आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Terrifying Story Of Kashmiri Resident । Terrorists Torture Kashmiri Locals, Abuse Females For Food

ब्लॅकबोर्ड:आमच्या मायबहिणींची अब्रू लुटायची की नाही हे दहशतवादी जेवणावरून ठरवायचे; स्वयंपाक जमला तर ठीक, नाहीतर...

लेखक: मृदुलिका झाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काही जण याला पृथ्वीतलावरील स्वर्ग म्हणतात... तर काही जण सरताज-ए-हिंद... काहींना कित्येक मैल पसरलेला बर्फ आवडतो... तर काही जण डल सरोवराच्या निळ्याशार पाण्यात 'शिकारा'सारखे स्तब्ध होऊ इच्छितो. हे ते काश्मीर आहे, जे अनेकांच्या स्वप्नात वसलेले आहे, पण प्रत्येक स्वप्न काश्मीरसारखे सुंदर नसते! येथे देवदार वृक्षांच्या सळसळीमध्ये त्या मातांचा आक्रोश दफन आहे, ज्यांची मुलं रातोरात बेपत्ता झाली. झेलमच्या चमकदार पाण्यात न जाणो किती बालकांचे रक्त मिसळलेले असेल. येथे जमिनीच्या प्रत्येक तुकड्यात छळ आणि दहशतीच्या कहाण्या उगवून येतात.

भयंकर सत्याच्या धाग्यात विणलेली अशीच एक कहाणी बिलालची आहे, ज्यांच्या घरात दशहतवादी घुसले आणि बंदुकीच्या धाकावर छोट्या भावाला घेऊन गेले. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणारा तो मुलगा आता तुरुंगात आहे. आईला प्रचंड धक्का बसलेला आणि वडिलांच्या पाठीला वेळेआधीच कुबड निघाले आहे.

बिलाल सांगतात की, लोकांनी भलेही काश्मीरला स्वर्ग म्हणू देत, पण आमच्यासाठी हा नर्कच आहे. जन्नत तर ती असते, जेथे समाधान असेल, प्रेम असेल. येथे तर दारावर ठकठक होताच वाटते की, दहशतवादी तर परतले नाहीत ना! हे सांगताना सोपोरच्या त्या थंड-बंद खोलीतही त्यांच्या कपाळावरचा घाम चमकू लागला. अनेकदा तर त्यांना रडूच आवरेल नाही, इतक्या मोठ्याने रडले की मला व्हिडिओ बंद करून त्यांना धीर द्यावा लागला.

दक्षिण काश्मीरमध्ये 24 तासांहून अधिक काळ चकमक सुरू होती, पूर्वी आमचा थांबा एकच होता, पण परिस्थिती चिघळल्याने आम्ही उत्तरेकडे निघालो.
दक्षिण काश्मीरमध्ये 24 तासांहून अधिक काळ चकमक सुरू होती, पूर्वी आमचा थांबा एकच होता, पण परिस्थिती चिघळल्याने आम्ही उत्तरेकडे निघालो.

बिलाल यांच्यापर्यंत जाण्याचा आमचा प्रवास अनेक टप्प्यांतून गेला. अनेक चेहऱ्यांशी भेट झाली. बहुतांश घाबरलेलेच होते. तर काही जण असे, ज्यांनी काश्मीरला पुन्हा एकदा स्वर्ग बनवण्याचा ध्यास घेतलेला आहे. अशाच एका चेहऱ्याने आम्हाला बिलाल यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. एकेक पाऊल जपून टाकण्यात आले. विश्वासू टॅक्सी ड्रायव्हरला सोबत घेऊन भल्या सकाळी आम्ही श्रीनगरहून निघालो. वाटेत दोन आणखी लोकल माहीतगार सोबतीला आले, ज्यांचे काम होते आमची सुरक्षा सुनिश्चित करणे. मी ट्रॅकर ऑन करून ठेवलेला होता, पण मनात कुठे ना कुठे भ्यायलेली होते.

जेव्हा आमची कार उत्तर काश्मीरच्या निर्जन रस्त्यांवरून धावू लागली होती, तेव्हा दक्षिण भागात एन्काउंटर सुरू होते. भीती आणि अपेक्षांच्या चढ-उतारादरम्यान आम्ही आमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो.

हे डल सरोवर आहे. पृथ्वीवरील स्वर्गाहून सुंदर जागा. इथे आल्यानंतर कुणालाच जावेसे वाटत नाही. पण याचीच दुसरी बाजू अत्याचार आणि दहशतीच्या वेदनादायक कहाण्यांची आहे. ज्या ऐकून मन हेलावून जाते.
हे डल सरोवर आहे. पृथ्वीवरील स्वर्गाहून सुंदर जागा. इथे आल्यानंतर कुणालाच जावेसे वाटत नाही. पण याचीच दुसरी बाजू अत्याचार आणि दहशतीच्या वेदनादायक कहाण्यांची आहे. ज्या ऐकून मन हेलावून जाते.

सफरचंदाच्या बागांच्या मधोमध उभ्या त्या घरामध्ये बिलाल होते. वरच्या खोलीत आम्हाला एकटे सोडून इतर सर्व बाहेर गेले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. आधी अडखळत, मग विश्वासाने. ते आठवतात- सन 2019चा ऑगस्ट महिना होता, जेव्हा मध्यरात्री आमच्या दारावर ठकठक झाली. दार उघडताच काही जण बळजबरी घरात घुसले आणि त्यांनी कडी लावून घेतली. सर्वांच्या हातात बंदुका होत्या आणि चेहऱ्यावर राक्षसी भाव.

ती लश्करची माणसं होती, जी काश्मीरला नरक बनवण्यासाठी आली होती. येताच त्यांनी सर्वांना एका खोलीत एकत्र केले. मोबाइल जप्त करून बंद करण्यात आले. फोनची तार कापण्यात आली. त्यांनी ती सगळी व्यवस्था केली, ज्यामुळे कुणालाही आमच्या घरातील हालचालींचा सुगावा लागू नये.

एका खोलीत आम्ही सर्व जमा होतो- आई-वडील, आम्ही सर्व चारही भाऊ आणि एक चुलत बहीण. एका दहशतवाद्याने अब्बूंच्या कानशिलावर पिस्तूल लावली आणि ते घरात असल्याची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी धमकावले. तो स्पष्टच म्हणाला- तुमच्यापैकी कुणीही तोंड उघडले, तर आम्ही पूर्ण खानदानच संपवून टाकू.

आता पाळी होती, घरातील बायकांची. रडणाऱ्या आई आणि बहिणीला त्यांनी किचनमध्ये पाठवलं. अर्ध्या रात्री पोळी-तांदूळ आणि भाजलेलं मांस पाहिजे होतं. त्या जेव्हा स्वयंपाक करत होत्या तेव्हा दहशतवादी वारंवार धमकावत होते की, लवकर शिजवा, आम्हाला भूक लागली आहे. जेवणं आटोपल्यावर ते घरातल्या प्रत्येक खोलीत पसरले.

आम्ही 7 जण एकाच खोलीत बंद होतो, आपल्याच घरात कैद्यासारखे. ना हात हलवू शकत होतो, ना पाय. दार उघडायला मनाई होती. ही नरकाची सुरुवात होती. यानंतर ते अनेकदा आले. त्यांची नजर आमच्या छोट्या भावावर पडली होती. 19 वर्षांच्या माझ्या भावाला दोनच कामे माहिती होती- इबादत आणि शिक्षण. त्याला डॉक्टर व्हायचे होते. 12वीची परीक्षा देणार होता, तेव्हा त्यांनी एक 'ऑफर' दिली- ‘याला आमच्यासोबत पाठवा, नाहीतर एकेकाला मारून टाकू.’

बिलाल सांगतात- माझ्या भावाला डॉक्टर व्हायचं होतं, पण दहशतवादी त्याला सोबत घेऊन गेले. ज्या हातांनी त्याने रुग्णांना जीवदान देण्याचे स्वप्न पाहिले त्याच हातांनी त्याने आता दहशतीचे पोस्टर लावायला सुरुवात केली होती.
बिलाल सांगतात- माझ्या भावाला डॉक्टर व्हायचं होतं, पण दहशतवादी त्याला सोबत घेऊन गेले. ज्या हातांनी त्याने रुग्णांना जीवदान देण्याचे स्वप्न पाहिले त्याच हातांनी त्याने आता दहशतीचे पोस्टर लावायला सुरुवात केली होती.

माझा भाऊ तेव्हा 19 वर्षांचा होता. कोवळ्या हातांचा आणि त्यापेक्षाही कोमल हृदयाचा. तो रडू लागला. त्याला तर डॉक्टर व्हायचे होते, पण या सर्वांनी त्याला दहशतवादी बनवले. आईने आर्जवे केली. वडिलांसहित आम्ही सर्व भाऊ त्यांच्या पाया पडू लागलो, पण काहीच फायदा झाला नाही. भावाला घेऊन ते निघून गेले. यानंतर त्याची ट्रेनिंग सुरू झाली.

त्याला लश्करच्या पाठिंब्याचे पोस्टर लावण्याचे काम देण्यात आले. भावाने ज्या हातांनी रुग्णांना जीवनदान देण्याचे स्वप्न पाहिले होते, तेच हात आता दहशतवादाचे पोस्टर चिकटवत होते. तो बदलू लागला होता. घरी परतायचा तेव्हा पहिल्यासारखा हसत-बोलत नव्हता, तर गप्प पडून राहायचा. आई डोक्यावरून हात फिरवायची तेव्हा तोंड वळवून झोपायचा.

11 नोव्हेंबर 2019! त्या रात्री घरावर छापा पडला. अनेक पोलिसांसह उच्च अधिकाऱ्यांनी घराला चहुबाजूंनी घेरले. ज्या खोल्यांत इबादतीच्या आणि आपुलकीच्या गप्पा रंगायच्या, तेथे पोलिसांचे आदेश गुंजू लागले होते. एकेक सामान, एकेक पुस्तक, अंथरूण-तांदळाचे डबे असं सर्वकाही त्यांनी खंगाळून काढलं. मग आला तो प्रश्न, जो न विचारण्याची आम्ही दुवा मागू लागलो होतो. 'छोटा भाऊ कुठाय?' त्याला घेऊन ते सर्व निघून गेले.

बिलाल सांगतात की- अडीच वर्षे झाली- आम्ही भावाचा चेहरा पाहिला नाही. त्याच्यावर PSA (पब्लिक सेफ्टी अॅक्ट) लागला आहे. अम्मी डिप्रेशनमध्ये गेली आहे. ती एकतर रडत राहते, नाहीतर रुग्णालयात राहते. प्रत्येक क्षणी हसून बोलणाऱ्या अम्मीचा ब्लड प्रेशर आता हाय राहतो. रात्री-बेरात्री कधीही डॉक्टरांकडे जावे लागते. त्यावर कहर म्हणजे मी त्यांच्या राहू शकत नाही!

मी प्रश्नार्थक मुद्रेत बिलालला पाहते. ते हळूहळू सांगतात, जणू काही स्वप्नात बोलत आहेत- अम्मीला भीती वाटते की मी घरी राहिलो तर दहशतवादी मलाही पकडून नेतील. आता मी श्रीनगरमध्ये राहतो. म्हणायला घर 50 किमी दूर आहे, पण माझ्यासाठी हे अंतर पुढच्या जन्मासारखं झालंय. वर्षभरानंतर परततो. हे बोलताना बिलाल थांबतात. ते रडू लागतात- अम्मी म्हणते, तू आता परत येऊ नकोस. आम्हाला पाहू शकणार नाही म्हणून काय झालं, कमीत कमी जिवंत आणि स्वतंत्र तर राहशील.

खानकाह-ए-मौला ही काश्मीरमधील सर्वात जुनी मशीद. ही ऐतिहासिक मशीद पूर्णपणे दगडांनी बांधलेली आहे. म्हणूनच हिला पत्थर मशीदही म्हणतात.
खानकाह-ए-मौला ही काश्मीरमधील सर्वात जुनी मशीद. ही ऐतिहासिक मशीद पूर्णपणे दगडांनी बांधलेली आहे. म्हणूनच हिला पत्थर मशीदही म्हणतात.

कॅमेरा बंद करून बराच वेळ गप्प राहिले. धीर देण्याबद्दलचे ऐकलेले-वाचलेले सगळे शब्द तोकडे वाटू लागले. थोडं थांबून ते पुढे सांगतात की, गावातील जवळपास सर्वच घरांमध्ये हीच परिस्थिती आहे. आईवडील आपल्या मुलांना बाहेरगावी पाठवत आहेत, जेणेकरून त्यांना दहशतवाद्यांशी जोडू नये. मुलींच्या घरच्यांची परिस्थिती तर आणखीनच वाईट आहे. दहशतवादी निवडून-निवडून अशा घरांमध्ये जातात, जेथे कोवळ्या वयातल्या मुली असतील. ते त्यांना स्वयंपाक करायला लावतात आणि क्षणोक्षणी रेपची धमकीही देतात. अनेक अशी घरे आहेत, जेथे आवडीचे जेवण बनवले नाही म्हणून वा स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून बलात्कार करण्यात आला.

अब्रू जाण्याची भीती ही मृत्यूच्या भीतीपेक्षा मोठी आहे. यामुळे आईवडील कमी वयातच आपल्या मुलींची लग्ने लावू लागले. मुलांना शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी पाठवले. मुलींची लग्न लावून पाठवणी केली. आता सोपोरचे आमचे गाव कोणतीही आशा नसलेल्या वृद्ध आईवडिलांचे गाव उरले आहे.

तुम्ही लोकं विरोध का करत नाही? माझ्या प्रश्नावर ताडकन् उत्तर आले- त्यांनी आमच्या डोक्याला बंदूक लावल्यावर आम्ही काय करणार! तुमच्यासोबत असे झाल्यावर तुम्ही काय कराल! आरामात जगणारी माणसंच हिमतीच्या कहाण्या सांगतात- बिलाल यांनी न बोलताही जणू मला जाणीव करून दिली.

मुलाखत संपली. खोलीत चहा आणि तंदूरमध्ये भाजलेली काश्मिरी रोटी ‘गिरदा’ भोवती इतर साथीदार जमले. रोटी खाताना हास्य-विनोद होतो. सोबत आलेल्यांपैकी एक जण आपल्या हातावरील जखम दाखवतो, ही जखम दहशतवाद्यांमुळे झालेली होती. किस्सा ऐकवताना ते हसत होते, पण त्या सांगण्यात भयाची एक खोल जाणीव होती, जी मला स्पष्ट दिसत होती. ‘जोपर्यंत ते दहशतवादी येथे आहेत, येथे कुणीच सुरक्षित नाही’- बिलाल वारंवार सांगत राहतात.

टिप : खबरदारी म्हणून खऱ्या व्हिक्टिमची ओळख लपवण्यात आली आहे. यासोबतच अशा व्यक्तींची नावेही दिलेली नाही, ज्यांनी अनेक धोके पत्करून या रिपोर्टमध्ये आमची मदत केली.