आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:कोरोना काळात कुपोषण निर्मूलनात अंगणवाडी सेविकांची मोलाची कामगिरी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युनिसेफ-नवी उमेदच्या संयुक्त संवाद सत्रात तज्ज्ञांचे अनुभव

कोरोनाचे संकट असूनही गावापाड्यावरील बालकांचे कुपोषण रोखण्यात राज्यातील अंगणवाडी सेविकांची कामगिरी मोलाची असल्याचे अनुभव युनिसेफच्या बालपोषण तज्ञ राजलक्ष्मी नायर यांनी मांडले. युनिसेफ, संपर्क, नवी उमेद आणि दिव्य मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेबिनार संवाद सत्रात त्या बोलत होत्या. कुपोषण निर्मूलनाच्या अंमलबजावणीत काही कमकुवत धागे असतील. ते उजेडात आणत असतानाच, चांगले उपक्रमही माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि युनिसेफच्या बालआरोग्य सल्लागार डॉ. मृदुला फडके यांनी या वेळी कुपोषणाचे प्रकार, त्यावरील शासकीय उपाययोजनांची मांडणी करताना अतितीव्र स्वरूपाच्या कुपोषणावर मात करण्यात राज्याला यश आल्याचे सांगितले. कुपोषणाचे पाच प्रकार आणि त्यावरील पंचसूत्री कार्यक्रमांची माहिती डॉ. फडके यांनी या वेळी दिली. कुपोषणासारख्या सामाजिक समस्या संपवण्यासाठी सामाजिक समता ही पूर्वअट असल्याचे, तसेच कोरोना काळात पोषण, आरोग्यासारखे मूलभूत प्रश्न अग्रणी आल्याची भूमिका “दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांनी या वेळी मांडली. याच भूमिकेतून या विषयांवरील वार्तांकनाचा आग्रह धरणाऱ्या “दिव्य मराठी’च्या उपक्रमांची माहिती या वेबिनार सत्राचे समन्वयक डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी यांनी दिली. नवी उमेदच्या स्नेहल बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले, तर “दिव्य मराठी’च्या राज्यभरातील प्रतिनिधींनी पोषण व आरोग्य या विषयातील त्यांच्या वार्तांकनाचे अनुभव मांडले.

सुपोषणाची पंचसूत्री

१. किशोरवयीन मुलींच्या पोषणाची दक्षता - मातेचे कुपोषण टाळण्यासाठी किशोरवयीन काळातच काळजी २. गर्भधारणेच्या काळातील २७० दिवस - गरोदर मातांना ३३ % अधिक आहार, लोहयुक्त मात्रा ३. बाळाच्या जन्मानंतरचे सहा महिने - स्तनपानाचा आग्रह, फक्त मातेच्या दुधाचा आग्रह ४. एक वर्षापर्यंतचा पूरक आहार - सहा महिन्यांनंतर मातेच्या दुधानंतर पूरक आहार ५. उपचारात्मक जीवनसत्त्वे - पोषणाअभावी एखाद्या आजारांची बाधा झाल्यास उपचार आणि जीवनसत्त्वांची मात्रा देणे.

कुपोषण निर्मूलनात महत्त्वाचे १००० दिवस

बालविवाह, मातांचे कुपोषण आणि कमी वयातील गर्भधारणा यात कुपोषणाच्या समस्येची मुळे असल्याने किशोरवयातील मुलींच्या पोषणापासून, आईच्या पोटातील गर्भाचे पोषण, आईचे पोषण आणि जन्मानंतर वर्षभरातील बाळाचे पोषण ही शृंखला संपूर्ण कुपोषण निर्मूलनासाठी गरजेेची असल्याचे मत डॉ. फडके यांनी मांडले. गर्भधारणेच्या २७० दिवसांपासून बाळ एक वर्षाचे होईपर्यंतचे सुमारे हजार दिवस बाळाच्या भविष्यातील शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. त्यासाठी त्यांनी सुपोषणाची पंचसूत्री सांगितली.