आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:डिजिटल रुपयाचं ‘अर्थ’-कारण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल रुपयाचे स्वागत करताना तो क्रिप्टो करन्सी किंवा बिटकॉइन नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. या आभासी चलनांप्रमाणे तो अनेक स्वरूपांत येण्याची शक्यता नाही, उलट एकमेवच असेल. त्यामुळे डिजिटल रुपयाची क्रिप्टो करन्सीशी तुलना करणे ना त्याच्या सन्मानाला धरून होईल, ना सर्वसामान्य भारतीयांच्या सद्सद्विवेकबुद्धीला.. कारण हा उथळ राजकारणाचा नव्हे, तर दूरदर्शी अर्थकारणाचा विषय आहे. त्याची नोंद त्याच पद्धतीने घ्यायला हवी.

ए क नोव्हेंबरपासून ‘डिजिटल रुपया’ प्रत्यक्ष व्यवहारात आला आहे. या वर्षीच्या एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या रुपयाच्या संभाव्य रूपाबद्दल, त्याच्या जारी होण्याच्या तारखेबद्दल आणि असा रुपया एकदम सर्व व्यवहारात लागू होईल का, याबाबत चर्चा होत होती. तिला पूर्णविराम देत आता डिजिटल रुपया अस्तित्वात आला आहे. आपले अधिकृत चलन कागदी तसेच आभासी (डिजिटल ) अशा दोन्ही स्वरूपात जारी करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. ही अभिमानाची बाब तर आहेच; पण त्याहीपेक्षा आपल्या देशाच्या तांत्रिक प्रगतीची आणि आर्थिक स्थैर्याची ती ग्वाही आहे. जगभरात बोकाळलेल्या ‘क्रिप्टो करन्सी’ला दिलेले ते अधिकृत, कृतिशील आणि चपखल उत्तर आहे.

सध्या सरकारी कर्जरोखे (गव्हर्नमेंट सिक्युरिटीज) आणि त्यांची व्यवहारपूर्ती (सेटलमेंट) डिजिटल रुपयाच्या माध्यमातून होणार आहे. नंतरच्या काळात सरकारला भरावयाचे विविध कर डिजिटल रुपयात भरण्याची सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको. या पद्धतीने डिजिटल रुपयासाठीची मागणी निर्माण करण्यात येईल. ही मागणी क्रमाक्रमाने निर्माण होईल, याची जशी काळजी घेतली गेली आहे, तशीच काळजी त्याच्याशी संबंधित बाजार मध्यस्थांच्या बाबतीतही घेण्यात आली आहे. तूर्त डिजिटल रुपया प्रायोगिक तत्त्वावर जारी करण्यात आला आहे आणि म्हणूनच कदाचित तो सर्व बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. एक नोव्हेंबरपासून या डिजिटल रुपयांच्या व्यवहारासाठी नऊ बँकांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्ीय पद्धतीचे व्यवहार डिजिटल रुपयाच्या माध्यमातून सोपे, त्वरित आणि सुरक्षित होतील, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रीय, विदेशी, खासगी, सहकारी अशा सर्वच स्वरूपाच्या बँकांचा समावेश डिजिटल रुपयातील व्यवहारात होईल.

मागणी आणि बाजार मध्यस्थांबाबत काळजी घेताना सरकार व रिझर्व्ह बँकेला सर्वसामान्य माणूस डिजिटल रुपया कसा स्वीकारेल, याबाबत कोणतीही शंका नसावी. कारण कोरोनापासूनच्या काळात याबाबत भारतीय नागरिकांनी दाखवलेली तत्परता अफलातून अशीच आहे. या आणि नंतरच्या काळात रोखीच्या व्यवहारांना बसलेली खीळ आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे. २०१६ मध्ये डिजिटल पेमेंट ११ टक्के होते, ते २०२२ मध्ये ते ८० टक्क्यांवर पोहोचले. २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकांनी स्मार्टफोनच्या माध्यमातून जास्त पैसे भरल्यामुळे दिवाळीतही बाजारात रोखीचा ओघ वाढला नाही. यात १६ टक्के पेमेंट यूपीआयद्वारे, १२ टक्के आयएमपीएसद्वारे आणि १ टक्का ई-वॉलेटद्वारे झाले. ५५ टक्के पेमेंट एनईएफटीद्वारे केले गेले. या वर्षीच्या ऑक्टोबरमध्येच यूपीआयद्वारे तब्बल १२ लाख कोटी रुपये भरण्यात आले. ‘एसबीआय’च्या अहवालात भाकीत केले आहे, की २०२७ पर्यंत देशातील केवळ १२ टक्के व्यवहार रोखीने होतील, म्हणजे ८८ टक्के व्यवहार विविध माध्यमांतून ऑनलाइन होतील. सरकार आणि रिझर्व्ह बँकेसाठी ही परिस्थिती चांगली आहे. यामुळे चलन छपाई आणि त्यावरचा अन्य खर्च कमी होईल. गेल्या ६ वर्षांत एकीकडे डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंट वाढले नसताना चेकद्वारे होणारे पेमेंट ४६ वरून १२.७ टक्क्यांवर आले आहे. यावरून हा विश्वास सार्थ ठरतो.

डिजिटल रुपयाचे स्वागत करताना तो क्रिप्टो करन्सी किंवा बिटकॉइन नाही, हे मात्र पूर्णपणे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आजच्या घडीला जागतिक आर्थिक वातावरणात सुमारे १७५ विविध नावांच्या आणि प्रकारच्या क्रिप्टो करन्सी अस्तित्वात आहेत. बिटकॉइनही त्यापैकी एक आहे. एकमेव नाही. येऊ घातलेला किंवा प्रस्तावित डिजिटल रुपया असा अनेक स्वरूपात येण्याची सुतरामही शक्यता नाही. तो एकमेव असेल. याबाबतचे दुसरे कारण म्हणजे, क्रिप्टो करन्सी सैद्धांतिकदृष्ट्या तुमच्या- माझ्यासारख्या खासगी व्यक्तीही निर्माण करू शकतात. रुपया हे चलन तसे नाही. केवळ प्रस्तावित डिजिटल रुपयाच नव्हे, तर सध्याचे आणि यानंतर येणारे रुपयाच्या स्वरूपातील चलन केंद्र सरकारच्या विनंतीनुसार रिझर्व्ह बँकच निर्माण करते आणि करेल. कोणतीही खासगी व्यक्ती ते निर्माण करू शकणार नाही. तिसरे कारण म्हणजे, क्रिप्टो करन्सीचे मूल्य बाजारातील त्याच्या मागणी - पुरवठ्यावर ठरते. शेअर बाजारात शेअर्सचे भाव ठरतात त्याप्रमाणे क्रिप्टो करन्सीचे मूल्य ठरते. डिजिटल रुपया तसा नाही. चौथे कारण- क्रिप्टो करन्सीला कोणतेही आधारभूत तत्त्व नाही. त्याची निर्मिती - अस्तित्व - चलनवलन - मूल्यांकन हे एका अर्थाने निव्वळ संगणकीय खेळ आहे. डिजिटल रुपया तसा नाही. त्याला आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा आधार आहे. जी मूल्यांकन तत्त्वे आपल्या सध्याच्या कागदी स्वरूपातील रुपयाच्या मागे आधार म्हणून आहेत, तीच तत्त्वे प्रस्तावित डिजिटल रुपयाचीही आधार आहेत.

पाचवे कारण म्हणजे, क्रिप्टो करन्सी हे गुंतवणुकीचे साधन आहे. खरे म्हणजे, सध्या तरी ते सट्टेबाजांनी उचलून धरलेले जुगारी खेळणे ठरले आहे. याउलट प्रस्तावित डिजिटल रुपया हे व्यवहारपूर्ती करताना द्यावयाच्या पैशांचे एक रूप किंवा माध्यम असेल. शेअर बाजारात गुंतवणूक करताना एखादा भारतीय गुंतवणूकदार त्याच्याजवळचे शेअर कागदी प्रमाणपत्रांच्या स्वरूपात सांभाळू शकतो किंवा डिमटेरियलाइज स्वरूपातही सांभाळू शकतो. अगदी तसेच आपण सध्याप्रमाणे रोख रक्कम कागदी नोटांच्या स्वरूपात बाळगू शकू आणि डिजिटल स्वरूपातही सांभाळू शकू. थोडक्यात, डिजिटल रुपया हे गुंतवणुकीचे साधन नाही. सट्टेबाजीचे आधुनिक खेळणे तर नाहीच नाही. तो फक्त विनिमयाचे साधन आहे. अगदी नेमक्या शब्दांत सांगायचे तर सध्याचा कागदी रुपया आणि प्रस्तावित डिजिटल रुपया या दोन्हींमध्ये सैद्धांतिक स्वरूपाचा काहीही फरक नाही. फरक आहे, तो फक्त प्रत्यक्ष कागदी आणि आभासी असण्याचा. हे एखाद्या व्यक्तीने अंगावरचे कपडे बदलण्यासारखे आहे. दिसतात ते कपडे बदलले म्हणून असते ती व्यक्ती बदलत नाही. डिजिटल रुपयाचे अगदी तसेच आहे. डिजिटल रुपयाला क्रिप्टो करन्सी मानणे चुकीचे असण्याचे सहावे कारण म्हणजे, सध्या तरी क्रिप्टो करन्सी हे कोणत्याही देशाचे अधिकृत चलन नाही. डिजिटल रुपया हे अस्तित्वात आल्याच्या दिवसापासून आपल्या देशाचे अधिकृत चलन असेल आणि आहे. याबाबतचे सातवे कारण म्हणजे, क्रिप्टो करन्सी हे विनिमयाचे साधन म्हणून कुठे वापरायचे, हे पूर्णपणे त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असते. त्या आणि तशा प्रकारच्या व्यवहारात सरकारचा काडीचाही संबंध नाही. त्यात काहीही अडचण आल्यास संबंधित सरकार किंवा मध्यवर्ती बँक हस्तक्षेप करत नाही. असा प्रकार डिजिटल रुपयाबाबत नाही. अर्थसंकल्पात डिजिटल रुपयाची घोषणा झाल्यावर काही वर्तुळात "डिजिटल रुपया ही संभाव्य डिमॉनिटायझेशनची नांदी आहे..’ वगैरे चर्चा सुरू झाल्या, त्या निव्वळ निरर्थक आणि पूर्णपणे बिनबुडाच्या आहेत. डिजिटल रुपयामुळे काळ्या पैशाला आणि महागाईला आळा बसेल, अशी चर्चा म्हणजे तर निव्वळ भाबडेपणा आहे. कागदी आणि डिजिटल रुपयात मूलभूत, सैद्धांतिक स्वरूपाचा काहीही फरक नसेल तर एक दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं कसं वागेल? दिसण्याच्या अंगभूत स्वरूपामुळे जो काही फरक पडेल, तेवढाच तो असेल. त्याच्याशी संबंधित तांत्रिक बाबी एकदा अंगवळणी पडल्या की तोसुद्धा जाणवणार नाही. जागतिक पातळीवर शंका - वाद - चिंता यांच्या भोवऱ्यात सापडलेल्या क्रिप्टो करन्सीशी प्रस्तावित डिजिटल रुपयाची तुलना करणे ना डिजिटल रुपयाच्या सन्मानाला धरून होईल, ना सर्वसामान्य भारतीयांच्या सद्सद्विवेकबुद्धीला.. कारण हा उथळ राजकारणाचा नव्हे, तर दूरदर्शी अर्थकारणाचा विषय आहे. त्याची नोंद त्याच पद्धतीने घ्यायला हवी.

संपर्क : 9820292376 चंद्रशेखर टिळक chandrashekhartilak @gmail.com

बातम्या आणखी आहेत...