आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सांगतो ऐका...:वरात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सदानंद आणि मोहिनीची जवळीक वाढत चालली होती. आणि मनोजची चिंताही. कारण सदानंद आणि मनोज दोघंही तिच्या प्रेमात पडले होते. नकळत दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. एक दिवस सदानंदला गावाकडून फोन आला. तो काही दिवसांसाठी गावी गेला. आता साहजिकच मोहिनी आणि मनोजच्या गप्पा वाढू लागल्या. मोहिनीला सदानंद गावी का गेला, हे माहीत नव्हतं. मनोजने ही संधी साधली...

स दानंद आणि मनोज एकाच दुकानात कामाला आहेत. हे मॉलमध्ये असलेलं पुस्तकाचं दुकान आहे. पण पुस्तकं इंग्रजी असतात. त्यातलं सदानंद आणि मनोज दोघांना काही कळत नाही. आणि त्यांना कळायची गरज पण नाही. सदानंद आणि मनोज विक्रीचं आणि पुस्तकं नीटनेटकं ठेवायचं काम बघतात. दोघं दोन वर्षापासून त्याच दुकानात काम करतात. शिव खेराला वर ठेव, अमिशला पुढं ठेव, रामचंद्र गुहा जास्त नको.. अशा बोलण्यापुरते लेखक त्यांना माहीत झालेत. बाकी विषय राजकारणच असतो. आणि दोघंही विचारानं उजव्या बाजूचे असल्यानं जिवाभावाचे मित्र बनले आहेत. वंदे भारत ट्रेनला म्हैस धडकली आणि ट्रेनचा पत्रा तुटला, ही बातमी वाचल्यावर सदानंद अस्वस्थ झाला. पण, मनोजनं सांगितलं, की धडक बसल्यावर गायी- म्हशींना जास्त त्रास होऊ नये म्हणून मुद्दाम पत्रा नाजूक लावलाय. जनावरांचीही एवढी काळजी घेतली जाते, हे ऐकून सदानंदला गहिवरून आलं. दोघे एकमेकांना दिलासा देत राहतात. दुपारी एकत्र डबा खातात. दुकान एसी असल्यानं सुखात असतात. पण, गेले काही दिवस गडबड झाली होती. दोघा मित्रांनी एकमेकांशी बोलणं जवळपास बंद केलं होतं.

एक महिना झाला मोहिनी दुकानात यायला लागली होती. पुस्तक घेऊन कोपऱ्यात वाचत बसायची. स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. तिनं दोघांची ओळख वाढवली. दोघांना विनंती केली. मोहिनी एका छोट्या गावातली मुलगी. शिकण्यासाठी शहरात आली. सदानंद आणि मनोज दोघांनी तिला मदत करायचं वचन दिलं. अधूनमधून दोघंही तिला चहा विचारू लागले. स्वतःसोबत तिच्यासाठीही चहा मागवू लागले. गप्पा वाढू लागल्या. सदानंद तर तिला डबाही देऊ लागला. मोहिनी आणि सदानंदचं बोलणं जास्त व्हायचं. कारण सदानंद आणि मोहिनीच्या गप्पात शेतीचा विषय हमखास यायचा. सदानंदची गावी शेती होती. मनोज लहानपणापासून शहरात वाढलेला. त्याला शेतीतलं काही माहीत नव्हतं. साहजिकच सदानंद आणि मोहिनीच्या गप्पा जास्त होणार. मोहिनी तिच्या घरच्या गाईविषयी बोलायची. सदानंद त्याच्या शेतातल्या विहिरीविषयी बोलायचा. मनोज उगाच कोपऱ्यात बसून आपल्याला पोहता येत नाही, या गोष्टीमुळं निराश व्हायचा. एकदा सदानंदने मोहिनीसमोर एका बुक्कीत कांदा फोडला. मोहिनी म्हणाली, मनोजला हे कधीच जमणार नाही. मनोजनं ते फारच मनावर घेतलं. त्यानं घरी सराव केला. पण त्याला खरोखर एका बुक्कीत कांदा फोडता येत नव्हता. कांदा निसटून जायचा. आपल्याला हे जमलं पाहिजे, असं मनोजला वाटू लागलं. पण, कांदा फोडणं जमेपर्यंत वेगळा विषय निघायचा. सदानंद सूरपारंब्या खेळू शकतो. मोहिनीने मनोजला सूरपारंब्या माहीत नाहीत म्हणून चिडवलं. मग मल्लखांबाचा विषय निघाला. मनोज मनोमन खचू लागला. खरं तर सदानंद आणि मोहिनीचा हेतू मनोजला चिडवण्याचा नव्हता, पण दोघांनाही पहिल्यांदा शहरात ही जाणीव झाली होती की आपण वेगळे आहोत. आपण कुणापेक्षा कमी नाही. आपल्याला अशा गोष्टी येतात, ज्या शहरातल्या मुलांना माहीतही नाहीत. दोघांना ही गोष्ट सुखावणारी होती.

सदानंद आणि मोहिनीची जवळीक वाढत चालली होती. मनोजची चिंताही. कारण सदानंद आणि मनोज दोघंही मोहिनीच्या प्रेमात पडले होते. नकळत दोघा मित्रांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. एक दिवस सदानंदला गावाकडून फोन आला. तो काही दिवसांसाठी गावी गेला. आता दुकानात मनोज एकटाच असायचा. साहजिकच मोहिनी आणि मनोजच्या गप्पा वाढू लागल्या. मोहिनीला सदानंद अचानक गावी का गेला माहीत नव्हतं. मनोजने संधी साधली. सदानंदचं आणि एका मुलीचं प्रेम प्रकरण आहे, दोघांना लग्न करायचंय, पळून जायची तयारी चालू आहे, अशी मनानेच एक गोष्ट रचली. मोहिनीच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. ती मनोजला म्हणाली, ‘आपल्याला काय करायचं कुणाच्या खासगी गोष्टीचं?’ मग मनोजने गोष्ट बंद केली. त्या दिवशी त्यानं मोहिनीला, ‘सिनेमाला जाऊया का?’ म्हणून विचारलं. मोहिनी हो म्हणाली. नंतर दोघं जेवायला गेले. मनोजने तिला सांगितलं, की तू दुकानात का वेळ घालवतेस? जे पुस्तक पाहिजे ते मला सांग. मी आणून देत जाईन. दुकानात येणारे जाणारे लोक उगीच तुला बघत बसतात. मोहिनी खुश झाली. मोहिनीला वाटायचं मनोज जरा आखडू आहे. पण गेल्या चार-पाच दिवसांत तो आपली किती काळजी करतोय, याची तिला जाणीव झाली.

सदानंद गावाहून आला तो थेट मनोजला भेटला. त्यानं भेटल्या भेटल्या मनोजच्या थोबाडीत ठेवून दिली. कारण मोहिनी आणि त्याचं व्हाॅट्सअॅपवर बोलणं चालू होतं. मोहिनीनं त्याच्या लग्नाचा विषय काढला होता. आणि खरी गोष्ट म्हणजे सदानंद खरोखरच घरच्यांच्या आग्रहाखातर मुलगी बघायला गेला होता. त्याला लग्न करायचं नव्हतं. पण, मुलगीच बघायला गेला नसता, तर घरचे नाराज झाले असते. तो मुलगी पसंत नाही, असं सांगून आला होता. पण, इकडे भलतीच गोष्ट झाली होती. मोहिनीच्या वागण्यात जरा दुरावा आला होता. ती दुकानातही येत नव्हती. मनोजने पण त्याच्यावर हात उचलला. भांडणात दोघांनी एकमेकांना आव्हान दिलं. बघू मोहिनी कुणाला ‘हो’ म्हणते ते.. मोहिनी ज्याला हो म्हणेल त्याची वरात तर घोड्यावर निघेल, पण ज्याला नाही म्हणेल त्याची वरात गाढवावर काढायची.. दोघंही तयार झाले. प्रतिष्ठेचा प्रश्न होता. दोघांनी जोरदार प्रयत्न सुरू केले. पण, सदानंदने मोहिनीशी बोलताना मागेच मोठी चूक केली होती. गावावर गप्पा मारता मारता तो मोहिनीला म्हणाला होता, की त्याचा शहरात जीव रमत नाही. तो लग्न झाल्यावर गावी जायचा विचार करतोय. मस्त शेती करायची. मोकळ्या हवेत जगायचं. मोहिनीने त्या क्षणी मनोमन त्याच्या नावावर फुली मारली होती. गावी जाऊन शेतात राबायला ती शहरात आली नव्हती. तिला शहरातच राहायचं होतं. पण, स्पर्धा परीक्षा काही तिचं काम नव्हतं. दोन्ही परीक्षेत नापास झाल्यानं घरून लग्नाचा आग्रह वाढला. एक दिवस तिनं घरच्यांना मनोजबद्दल सांगितलं. घरचे नाराज झाले. मग मोहिनी आणि मनोजने कोर्टात लग्न केलं. संसार सुरू झाला.

मनोज आणि सदानंदची रोज भेट व्हायची. मनोज सदानंदला म्हणाला, ‘आपण काय पैज लावली आठवतेय ना?’ सदानंद काहीच बोलला नाही. मनोज म्हणाला, ‘जाऊ दे. माफ केलं तुला. आता तू तुझ्या लग्नाचं बघ’. सदानंद काहीच बोलला नाही. दोघांची मैत्री हळूहळू पहिल्यासारखी होऊ लागली. एक दिवस मनोज डबा न घेताच आला. सदानंदने त्याला आपला डबा दिला. मग मनोज सदानंदला रात्री बिअर प्यायला घेऊन गेला. मनोजने न राहवून खरं सांगितलं.. मोहिनीचा आग्रह चालू होता, की गावच्या जत्रेत जाऊ. मनोजला तिच्या गावी जायचं नव्हतं. तो टाळत होता. मोहिनी एवढी चिडली, की तिनं स्वयंपाकच केला नाही. सदानंद जोरजोरात हसू लागला. म्हणाला, ‘फक्त घोड्यावर बसायला लग्न केलं होतं का गाढवा?’ मनोजला खूप राग आला. सदानंद आणि मनोजला बिअर चढली होती. सदानंद म्हणाला, ‘मोहिनी आता तुझी बायको असली, तरी सांगतो. तिला त्रास नाही झाला पाहिजे. मी असतो तर फुलासारखी जपली असती तिला..’ हे ऐकून मनोज भडकला. तिथंच मारामारी झाली. मनोज म्हणाला, ‘आता माफी नाही. शब्द पाळायचा. आता तुझी गाढवावर वरात काढूनच शांत बसणार मी!’ बारमधल्या लोकांना तो ओरडून सांगू लागला.. गाढव आणा.. ह्याला आताच्या आता गाढवावर बसवणार.. एका बापाचा असशील तर दिलेला शब्द पाळ.. पिणारे काही जण सदानंदच्या बाजूनं, तर काही मनोजच्या बाजूनं बोलू लागले. बिअर बारमध्ये तो चेष्टेचा विषय झाला. कंटाळून वेटर लोकांनी कसं तरी भांडण सोडवलं. कपडे फाटलेल्या अवस्थेत दोघे आपापल्या घरी निघून गेले.

पुढच्या आठवड्यात मनोज दोन दिवस सुटीवर गेला. मोहिनीच्या गावी जत्रा होती. मनोज परत आला, पण कुणाशी बोलत नव्हता. शांत होता. अचानक दुकानातला एक जण जोरजोरात हसू लागला. दुसरा एक जण त्याच्याजवळ गेला. तोही मोबाइल बघून जोरात हसू लागला. त्यांनी सदानंदला बोलवलं. सदानंदनेही मोबाइल बघितला. मनोजचा फोटो होता. गाढवावर. त्याची गाढवावर वरात निघाली होती. एकतीस डिसेंबरला मोहिनीच्या गावच्या जत्रेत नवीन जावयाला गाढवावर बसवून वरात काढतात. फटाके फोडतात. बँड लावतात. त्यामुळे जावयाला दीर्घ आयुष्य लाभतं. जुनी प्रथा आहे. गावचा नवस आहे. मनोज नाही म्हणू शकला नाही. देवाच्या नवसाचा प्रश्न होता. आता तो फोटो पेपरमध्ये आला. सोशल मीडियावर व्हायरल झाला. मनोज मात्र शांत बसला होता.

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com

बातम्या आणखी आहेत...