विद्यार्थांमध्ये सामाजिक जाणिवांची निर्मिती होईल याचा विचार झाला पाहिजे. जेणेकरून उद्याचा समाज घडविणाऱ्या पिढीची मानसिकता विषमता विरहीत असेल आणि अशा पिढ्यांचा सामाजिक, सांस्कृतिक समानता येण्यासाठी हातभार लागेल.

काही दिवसांपूर्वी दिल्ली विद्यापीठाने प्रख्यात लेखिका महाश्वेता देवी यांच्यासह बामा व सुकरिथरणी या तमीळ महिलावादी दलित लेखिकांच्या लघुकथा इंग्रजी अभ्यासक्रमातून वगळल्या आहेत. त्यामुळे संबंधीत विद्यापीठावर वेगवेगळ्या माध्यमातून टीका होत आहे. एका बाजूला कोरोनाकाळात मुलांवरचे शैक्षणिक ओझे कमी करण्याच्या दृष्टीकोनातून बऱ्याच अभ्यासक्रमात कपात केल्याची बरीच उदाहरणे आपल्याकडे आहेत तर दुसरीकडे शालेय, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून दलित साहित्याला वगळण्याच्या घटनांत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्ली विद्यापीठाने २०१८ साली कांचा इलैया यांची दोन पुस्तके (व्हाय आई एम नॉट अ हिंदू, गॉड एज़ पॉलिटिकल फिलॉसफर आणि पोस्ट-हिंदू इंडिया) राज्यशास्त्राच्या अभ्याक्रमातून काढून टाकण्याची शिफारस केली होती. याच वर्षी हिमाचल प्रदेशात भाजप सरकार सत्तेत आले. तत्कालीन राज्य सरकारच्या वतीने प्रसिद्ध दलित लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांची ‘झूटन’नावाची आत्मकथा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा खोडसाळ प्रयत्न केला होता. २०१९ मध्ये एनसीईआरटीने मार्च महिन्यात नववीच्या इतिहासातील वेशभूषा आणि जातीसंघर्षावरील प्रकरण वगळले. पुढे त्याचाच कित्ता सीबीएसईने जुलै, २०२० मध्ये गिरवला. तिकडे आसामातील भाजपाच्याच सरकारने लगेचच सप्टेंबर, २०२० मध्ये १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रमातून मंडल आयोग आणि इंग्रजीतील "मेमरीज ऑफ चाइल्डहूड' हा धडा वगळला जो अमेरिकेतल्या लेखिका व समाजसुधारक झित्कला सा आणि भारतातील दलित तामिळ लेखिका व शिक्षक बामा यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे.

“गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही” असा बाबासाहेबांनी दिलेला क्रांतिकारी विचार लक्षात घेऊन दलित साहित्याची निर्मिती झाली. सबंध साहित्याने शोषित-पिडीत समाजाला आत्मभान जागृत करण्याची प्रेरणा दिली आणि भारतीय समाजाचा खरा चेहरा येणाऱ्या पिढीसमोर दाखवून दिला.

पूर्वीच्या काळात तथाकथित उच्चजातीयांना अस्पृश्यांच्या स्पर्शाने विटाळ व्हायचा म्हणून त्यांना गावकुसाबाहेर ठेवले जायचे. हे सगळं थांबलं पाहिजे म्हणून अनेक हितचिंतकांनी समाजातील रूढी, प्रथा, परंपरा, भेदभाव याला जोरदार विरोध केला होता. साधुसंतांनी अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले व प्रचलित समाजव्यवस्थेवर कोरडे ओढले. त्यांनी माणसांमाणसामध्ये भेदभाव करणे अमंगल बाब आहे असे ठणकावले तरीही प्रस्थापितांच्या मानसिकतेत फरक पडला नाही. दुर्दैवाने तीच पक्षपाती मानसिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनैसर्गिकपणे हस्तांतरित केली. आता पूर्वाश्रमीच्या अस्पृश्याच्या स्पर्शाने विटाळ होत नाही परंतु त्यांच्या लिखाणाचा विटाळ होत असल्याने त्यांचे साहित्य अभ्यासक्रमातून दूर ठेवण्याचा घाट घातला जात आहे. आधुनिक भारतात फुले, शाहू, आंबेडकरांनी शिक्षणात दैदिप्यमान, भरीव आणि मोलाची कामगिरी केली असली तरीही क्रमिक पाठ्यपुस्तकात त्यांचा उल्लेख प्रतिकात्मक पातळीवरच पाहायला मिळतो. देशात आणि राज्यात बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दलित लेखकांची एक फळीच तयार झाली. त्यांनी दलितांच्या व्यथा कथा-कादंबऱ्या, चरित्र-आत्मचरित्रातून समाजासमोर मांडले. या साहित्याचा बोटावर मोजण्याइतपत विद्यापीठांनी अभ्यासक्रमात समावेश केला.

प्राचीनकाळी गुरुकुल शिक्षणपद्धती होती जिथे फक्त उच्च्जातीयांना शिकण्याची मुभा असायची आणि ‘संस्कृत’ ही शिकण्याची मुख्य भाषा असायची. तत्कालीन भारतीय शिक्षणव्यवस्थेला, अभ्यासक्रमाला जाती, धर्म आणि परंपरेचा मोठा आधार होता. त्यामुळे प्रस्थापितांनी खालच्या जातीतील लोकांना समाजातून बेदखल करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे शिक्षण हे विशिष्ट समाजानेच ग्रहण केले आणि त्याकाळची शिक्षणव्यवस्था त्यांच्या सोयीप्रमाणे निर्माण केली. दुर्दैवाने आजही शिक्षणव्यवस्था तशीच टिकून राहण्यासाठी प्रस्थापितांकडून येनकेनप्रकारेण केले जात आहेत. त्यामुळे शिक्षणाचा मूळ उद्देश बाजूला राहिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन वृध्दिंगत करणे, प्रश्न विचारण्याची मुभा असणे, आत्मभान जागृत करणे आणि समाज सुसंस्कारित व्हावा म्हणून अध्ययन-अध्यापनाच्या पद्धतीत सुधारणा घडवून आणणे असे उद्देश समोर ठेवून अभ्यासक्रम तयार करायला पाहिजे. परंतु आजतागायत संधिसाधू राजकारण्यांनी असे होवू दिले नाही. ‘प्रचलित शिक्षण हे जातीचे रक्षण’ करत असून आपल्या शिक्षणव्यवस्थेत पूर्वग्रहदूषित अभ्यासक्रमालाच प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे सामाजिक समतोल ढासळत असून भारतातील मानवी समाज सामाजिक प्रश्न सोडवण्यास सपशेल अपयशी ठरत आहे. प्रस्थापितांनी आपल्या शिक्षणव्यवस्थेत छुपा अभ्यासक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घुसडला.

इतिहासात डोकावले तर असे दिसते की, आपल्या देशाला शिक्षणाची एक अभूतपूर्व अशी परंपरा लाभली होती. याच देशातील नालंदा, तक्षशीला, पुष्पगिरी, विक्रमशीला, जगद्दल, ओदांतपुरी आणि वलभी यासारख्या विश्वविद्यालयांची कीर्ती सातासमुद्रापलीकडे गेली होती. यापैकी नालंदा विश्वविद्यालयात अनेक प्रकारची मते आणि विचारधारा असणारे विद्यार्थी शिकत असूनही तेथे बंधुभावाचे जीवन होते. तसेच तेथे लोकशाही पद्धतीचे व्यवस्थापन आढळून येत होते. त्याकाळी भारतात शिक्षण घेतलेल्या ह्यु-एन-त्स्यंग चिनी विद्वानाने म्हटले होते की नालंदाच्या सातशे वर्षाच्या काळात तेथे बंडाळी माजली नव्हती. सर्वाना समान वागणूक व समान दर्जाचे शिक्षण मिळत असे. यामुळे समानतावादी तत्वप्रणालीवर आधारलेल्या विश्वविद्यालयात अनेक विदेशी लोक शिक्षण घ्यायला येत असत. अशा ठिकाणी समाजातील विघातक चालीरीतींवर नेहमीच चर्चा होत असे.

आपण इतिहासाकडून काही शिकतो की नाही हाच प्रश्न पडतो. काही महिन्यापूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली (इग्नू) विद्यापीठाने बुद्धिमत्तेला थारा न देणारा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम उघडपणे सुरु केला आहे. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालून शोषितांचे शोषण करण्याऱ्या व्यवस्थेला अजून बळकटी देण्याचे काम सुरु आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेत अभ्यासक्रमाला व पाठ्यपुस्तकाला अनन्यसाधारण महत्व आहे. शालेय अभ्यासक्रमातून मुलांना साक्षर करणे एवढेच उद्धिष्ट असू नये तर एकमेकांबद्दल तिरस्कार, द्वेष व उच्चनीचपणाची भावना कमी करण्यासाठीचे धडे शालेय जीवनामध्येच दिले पाहिजेत. त्याआधारे प्रत्येक घटकातील विद्यार्थांमध्ये सामाजिक जाणिवांची निर्मिती होईल याचा विचार झाला पाहिजे. जेणेकरून उद्याचा समाज घडविणाऱ्या पिढीची मानसिकता विषमता विरहीत असेल आणि अशा पिढ्यांचा सामाजिक, सांस्कृतिक समानता येण्यासाठी हातभार लागेल. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा पुस्तकातच न राहता भारतीय समाजात खऱ्या अर्थाने “समान भारतीयत्वाची भावना’ जागृत होईल.

संदर्भ:- बौद्ध शिक्षण पद्धती (२०१३)- मा. शं. मोरे, कौशल्य प्रकाशन.

https://www.thehindu.com/news/cities/Delhi/du-suggests-banning-kancha-ilaiahs-books-from-ma-syllabus/article25315696.ece

https://marathi.thewire.in/assam-class-12-syllabus-1984-2002-riots-ayodhya-mandal

(लेखक प्रोजेक्ट ऑफिसर सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, पुणे येथे कार्यरत आहेत.)

vinayak1.com@gmail.com

बातम्या आणखी आहेत...