आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष:जगातील पहिली आजींची शाळा...

लेखक: आशिष निनगुरकर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकाला राष्ट्र निर्माणकर्ता म्हणतात. शिक्षकांची जबाबदारी ही आहे की, विद्यार्थ्यांना जगण्याच्या सर्व कलेत पारंगत होतील आणि समाजात सभ्य नागरिक म्हणून वावरतील. त्याद्वारे एक मजबूत समाज आणि राष्ट्र निर्माण करू शकतील. देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या या दिवसाच्या निमित्ताने या अशा एका कर्तव्यदक्ष शिक्षकाची घेतलेली भेट अजूनही मनात रुंजी घालत आहे.

एका सिनेमाच्या निमित्ताने लोकेशन शोधत असतांना "आजींच्या शाळेबद्दल" माहिती मिळाली. मी व दिग्दर्शक युसूफ खान आम्ही त्यावेळी पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील 'फांगणे' गावात गेलो आणि मग या शाळेबद्दल आगळीवेगळी माहिती मिळाली. "नमस्कार करून सांगणे, गावाचे नाव फांगणे' असा गावाच्या सुरवातीला फलक बघून उत्सुकता वाढू लागली.एक अनोखी शाळा म्हणून मुरबाड तालुक्यातील 'फांगणे' गावाची 'आजीबाईंची शाळा' जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. गुलाबी रंगाच्या नऊवारी साड्या नेसलेल्या,नथ घातलेल्या आजीबाई पाठीवर दप्तर घेऊन रोज दुपारी शाळेत जातात. या गावच्या सरकारी शाळेतील एक शिक्षक योगेंद्र बांगर सर यांच्या कल्पनेतून ही शाळा सुरु झाली. तेव्हाच या विषयावर सिनेमा करायचा हे ठरवले आणि या सिनेमाच्या निमित्ताने "फांगणे" गावात जाणे-येणे सुरू झाले. योगेंद्र बांगर सरांची भेट म्हणजे एक विद्यापीठ आहे. या शाळेत असलेले विद्यार्थी लहान मुलं नाहीत, तर चक्क वयस्कर आजीबाई आहेत. आयुष्यभर काबाडकष्ट करुन थकलेले हात आता बाराखडी गिरवत आहेत. लहान मुलांना लाजवेल अशा उत्साहात आजीबाई शाळेत येतात. गुलाबी साडीतल्या आज्जीबाई सिनीअर विद्यार्थिनी,तर पिवळ्या साडीतल्या आज्या या ज्युनिअर. या शाळेनं आजींबाईच्या आयुष्यात जादूच घडवली आहे. या शाळेतले सगळ्या आज्ज्या सत्तरी ओलांडलेल्या. विशेष म्हणजे या वयातही या आजींचे पाठांतर अगदी खणखणीत आहे. आयुष्याच्या सांजवेळी शिक्षणाची कास धरणारे या साऱ्या आजीबाई अनेकांसाठी आदर्श ठरत आहेत.

रोज दुपारी पावणे दोन-दोनच्या सुमारास "चल...ये अनुसया" यांसारख्या आरोळ्या एकमेकींना देत गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या, एका हातात लाल-काळ्या रंगाचं दप्तर, दुसऱ्या हातात काठी; नाय तर नातवंडांचा हात आधारासाठी घेऊन सगळ्या आजीबाई शाळेची वाट चालू लागतात. बरोबर आणलेल्या दप्तरात एक पाटी, अंकलिपी, पेन्सिल आणि पाटी पुसायचं फडकं घेऊन न चुकता दररोज शाळेत येतात. ८ मार्च २०१६ पासून सुरू झालेली भारतातील काय जगातील ही पहिली "आजीबाईंची शाळा" मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुरू झाली. ही शाळा म्हणजे ‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू, झाडे, वेली, पशु-पाखरे यांशी दोस्ती करू’ या ग.दि.माडगूळकरांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव! शाळा निसर्गाच्या सान्निध्यात वसली आहे. आंब्याच्या मोठ्या झाडाखाली बांबूच्या कळकांचे दोन भाग करून भिंत तयार करण्यात आली आहे. त्यावर गव्हाच्या कुडाचे छत आहे. वर्गाच्या समोर ठरावीक अंतरावर प्रत्येक आजीच्या नावाचे झाड आहे. टाकाऊ फरश्यांचा वापर करून त्यावर मुळाक्षरे लिहिलेली आहेत. वयाच्या साठीनंतर उत्साहाने पुस्तकातील धडे गिरवणाऱ्या आजीबाईंच्या शाळेचे ते चित्र मोहीत करून टाकणारे असते. वर्गात शिरताच, समोरील फळ्यावर दिनांक-वार यांसह लिहिलेला 'शिक्षणाला वयाचं बंधन नसतं' हा सुविचार लक्ष वेधून घेतो. फळ्याच्या समोर सरळ रांगेमध्ये डोक्यावरील पदर सावरत मांडी घालून बसलेले 'विद्यार्थी' असतात. मांडीवर पाटी, समोर दप्तर, त्या दप्तरावर ‘बालमित्र’ची अंकलिपी, दप्तराच्या बाजूला पाटी पुसण्याचे फडके अन् हातात पेन्सील या सगळ्या साहित्यासह ते ‘विद्यार्थी’ अर्थात सर्व आजी मुळाक्षरे गिरवण्यात दंग असतात.काही वर्षांपासून शिक्षण घेणाऱ्या आजी या शाळेत चांगल्या रमून गेल्या आहेत! त्यांच्यासाठी ती शाळा म्हणजे उतरत्या वयातील संवाद साधण्याचे, त्यांच्या मैत्रिणींना भेटण्याचे, खळखळून हसण्याचे, भरपूर गप्पा मारण्याचे हक्काचे ठिकाण होऊन गेले आहे. आजी दररोज दुपारी दोन ते चार शाळेतील अभ्यासानंतर अभंग, ओव्या अन पाढेही म्हणतात. तसे करताना एक आजी आधी म्हणतात. नंतर, बाकी साऱ्या पहिल्या आजीमागे शिस्तीत म्हणत असतात.

वर्गासमोर लावण्यात आलेल्या झाडांमधील प्रत्येक झाडाचे पालकत्व एकेका आजीकडे देण्यात आले आहे. त्या त्या झाडासमोर आजीच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. शाळेच्या नियमानुसार,आज्यांना त्या झाडांची पाणी,खत घालून जोपासना करण्याचे, झाडांची काळजी घेण्याचे काम करावे लागते. या शाळेसाठी गावातील शिक्षिका शीतल मोरे मॅडम देखील मदत करतात. सुनंदा केदार आजी म्हणतात, ‘या शाळेमुळं खरंतर आमचं एकमेकींना नियमानं भेटणं व्हतं, नाहीतर जी ती आपापल्या घरी असायची; भेटायचं म्हटलं, की स्वतःहून येळ काढून भेटायला जावं लागायचं. शाळेमुळे चार अक्षरं शिकायला बी मिळत्यात. या वयात तेवढाच काय तो इरंगुळा...’ "आमच्या बालपणी गरिबीमुळं शिक्षण नाय घेता आलं. पुढं आई-वडिलांचं कष्ट आमच्या वाट्याला आलं. मात्र, आपण शिकाय पाहिजे व्हती चार बुकं, असं नेहमी वाटायचं,' असं ६७ वर्षांच्या यमुना केदार आजी सांगतात. त्या म्हणतात, "बांगर गुरुजींनी सुरू केलेल्या या आजीबाईंच्या शाळेमुळं म्हाताऱ्या वयात का व्हयना, पण शिकायला मिळालं याचा लय आनंद वाटतू.' याच शाळेत शिकणाऱ्या ७० वर्षांच्या अनुसया आजी सांगतात, "शिक्षण नसल्यामुळं कधी कुठं सय मागितली तर अंगठा मारावा लागायचा. शाळेचं तोंडच कधी बगितलं नसल्यामुळं नाव लिहायला येतं नव्हतं. मग सय तर लय लांबची गोष्ट... पण आता मला माझं नाव लिहायला येतं अन्‌ सयपण करती."

योगेंद्र बांगर सर हे मूळचे मुरबाड तालुक्यातील शेलारी गावचे. २०१२ साली आदिवासी दुर्मीळ डोंगराळ भाग या गटात मोडणाऱ्या 'फांगणे' गावातील सरकारी शाळेत शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. खरंतर अशा दुर्गम ठिकाणी नियुक्ती होणे म्हणजे एक शिक्षा मानली जाते. पण त्याला शिक्षा न मानता भगवंताचा प्रसाद म्हणून काम केलं तर निश्चित एकरूपता येते. इथे फक्त सत्तर-एकाहत्तर कुटूंब राहतात. कोणतीही बस इथं पोहचत नाही. पाचवीच्या पुढे शिकायचं असेल तर मुलांना १५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. हॉस्पिटल,बँकांसाठीही १५ किलोमीटर जावे लागते. इथे नोकरीस आल्यावर बांगर सरांना या गावासाठी काहीतरी करावेसे वाटले. नंदनवनात झाड कोणीही लावतं,पण वाळवंटात ओऑसिस निर्माण होणं महत्वाचं आहे. सुरुवातीला त्यांनी शाळेच्या विकासावर लक्ष दिलं. २०१३ साली गावात ७० शौचालये बांधून गाव हागणदारीमुक्त केलं. पर्यावरणाच्या रक्षणासाठी घर तिथं कडुलिंब,घर तिथं शेवगा,घर तिथं सीताफळ असे उपक्रम राबवले. गावच्या या प्रगतीमध्ये दिलीपभाई दलाल यांचा फार मोठा सहभाग आहे.अंबरनाथ मधील ते एक उद्योजक. महिलांच्या डोक्यावरचा हंडा कसा उतरवता येईल यासाठी त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीमधूनच गावात पाण्याची पाईपलाईन आली.शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित पारायण सोहळ्यात त्यांची गावातील महिलावर्गाशी गाठ पडली आणि त्यातूनच शिक्षणाची देवाणघेवाण करूया म्हणत 'आजींची शाळा' जन्माला आली.

अहो खरंच "शिक्षणाला वय नसतं"...आता तर जानेवारी २०१८ मध्ये शेलारी गावात आजीबाईंच्या शाळेसोबत आजोबांची शाळाही सुरू झाली. आजीबाईंच्या हाती पाटी पुस्तक देणाऱ्या आजीबाईंच्या शाळा सध्या कोरोनामुळे बंद आहे.पण त्यांचा ऑनलाईन संवाद सुरू आहे. नातवंडांसह धडे गिरविण्याची संधी आजींना दिली गेल्याने दोन पिढ्या एकत्र येऊन ऑनलाईन शिक्षणाची वाट धरत आहेत. विविध उपक्रमांतून या वयात आजी-आजोबांना शिकवत त्यांना समृद्ध करण्याचे काम सध्या शिक्षक योगेंद्र बांगर यांच्या माध्यमातून सुरू आहे. याची दखल घेत मुंबईच्या ‘जेडी आईस’ संस्थेने ‘आजींची शाळा’ विषयावर चित्रपट निर्मिती करण्याचे ठरवले. लवकरच ही आगळीवेगळी ‘आजींची शाळा’ मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळेल. यामुळे फांगणे गावात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

फांगणे गावात आजीबाईंच्या शाळेचा प्रयोग पाच वर्षांपूर्वी केला गेला असून आंतराराष्ट्रीय स्तरावरही त्याची दखल घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या स्वयंसिद्ध गाव संकल्पनेसाठी या गावाची निवड झाली असून गावातील इतर सुविधांसह आता शैक्षणिक प्रगतीत समावेश करण्यात आला आहे.या आजींच्या शाळेची 'लिम्का वर्ल्ड रिकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे.आजींच्या या शाळेबरोबर आता आजोबांची शाळा पण या गावात भरते. गावातील अनेक सुविधा शिक्षणामुळे झाल्या आहेत."शिक्षणाला वय नसतं" हे यावरून सिद्ध होते.अशा एका अभूतपूर्व विषयावर मला सिनेमा लिहायला मिळाला आहे, हे मी माझे भाग्य समजतो. मोठ्या पडद्यावर हा सिनेमा यथावकाश आपल्या भेटीला येईलच. मात्र ही जबराट 'आजीबाईंची शाळा' खूप काही शिकवणारी आणि साद घालणारी आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे धडपडणाऱ्या योगेंद्र बांगर सर यांना आजच्या शिक्षकदिनी मानाचा मुजरा व मनापासून सलाम व त्यांच्या पुढील कार्यास आभाळभर शुभेच्छा

(लेखक चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत)

ashishningurkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...