आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष:जोपर्यंत शिक्षक शिक्षणाच्या प्रति समर्पित आणि प्रतिबद्ध होत नाही, तोपर्यंत शिक्षणाला मोहिमेचे स्वरूप प्राप्त होणार नाही

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय तत्वज्ञानाचे भाष्यकार,

भारताचे माजी दुसरे राष्ट्रपती,

आदरणीय, वंदनीय,

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन.

शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा महत्वाचा घटक आहे. शिक्षकीपेशा हा पेशा म्हणून न पाहता हे व्रत समजून स्विकारले तर आपल्या बुद्धीचा आपल्या क्षमतेचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सर्वांगीण प्रगतीसाठी किती आणि कसा होवू शकतो, यावर खरं कौशल्य शिक्षकांचे आहे. योग्य वापर नाही केला गेला तर कौशल्याचे डबके होण्यास वेळ लागत नाही. डबके होऊन पाणी गढूळ करावे की, वाहत्या झऱ्याप्रमाणे त्यावर राजहंसासारखे आसनस्थ व्हावे, हे वेगळे सांगणे नको.

आपल्या या पावन भूमीत अनेक थोर संत महात्मे होऊन गेले, त्यांच्या गाथा आपण आजही वेगवेगळ्या रूपाने ऐकतो, वाचतो, त्याचप्रमाणे, अनेक थोर पुरुष, अमर हुतात्मे देखील आपल्याला लाभले. त्यापैकी एक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन एक व्रतस्थ आणि शिक्षणाला योग्य न्याय देणारे एक कर्तृत्ववान राष्ट्रपती, त्यांच्या जन्मदिनी सादर नमन.

त्यांच्या या जन्मदिनी शिक्षक म्हणवून घेणाऱ्यांनी स्वतः ला स्वतः सोबत पडताळले पाहिजे, विद्यादानाचा विडा जेव्हा आपण उचललेला असतो, तेव्हा आपले अर्धेअधिक आयुष्य विद्यादानात विद्यादानासाठी खर्ची घालतो अन्नदानात आपण एक दिवस भुकेलेल्यांचे पोट भरवू शकतो. परंतु, विद्यादानाच्या पवित्र दानात आपण पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो, एवढी ताकद विद्यादानात आहे. परंतु, आपण ते कसे करतो? का करतो? हे प्रथम स्वतः ला विचारून स्वतः लाच प्रामाणिकपणे उत्तर देणे महत्वाचे ठरेल. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक, दार्शनिक विचारवंत होते. त्यांच्या आयुष्यात त्यांना तीन प्रश्न नेहमी पडत असत.

1) नितिमान पण चिकित्सक विद्यानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल?
त्या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होवू शकेल का?

2 ) भारतीय तत्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषा शैलीत आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल?

3) मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?

या तीनही प्रश्नात आपण आधुनिक पद्धतीने खूप काही देवू शकतो. इतका सर्व बाजूने आजच्या काळात शैक्षणिक साचा तयात आहे. परंतु, दुर्दैवाने आधुनिकतेच्या नावाखाली आधुनिकतेच्या युगात आपण फक्त स्वतः ला स्वतः च्या कुटुंबाला स्वतः च्या राहणीमानाला आधुनिक करून घेतले, ही खंत अंतर्मनाला फार सलते.

शैक्षणिक गुणवत्तेचा आयता साचा तयार करून देखील शिक्षणासारख्या महान विद्यादानाच्या कार्याची कृतज्ञता म्हणून आपले सरकार पूर्णपणे त्या ज्ञानाचे योग्य मानधन आपल्या पदरात अपेक्षेपेक्षा, क्षमतेपेक्षा खूप देते. मग आपण या धनाचे मानाचे देणे लागतोच लागतो. त्या मोबदल्यात आपण काय आणि किती देतो, हा प्रश्न आपल्या अंतरात्म्यापर्यंत गेला पाहिजे, त्याचा आवाज आपण ऐकला पाहिजे, ऐकू आला पाहिजे.

कुटुंबाची जबाबदारी, कर्तव्ये, सणवार, विधी,अध्यात्म हे सर्व सोपस्कार आपण स्व सहित तन -मन- धनाने समर्पित करतो, तसं विद्यादान हा सोपस्कार तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्वाचा आहे,असे खूप मनातून वाटते. चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध असायलाच हवे.

प्रा- प्राथमिक

वि- विद्येचा

शि- शिक्षणाचा पाया पूर्णपणे

क्ष - क्षमतेने वापरणारा

- कर्तव्यदक्षतेने कटिबद्ध असणारा व्यक्ती म्हणजे प्राथमिक विभाग शिक्षक असावा, असे वाटते.

राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, कृष्ण जन्म हे दरवर्षी आसपासच येतात. या सुवर्णक्षणाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. पद्मा गोळेची कविता आवर्जून आठवली.. कृष्ण पाठीशी हवा, कृष्ण तर पाठिशी आहेच. पण आपल्या अंतरंगात राधाकृष्णन आहे, हा विचारच मनाला तरळून नेणारा ठरावा. शास्त्रीय वैचारिकतेतून बौद्धिक पातळीवर राधाकृष्णन भिनावे, हृदयस्थ भावनिक अंतरपटलावर गोपाळकृष्णमय व्हावे, म्हणजे आयुष्यच कृष्णमय निश्चित होईल. एक दिवसाच्या स्मृतीसाठी नाही तर, अखंड चालणाऱ्या या कार्याप्रती या चिंतनाचा संकल्प केला तर आयुष्यच साधना होईल.

जाता जाता वंदना विटणकारांच्या ओळी आठवल्या.. भेटतो देव का, पूजनी अर्चनी पुण्य का लाभते, दानधर्मातुनी शोध रे दिव्यता, आपुल्या जीवनी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी

लेखक: मधुरा संदीप रोंगे
व्यवस्थापक, योगेश्वरी शिक्षण संस्था.
8830825397

बातम्या आणखी आहेत...