आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या चार दिवसांपासून परभणीत किमान तापमान राज्यात नीचांकी पातळीवर नोंदवला जात आहे. ७ ते ५.१ अंश सेल्सियसपर्यंत खाली तापमान गेले होते. राज्यात इतर शहरांच्या तुलनेत परभणीतच पारा इतका खाली का घसरतो, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. याचा मागोवा घेतला असता उत्तरेकडून बाष्पविरहित शुष्क वारे येत आहेत. तसेच दिवसभर सूर्यकिरणे जमिनीवर पडल्यानंतर रात्रीच्या वेळी आकाश स्वच्छ असल्याने त्याचे जमिनीतून झपाट्याने उत्सर्जन (रेडिएशन कूलिंग) होऊन या परिघातील किमान तापमानाचा पारा घसरतोय असे निरीक्षण या विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी नाेंदवले आहे.
गेल्या चार दिवसांप्रमाणे बुधवारीही किमान तापमानात घसरण पाहायला मिळाली. पारा ५.५ अंश सेल्सियसवर होता. २२ डिसेंबरला यावर्षी आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी ५.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. परभणीत विद्यापीठाचा हवामानशास्त्र विभाग आहे. येथे तापमानाची नोंद घेण्यात येते. कृषी विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे असून पीकही घेतले जाते. मोकळ्या जागेत हवामानशास्त्र विभाग आहे. सकाळी ७ वाजून २३ मिनिटांनी किमान, तर दुपारी २ वाजून २३ मिनिटांनी कमाल तापमानाची नोंद घेतली जाते. सध्या उत्तरेकडून बाष्पविरहित शुष्क वारे येत असून ढगाळ वातावरण नसल्याने कमालीचा गारवा जाणवत आहे. आभाळ स्वच्छ असल्याने रेडिएशन कूलिंग झपाट्याने होत असून तापमानात घट होत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किमान तापमानात घट झाली होती. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून आकाश स्वच्छ राहत असल्याने हुडहुडी भरणाऱ्या थंडीचे पुन्हा आगमन झाले.
परभणीतील तापमान कमी असण्याची ही आहेत कारणे
> विद्यापीठात मोठ्या प्रमाणात झाडे असून मोकळा व प्रदूषणविरहित परिसर आहे
> विद्यापीठ परिसरात काळी माती (ब्लॅक कॉटन सॉइल) जास्त प्रमाणात आहे
> सूर्यकिरणे जमिनीवर पडल्यानंतर रात्रीच्या वेळी त्याचे उत्सर्जन झपाट्याने होऊन किमान तापमान घटते
> शुष्क वारे असल्याने रात्रीच्या वेळी दव निर्माण होऊन तापमानात घसरण
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिलेली माहिती)
दोन वेळा तीन अंशांखाली गेले तापमान
दिनांक : तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
२९ डिसेंबर २०१८ : २
१७ जानेवारी २००३ : २.८
१८ डिसेंबर २०१४ : ३.६
७ जानेवारी २०११ : ३.९
२३ जानेवारी २०१० : ४.५
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.