आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजस्थानात बालविवाहाचा कलंक तर लागलेलाच आहे. परंतु बालविधवांची अवस्था तर आणखी बिकट आहे. राज्यात किती बालविधवा आहेत, याची सरकारकडे माहिती अथवा डाटा उपलब्ध नाही. संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडेही याची माहिती नाही. समाजालाही याचे काही देणे-घेणे नाही. सरकारी दाव्यानुसार, राजस्थानात दरवर्षी १०० सुद्धा बालविवाह होत नाहीत. परंतु ‘भास्कर टीम’ प्रथमच पाच जिल्ह्यातील अशा ३५० मुलींना जाऊन भेटली, ज्यांच्या नशिबी बालविवाहानंतर वयाच्या १५ -१८ वर्षे वयातच विधवेचे जिणे वाट्याला आले अाहे. राष्ट्रीय बालसंरक्षण आयोगाच्या अहवालानुसार शहरांत १०.६ % व ग्रामीण भागात ८९% मुलींचे विवाह वयाच्या १५-१९ व्या वर्षी होतात. यापैकी ३१.५% मुली १५-१९ दरम्यान माताही बनतात. यावर राजस्थानच्या महिला व बालविकास मंत्री ममता भूपेश यांनी सांगितले, सरकार बालविवाह थांबविण्याचे कसोशीने प्रयत्न करते. बालविधवांची माहिती माझ्याकडे नाही. त्याची माहिती घेऊन मी तुम्हाला सांगते, असे त्या म्हणाल्या.
लहरीचे लग्न तीन वर्षांची असताना लावून दिले, दहाव्या वर्षी विधवा :
भिलवाड्यातील करेडा तालुक्यातील बडिया गावातील लहरीचे वयाच्या तिसऱ्या वर्षी लग्न लावून देण्यात आले. ती दहा वर्षांची असताना विधवा झाली. सासऱ्याच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढले. आता ७० वर्षांच्या वृद्ध पित्यासोबत ओसाड भागात वास्तव्यास आहे. तिचे वय आता १४ वर्षांचे आहे.
भिलवाडा: निरमाचे ११ व्या वर्षी लग्न, १४ व्या वर्षी वैधव्य
भिलवाडा शहरातील सांगानेर भागातील निरमा शेतात मजुरी करून उदरनिर्वाह चालवते. ११ व्या वर्षी तिचे लग्न झाले. तर १४ व्या वर्षी तिला वैधव्यही प्राप्त झाले. शेतात काम करणाऱ्या कमलाचे वयाच्या १३ व्या वर्षी तर १५ वर्षांची असताना डालीचा बाल विवाह झाला आहे.
राजसमंद : काकरवामध्ये मायलेकी दोघीही विधवा
राजसमंदच्या काकरवा येथील ३५ वर्षांची कवरी व तिची १३ वर्षांची मुलगी प्रेमा दोघी विधवा आहेत. प्रेमाचे लग्न ती ५ वर्षांची असताना झाले. ती १३ वर्षांची असताना तिच्या पतीचे निधन झाले. आता प्रेमा व कवरी दोघीही मोडक्या छपराखाली राहतात. कवरीला पेन्शन ना रेशन. दोघीही मजुरी काम करतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.