आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनटोल्ड अनलॉक:हातच झाले ‘लाॅक’; ठेकेदारावरच आली बांधकामावर मजुरीची वेळ

अजय डांगे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाळेबंदी शिथिल झाली, काम सुरू झालंय पण बांधकाम साहित्याचा पुरवठा होत नसल्याने कामात पडतोय खंड

रिसोड मार्गावरील बांधकाम सुरू असलेेल्या एका इमारतीवर शेख कय्युम भेटले. इमारतीच्या बांधकामावर ते मजूर म्हणून काम करीत होतेे. चार महिन्यांपूर्वीपर्यंत ते स्वत: ठेकेदार होते. त्यांच्याकडे दहा-बारा कामगारांची टीम होती. लॉकडाऊनच्या काळात कामं बंद झाली आणि साहित्यही. शेवटी मजुरांना गावाकडे परत पाठवून ते स्वत:च उरलेल्या कामाचा गाडा ओढताहेत.

टाळेबंदीमध्ये काम नव्हते. कमाईचं दुसरं साधन नाही. दोन महिन्यांत नव्वद रुपयांचं तेल एकशेवीस रुपयांवर पोहोचलं. जमवलेले पैसे संपले. सरकारकडून २ हजार रुपये मिळाले त्यात चहासाखरही आली नाही. रेशनचं धान्य मिळालं, पण तेवढ्यावरच कसं भागणार, त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. पण ते थांबले नाही. मार्ग शोधत जगत राहिले, ‘आता काम सुरू झालं, पण बांधकाम साहित्याचा पुरवठा होत नसल्यानं त्यात खंड पडतोय. रेती घाट बंद आहेत. कन्हानची रेती मिळते. दर आहे २५०० रुपये टन. पैसा असलेला इंजिनिअर ही रेती घेतो तरच आमच्या हाताला काम मिळते,’ सध्या त्यांना आठवड्यात दोन-तीन दिवस काम मिळू लागलंय. आजच बांधकाम साहित्य नसल्याने दोन कामगारांना त्यांना साइटवरून परत पाठवावे लागले.कय्युमभाई सांगत होते.

इतरांची घरे बांधणारे हे कामगार स्वत:च्या घरापासून दूर रोजच्या जगण्याच्या विचारानेच मेटाकुटीला आले आहेत. कय्युमभाई तर चार महिन्यांपूर्वीचे ठेकेदार. मजूर असलेल्यांच्या व्यथा त्याहीपेक्षा बिकट. वाशिममध्ये असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे संतोष खराबे आणि तातेराव कांबळे यांची भेट झाली. त्यांनी टाळेबंदी व त्यानंतर असंघटित कामगारांना कशी झळ सोसावी लागत आहे, याचा पाढाच वाचला.

कोण हातउसने पैसे देणार

‘टाळेबंदीत हातउसने पैसे घेऊन भागवले, कोण व किती दिवस हातउसने देणार?’ असा सवाल भीमराव भिसे हे मिस्त्री भिंत बांधतच विचारत होते. बोरगावचे गौतम गुडदे व मिलिंद बनसोड हे भिसे यांना माल देत ‘रोज काम मिळत नाही, दोन-तीन दिवसांच्या मजुरीवर संपूर्ण आठवडा काढावा लागतो’, असे सांगत होते. ‘डवरणीसह शेतीची कामे येतात, पण सध्या ते कामही नाही, यांत्रिकीकरणामुळेही आमच्यासारख्या कधी तरी शेतीची कामे करणाऱ्यांना संधी नसते,’ असेही त्यांनी सांगितले. ‘स्वयंरोजगार करावा तर पैसा कुठे आहे’, असे म्हणत ते पुन्हा इतरांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच्या कामात गुंतले.

लॉकडाऊन मुसीबत है....

घरीच असलेल्या अकबर चौधरी या मिस्त्रीचे १४ जणांचे कुटुंब. ‘लॉकडाऊन तो मुसीबत है, असे म्हणत चावल पे दिन गुजारते है’, असे त्यांनी सांगितले. छोटेसे गोळ्या-बिस्किटांचे दुकान. त्यातून काय मिळते, दोन-तीन दिवसांच्या मजुरीतून कसा संसार करावा, मुलांच्या शिक्षणाचे कसे होणार, असे सवाल करीतच तो आपल्या घरातच उद्याचे स्वप्न पाहत होता.

नोंदणी १८ हजार, मदत मिळाली ५ हजारांना

वाशिम जिल्ह्यात १८ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी आहे. त्यापैकी जीवित ७ हजार ९९७. नोंदणीकृत कामगारांना टाळेबंदीत २ हजार रुपये मिळण्यासाठी यादी राज्य मंडळास पाठविली. त्यौपकी ५ हजार २४८ कामगारांना पैसे मिळाले. उर्वरितांचा रिपोर्टच चुकीचा आल्याचे आयटकच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलचे सदस्य नयन गायकवाड यांचे म्हणणे आहे.

थेट साइटवरच नोंदणी करा...

असंघटित बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा मुद्दा अत्यंत त्रासदायक असल्याचे प्रत्येकाने सांगितले. ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र या नोंदणीसाठी अत्यावश्यक. इंजिनिअर - कॉन्ट्रॅक्टरकडे सलग ९० दिवस काम निघत नाही. गावात एवढे कामच निघत नसल्याचे ग्रामसेवक ते प्रमाणपत्र देत नाहीत. त्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. कधी तर पहाटेपासूनच रांगेत उभे राहावे लागल्याचे संतोष खरावे सांगत होते. यात बोगस नोंदणी करणाऱ्यांची संख्या ४० ते ५० टक्के आहे. तातेराव कांबळेंच्या म्हणण्यानुसार जांभरूण परांडे येथील ६० पैकी ४५ कामगारच खरे आहेत. थेट साइटवरच नोंदणी व्हावी अशी त्यांची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...