आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिल्पकार, मूर्तिकार मयूर मोरे शाडू मूर्तिकारांच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी. त्यांचे पणजोबा हरिभाऊ त्र्यंबक मोरे यांनी वर्ष १९२९ मध्ये जुन्या नाशिकमध्ये मातीच्या मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. भाजीच्या व्यवसायानिमित्ताने मुंबईस जात असल्याने तेथे कोकणातून येणाऱ्या शाडूच्या मूर्तीची कला त्यांनी पाहिली आणि नाशिकमध्ये तशा मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. त्यांचे पुत्र शंकरराव मोरे यांनी या कलेचा वसा घेतला. परिस्थितीमुळे आपले शिक्षण होऊ शकले नाही, पण आपल्या मुलांनी या कलेचं शिक्षण घेतलं पाहिजे हे आजोबांनी पाहिलेलं स्वप्न मयूरच्या निमित्ताने तिसऱ्या पिढीने पूर्ण केले.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट््सचे विद्यार्थी असलेले मयूर जे. जे.चे शिल्पकलेतील सुवर्णपदक विजेते आणि शिष्यवृत्तीधारक आहेत. शैक्षणिक यशानंतर मुंबईत राहूनच पुढील करिअर करण्याचा पर्याय त्यांच्यापुढे होता. परंतु, सरकारी नोकरीचा पर्याय नाकारून बाप्पाची सेवा करण्याचा पर्याय निवडणाऱ्या आजोबांचा वारसा सांगणाऱ्या या नातवानेही नाशिकला परतून ही सेवा सातासमुद्रापलीकडे पोहोचविली. वर्ष २००६ पासून परदेशात गणेशमूर्तींची निर्यात करणाऱ्या मोरे कुटुंबीयांकडे २०२२ पर्यंतच्या गणेशमूर्तींचे बुकिंग आहे.
“बाप्पाची सेवा’ हे मोरे कुटुंबीयांचेच शब्द. त्यांना गणेशमूर्तींचे बाजारीकरण करायचे नसल्याने या सेवेतून भक्तिभाव, पर्यावरण व सौंदर्य जपायचे असल्याचे मयूर मोरे सांगतात. भक्त फोटो आणतात, वर्णन करतात, त्यानुसार मोरे कुटुंब त्यांच्या “मनातला बाप्पा’ घडवून देतात. “शाडू मातीच्या मूर्तींचा आग्रह हा पाच-दहा वर्षांत आला. पण, आमच्या आजोबा-पणजोबांनी नव्वद वर्षांपूर्वी बाप्पांच्या मूर्तींसाठी लाखेपासून रंग तयार केले, आठवडी बाजारातील काष्टौधी विक्रेत्यांकडून खरेदी केलेल्या डिंकाचा वापर केला. पर्यावरण रक्षणाची हीच परंपरा जपणे हेच आमच्या या सेवेतील गाभा आहे’, असे मयूर सांगतात. त्यासाठी कृत्रिम घटकांच्या भेसळीशिवाय मातीच्या मूर्तींसोबतच मातीला समृद्ध करणाऱ्या बियाण्यांची भेट, विद्यार्थ्यांना मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण हे उपक्रम ते राबवतात.
दिवाळी पाडव्यापासून कामाचा शुभारंभ; वडिलांसह उच्चशिक्षित दोघे भाऊही साकारतात सुबक गणेशमूर्ती
दिवाळीच्या पाडव्याला यांच्या कामाचा शुभारंभ होतो आणि गणेश जयंतीपासून अठरा-अठरा तासांच्या बैठकीचे सलग काम सुरू होते. साहित्याची शुद्धता हा प्रथम आग्रह असल्याने त्याच्या खरेदीसाठी जवळजवळ महिना जातो. आता मंडळांसाठीही बाप्पा घडवू लागल्याने अभियांत्रिकीतील गणेश व बारावीतील ओंकार या दोन भावांचीही यात साथ मिळाली. मयूरचे वडील शांताराम मोरे हसत हसत सांगतात, आमच्या बाप्पांच्या सेवेत आर्ट, फिजिक्स आणि केमिस्ट्री असे त्रिवेणी संयुग साधले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.