आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Reaction Of Migrant Workers To The Discussion Of The Lockdown Again; Said I Came Here To Fill My Stomach, Even If The Lockdown Starts, What Will I Do In Village?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मभूमीला प्राधान्य:पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चेवर परप्रांतीय कामगारांची प्रतिक्रिया; म्हणाले - पोट भरण्यासाठी येथे आलो, लॉकडाऊन लागला तरी गावी जाऊन करणार काय?

कृष्णा तिडके | जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालन्यातील स्टील उद्योगातून जवळपास 25 ते 30 हजार मजुरांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळतो

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर १० मेपासून जालन्यातील स्टील उद्याेग नव्या दमाने सुरू झाले. गेल्या महिनाभरापासून स्टील उत्पादन पूर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काही राज्यांतील मजूर पुन्हा आपल्या गावी निघाले आहेत. अशा परिस्थितीत जालन्यातील परप्रांतीय मजुरांनी मात्र जालन्यातच थांबण्याची मानसिकता तयार केली आहे. पोट भरण्यासाठी येथे आलो, गावी जाऊन काय करणार, असा सवाल ते उपस्थित करत आहेत.

जालन्यातील स्टील उद्योगातून जवळपास २५ ते ३० हजार मजुरांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. यातील जवळपास ४ हजारांवर मजूर परराज्यातील आहेत. यात प्रामुख्याने बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आदी राज्यातील मजुरांचा समावेश आहे. स्टील उद्योगाशिवाय बांधकाम आणि अन्य उद्योगांतही जवळपास सहा हजार परप्रांतीय मजूर कार्यरत आहेत. २२ मार्च रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे २२ मार्च ते १० मे या कालावधीत सर्व स्टील कारखाने बंद होते. त्याशिवाय बहुतांश मजूर गावी परतल्याने कारखाने सुरू झाले तरी उत्पादनावर त्याचा परिणाम झाला होता. आता आपल्या गावी गेलेले बहुतांश कामगार परत जालना शहरात परतले आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन लागला तरी परत गावात जायचे नाही असा निश्चय त्यांनी केला आहे. कारखानदारांनी बहुतांश कामगारांसाठी राहण्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे. त्यामुळे जालन्यात राहिलेले बरे असे या मजुरांना वाटतेय. भीतीमुळे जे मजूर आपल्या गावी परतले होते त्यांना तिथे कोणताच रोजगार मिळाला नाही. त्यामुळे उपासमार झाली. अशा परिस्थितीत जालन्यात राहिलो तर किमान दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न राहणार नाही असे हे मजूर म्हणत आहेत.

आता गावी जायचे नाही

जोपर्यंत कंपनीत काम आहे तोपर्यंत काम करू. जर लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद झाल्यास कंपनी उघडण्याची वाट पाहू, मात्र येथेच थांबू. शक्यतो गावी परत जाणार नाही. कामासाठी इकडे आलो आहे. त्यामुळे परत जाऊन करणार तरी काय? कमलेश कृष्णा दास, कामगार, बिहार

गावी यापेक्षा कठीण परिस्थिती

गावाकडे शेती कमी आहे. त्यातच आम्ही चार भाऊ असल्याने शेतीमधून भागत नाही. त्यामुळे आम्ही कुटुंबीयांसाेबत कामास येथे आलो आहोत. येथे किमान खायला तरी मिळेल. गावाकडही गेलो तर यापेक्षाही तेथील परिस्थिती भयानक आहे संतोषकुमार गौड, मजूर, उत्तर प्रदेश

मजुरांची पूर्ण व्यवस्था

लॉकडाऊनच्या काळात कारखाने बंद असताना मजुरांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. घरच्या लोकांच्या काळजीतून मजूर गावी गेले होते. ते सर्व आता परतले आहेत. आता कुणीही परत जाण्याच्या विचारात नाही. त्यामुळे सध्या तरी सर्व मजूर कामावरच आहेत. - घनश्याम गोयल, उद्योजक

सहा हजार टन उत्पादन

जालन्यात लहान-मोठे २० स्टील कारखाने आहेत. या कारखान्यांमधून दररोज जवळपास ६ हजार टन स्टील उत्पादन होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढल्याने नुकसान भरून काढण्यासाठी चांगली संधी म्हणून उद्योजक याकडे पाहत आहेत. स्टील कारखान्यांमधून जवळपास २५ हजार कामगारांना प्रत्यक्ष तर हजारो कामगारांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो आहे. यात ट्रकचालक, क्लीनर, छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक, गॅरेजचालक, भंगार व्यावसायिक आदींचा समावेश आहे.

असा आहे जालन्याचा स्टील उद्योग

१२ मोठ्या युनिटमध्ये ३०० ते ८०० टन रोज सळई उत्पादन

२० ते ३० टन रोज सळई उत्पादन करणारे १० छोट्या युनिटमध्ये

०२ लाख टन महिन्याला सळईचे उत्पादन करण्याची उद्योगात क्षमता

१२०० कोटींची दर महिन्याला उलाढाल

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser