आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष:शिक्षण क्षेत्रातील आधुनिक भगीरथ...खुशालद्दिन शेख

लेखक: उमेश घेवरीकर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपक्रमशीलता, विद्यार्थीहिताची कणव, सामाजिक बांधिलकी ही शिक्षक होण्यासाठी असलेली अंगभूत वैशिष्ट्ये आहेत, मात्र आज शिक्षकांमध्ये हे गुण वाळवंटात जिवंत पाण्याचा झरा सापडावा इतके दुर्मिळ झाले आहेत. या परिस्थितीत ‘दधीची’ बनून आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या या खुशालद्दिन शेख सर नावाच्या या ‘आधुनिक भगीरथाला’ समाजाने अनमोल ठेवा म्हणून जपायला आणि जोपासायला हवे.

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी महात्मा गांधींच्या निधनानंतर असे म्हटले होते की, ‘असा हाडामासाचा माणूस पृथ्वीवर होऊन गेला यावर भावी पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत’, याच धर्तीवर एखाद्या वाडी-वस्तीवरील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आपल्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी स्व:त कर्ज काढून शाळेचे रंग रूप बदलून टाकतो,कोरोनाकाळात गरीब कष्टकरी पालकांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून कर्ज काढून शिक्षण प्रवाह अखंडित ठेवतो आणि शिक्षण क्षेत्रात आज परवलीचा शब्द बनलेल्या ‘पुरस्कार आणि प्रसिद्धी’ पासून कटाक्षाने दूर राहून फक्त विद्यार्थी कल्याणासाठी “दधिची” बनून आपले सर्वस्व पणाला लावतो, असे कुणी सांगितले तर त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. कारण शिक्षण क्षेत्रात आजकाल इतके सकारात्मक आणि शुभंकर असे काही घडतच नाही. पण हे सारे अविश्वसनीय वाटत असले तरी निखळ सत्य आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी येथील सांगोलेकर-गवळी वस्ती वरील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ‘खुशालद्दिन शेख’ असे या अवलियाचे नाव असून शिक्षण क्षेत्रातील हा ‘आधुनिक भगीरथ’ राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नावरील संजीवक उत्तरे केवळ विद्यार्थीहित, शिक्षकीपेशावरील निष्ठा ,गरीब-वंचित विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाची आंतरिक तळमळ या वैशिष्ठ्यांमुळे देत असून शिक्षणातील सकारात्मक मानसिक बदलाचे ते शुभंकर चिन्ह ठरते आहे.

उपक्रमशीलता, नाविन्याचा ध्यास, बदलत्या काळातील आव्हाने ओळखून ती पेलण्याची दूरदृष्टी आणि याच्या जोडीला आपल्या समोरील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यामध्ये स्वत:च्या मुलाचा चेहरा पाहण्याची आंतरिक मातृहृदयी कणव ही सानेगुरुजींच्या संकल्पनेतील आदर्श शिक्षकाची सारी वैशिष्ठ्ये त्यांच्यात जणू ‘इनबिल्ट’ असावीत तशी भिनलेली आहेत..

दोन वर्षांपूर्वी शेख सर या शाळेत दाखल झाले. शाळेपर्यंत पोचण्यासाठी धड रस्ता आजही नाही. विद्यार्थी संख्या जेमतेम. मेंढपाळ आणि उसतोडणी कामगार कष्टकरी यांची ही वस्ती. पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट. ही सारी आव्हाने पेलत त्यांनी ‘कुणाला काही मागायचे नाही, सुधारणेची सुरुवात स्वत:पासून करायची’ या त्यांच्या तत्वाप्रमाणे दीड लाखाचे कर्ज काढून संगणक, प्रोजेक्टर आदी साहित्य खरेदी करून शाळा डिजिटल बनवली. रंगरंगोटी करून शाळेचे अंतरंग व बाह्यरूप प्रसन्न केले. परंतू काही दिवसात कोरोनाचे संकट उभे राहिले आणि प्रत्यक्ष वर्गअध्यापन बंद झाले. आपल्या वर्गातील गोर गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून त्यांनी पुन्हा कर्ज काढून वर्गातील आठ विद्यार्थ्यांना प्रत्येकी आठ हजारांचे मोबाईल घेऊन देत गेली दोन वर्षे त्यांच्या रिचार्जचा खर्च सुद्धा स्वत: केला. शाळा सुरु होईल तेंव्हा कोरोनाची भीती मुलांच्या मनात राहू नये म्हणून त्यांनी मुलाचे भावविश्व आनंदी आणि प्रसन्न ठेवणारी अनोखी संकल्पना राबवत राज्यात सर्वप्रथम ‘डिजिटल जंगल क्लासरुम’ तयार केली.ही कल्पना थेट रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनशी नाते जोडणारी! वर्गात मुलांनी प्रवेश करताच त्यांना जंगलात आल्याचा भास होतो,वर्गाच्या भिंतीवर प्राणी पक्षी झाडे यांची चित्रे, जोडीला प्राणी, पक्षी, झरे, पाऊस, विजा यांचे आवाज ऐकवणारी डॉल्बी सिस्टीम, जंगलात रात्रीचा भास व्हावा असे विद्युत दिवे! वर्गात बसूनही मुले निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा आनंद घेत शिकू लागली. यासाठी त्यांनी पुन्हा चार लाखांचे कर्ज काढून मुलांचे शिकणे आनंददायी केले आहे.

कष्टकरी पालकांना शाळेत येण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून त्यांनी वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पालकांना थेट त्यांच्या मोबाईलवर वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया पाहता येईल अशी व्यवस्था केली. एकूणच शिक्षण क्षेत्रात इतकी पारदर्शकता दुर्मिळच म्हणावी लागेल. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्लंड, अमेरिका, जपान या प्रगत देशात वापरला जाणारा ऐंशी इंचाचा ‘इंटर रीअक्टीव एलईडी’ उपलब्ध व्हावा हे त्यांचे स्वप्न असून त्यासाठी आवश्यक जवळपास १५ लाखांचे कर्ज काढण्यासाठी ते आज बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. पण तिथे आडवे येत आहेत ते संवेदनाशून्य आणि फक्त व्यावहारिकता जोपासणारे नियम. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले तर तर ही सुविधा देणारी ती देशातील पहिली जिल्हा परिषद शाळा ठरेल! इतके करून ते थांबत नाहीत तर ऑनलाईन पद्धतीने दिलेला अभ्यास मुले घरी करतात की नाही हे तपासण्यासाठी ते प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन रोज "ऑफलाईन' पद्धतीने तपासणी करतात. दिवसभराचा सगळा वेळ शाळेसाठी दिल्यानंतर कुटुंबाच्या वाट्याला ते क्वचितच येत असतील. कारण संध्याकाळी त्यांचे शिक्षकांसाठीचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु होतात ते रात्री उशिरापर्यंत सुरु रहातात.पण कुटुंबाची त्याबद्दल तक्रार नाही आहे ते कौतुक आणि अभिमान !

विद्यार्थाची शैक्षणिक प्रगती ही त्यांना लाभणाऱ्या शिक्षकांच्या दर्जावर अवलंबून असते. म्हणूनच राज्यभरातील शिक्षकांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे महत्वाचे काम शेख सर एकाहाती करत असून कोरोनाकालात राज्यात एकही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ते शिक्षकांना मोफत प्रशिक्षणे देत आहेत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण पोचवण्याची त्यांची धडपड अविरत सुरु आहे.कोरोनाकाळ हे संकट न मानता त्यांनी त्यातही संधी शोधली आणि अव्याहतपणे राज्यातील शिक्षकांना तंत्रस्नेही बनवणाऱ्या मोफत ‘व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा’ घेतल्या. गेल्या दोन वर्षात त्यांनी राज्यभरातील वीस हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले असून प्रशिक्षक घेतलेले शिक्षक आज राज्यभर दर्जेदार व प्रभावी पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. त्यांनी प्रत्येक इयत्तेसाठी शैक्षणिक अॅप तयार केले असून त्याचा वापर राज्यभरातील हजारो शिक्षक व विद्यार्थी करत आहेत. आगामी काळात राज्यातील तीन लाख शिक्षकांपर्यंत पोचून त्यांना मोफत प्रशिक्षण देऊन तंत्रस्नेही करत कोरोना सारख्या संकटावर मात करत शिक्षण प्रवाह अखंड ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.

एखाद्या सरकारी खात्याने करावे इतके प्रचंड काम ते शिक्षण क्षेत्रातील ‘वन मन आर्मी’ बनून करत आहेत तरीही त्यात कुठेही अहंकार किंवा थकवा दिसत नाही. ‘सारे काही पुरस्कारासाठी’ अशी आजच्या शिक्षणाची अवस्था असताना, पालक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हा सर्वात अनमोल पुरस्कार अशी त्यांची धारणा थेट सानेगुरुजींच्या विचारधारेशी असलेली त्यांची बांधिलकी दर्शवते. आज अनेक संस्था त्यांना देणगी किंवा पुरस्कार स्वीकारण्यासाठी विंनती करत असतात पण ते नम्रतेने नकार देतात. याचे कारण त्याच्या मनाच्या सौंदर्यात दडलेले दिसते. ‘आपले जीवित कार्य संपवून आपण जेंव्हा इथून जाऊ तेंव्हा तो सर्वशक्तिमान आपल्याला जीवित कार्याचा हिशोब विचारेल तेंव्हा स्वत:साठी नाही पण शिक्षक म्हणून काम करताना मी समाजासाठी काय केले हे मला सांगता यायला हवे’, हा त्यांचा विचार समाजातील अनेकांना वैचारिक कोतेपणाची, आत्मकेंद्रित दृष्टीकोनाची जाणिव करून देत अनेकांच्या डोळ्यात अंजन घालतो.

सोलपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी तसेच तेथील शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या शाळेला भेट देऊन त्यांच्या उपक्रमाचे जिल्ह्यात सार्वत्रिकीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पण गरज आहे ती त्याही पलीकडे जाऊन राज्याच्या शिक्षण खात्यातील धुरिणांनी आपला नेहमीचा सरकारी खाक्या बाजूला ठेऊन सरांच्या कल्पकतेचा आणि उपक्रमशीलतेचा उपयोग राज्यातील शिक्षणासाठी आणि शिक्षकांसाठी करून घेण्याची.तसे झाल्यास आज राज्यातील शिक्षणक्षेत्रासमोर उभ्या असलेल्या अनेक प्रश्नाची सोडवणूक करता येणे अशक्य नाही..

उपक्रमशीलता, विद्यार्थीहिताची कणव, सामाजिक बांधिलकी ही शिक्षक होण्यासाठी असलेली अंगभूत वैशिष्ट्ये आहेत, मात्र आज शिक्षकांमध्ये हे गुण वाळवंटात जिवंत पाण्याचा झरा सापडावा इतके दुर्मिळ झाले आहेत. या परिस्थितीत ‘दधीची’ बनून आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या या ‘आधुनिक भगीरथाला’ समाजाने अनमोल ठेवा म्हणून जपायला आणि जोपासायला हवे. इतुकेची मागणे फक्त...उतरावे खडूमध्ये रक्त... ! हेच जीवन ध्येय मानलेले शेख सर राज्याच्या नव्हे तर देशाच्या शिक्षणाक्षेत्रातील खरेखुरे आयकॉन आहेत.

umesh.ghevarikar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...