आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:डॉक्टरची आरोग्यसेवा पाहून घरमालकाने दोन महिन्यांचे 90 हजार रुपये भाडे केले माफ

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास, दुसरीकडे औरंगाबादेत घडले माणुसकीचे दर्शन

(प्रवीण ब्रह्मपूरकर)

कोरोनामुळे दुकाने, घरांच्या भाड्यासाठी तगादा लावल्याच्या अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याच्या घटना समोर येत आहेत. परंतु औरंगाबाद शहरातील एका मालकाने कोरोनामुळे सुरू होऊ न शकलेल्या एका रुग्णालयाचे दोन महिन्यांचे सुमारे ९० हजार रुपये भाडे माफ केले आहे. विशेष म्हणजे डॉक्टरने कोरोना काळात समाजासाठी केलेली आरोग्य सेवा पाहून घरमालकाने हा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे समाजात अद्याप माणुसकी, चांगुलपणा टिकून असल्याचा प्रत्यय आला आहे.

जिल्हा रुग्णालयातील डॉ. उदय राजपूत यांनी पुंडलिकनगरमध्ये नवे रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयासाठी दरमहा ४५ हजार रुपये भाडे निर्धारित केले आहे. मात्र कोरोनामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात आरोग्यसेवा देण्यासाठी हजर व्हावे लागले. शहरात सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे डॉ. राजपूत दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवेत कमालीचे व्यग्र आहेत. त्यांची दररोजची धावपळ पाहून घरमालकाने भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला. शिवाय पुढील एक महिना रुग्णालय सुरू झाले नाही तरी चिंता करू नका, असा वडीलकीचा सल्लाही घरमालकाने दिला आहे. विशेष डॉक्टरांना मदत केली असली तरीही माझे नाव प्रसिद्ध करू नका, अशी विनंती त्यांनी दिव्य मराठीला केली. डाॅ. राजपूत म्हणाले, तीन महिन्यांपूर्वीच काम पूर्ण झाले, परंतु सुुरू न होऊनही घरमालकाच्या मदतीमुळे समाजातील माणुसकीचे दर्शन घडले आहे.

जिल्हा रुग्णालयास दिली एक्स-रे पोर्टेबल मशीन

आपल्या रुग्णालयासाठी डॉ. राजपूत यांनी पोर्टेबल एक्स-रे विथ सीआर १६ ही सुमारे दहा लाख रुपयांची नवी मशीन विकत घेतली. आता रुग्णालय सुरू नसल्याने ही पोर्टेबल एक्स-रे मशीन त्यांनी तात्पुरत्या वापरासाठी जिल्हा रुग्णालयास दिली आहे.

समाजाला मिळते प्रेरणा

कोरोनामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेकदा त्रास दिल्याच्या तक्रारी घडत आहेत. मात्र, आमच्या सहकारी डॉक्टरांना घरमालकाने अशा पद्धतीने मदत केली हे ऐकून मलाही आनंद वाटला. अशा परोपकारी लोकांमुळेच कोरोना संकटात काम करणाऱ्या डॉक्टरांना व समाजालाही प्रेरणा मिळते. सुंदर कुलकर्णी,जिल्हा शल्यचिकित्सक    

बातम्या आणखी आहेत...