आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढवेळा:चौकातल्या झाडाची गोष्ट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौकाच्या बंद पडलेल्या कारंजात कालपासून एक माणूस येऊन पडलाय. पोलिस चौकीच्या खिडकीतून डोकावलं तरी तो चौक दिसतो. तरी दुपारपर्यंत काही हालचाल झाली नाही. विचारल्यावर कळलं, की एक हवालदार येऊन बघून गेला. आतला माणूस जिवंत होता. आता माणूस जिवंत आहे म्हटल्यावर हवालदाराला जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखं वाटलं असेल. कारंजात पडलेल्या माणसावर दया येऊन चौकातल्या भजेवाल्यानं भज्याचं एक पुडकं त्याच्या पुढ्यात टाकलं. त्या माणसाला हातानं जरा हलवलं आणि गेलो. पण त्यानं ते खाल्ले नाही. थोड्या वेळात एक कावळा आला. एक भजं खाऊन उडून गेला. जरा वेळानं परत आला, तोच असावा. दोन भजे उचलले. खाल्ले नाहीत. उडून गेला. काही वेळात मग तिथं कावळ्यांचा जथ्थाच आला. म्हणजे मघाशी परत दोन भजे उचलले ते पुराव्यासाठी नेले होते तर... कावळ्यांनी गलका केला. कारंजात पडलेल्या माणसासाठीच्या पुडक्यातले काही भजे संपवले. शेवटचे चार भजे छोट्या कावळ्यानं चोचीत घेतले तर मोठ्या कावळ्यानं चोच मारून ते ठेवायला सांगितले. कारंजात पडलेल्या माणसासाठी ठेवले असतील. आता कारंजाच्या वरच्या कठड्यावर सगळे कावळे गोलाकार बसले. कुणीही आवाज करत नव्हतं. एखादी भरधाव गाडी बाजूनं गेली, तर काही भित्रे कावळे उडून पुन्हा बसत. काही जागेवरच दिशा बदलत, तर काही आहेत तसेच शांत बसून राहात. मी जरा जवळ जायचं ठरवलं. कठड्यावर पाय ठेवला. चार कावळे उडाले. मी कारंजात पडलेल्या माणसाला हाक मारली. तो हलत नाही म्हटल्यावर मी त्याला हात लावायला पुढं सरसावलो. तितक्यात एका कावळ्यानं माझ्या हाताला चोच मारली. मी घाबरून मागं सरकलो. आणि टपरीवर जाऊन माझा चहा संपवला. जमा झालेल्या गर्दीची, नवं काही घडत नसल्यानं उत्सुकता संपली होती. सगळे कामाला लागले. पण, मी पाहत राहिलो. सगळ्यांसाठी हे काही विशेष नसलं, तरी माझ्यासाठी हे अघटित होतं.

या चौकात कारंजा नव्हता, तेव्हा फक्त एक वाट होती. मूळ रस्ता आणखी दुसरीकडून जात असे. ज्या जागेवर आज कारंजा आहे, तिथं पूर्वी एक झाड होतं. ते झाड जेव्हा कापायचं ठरलं तेव्हा त्याला विरोध करणारा एक जण होता. त्याच्या हातात बाजारहाटाची कापडी पिशवी होती. येणाऱ्या अजस्र हाताच्या पिवळ्या जेसीबीसमोर तो टिंबभर माणूस उभा राहिला. त्या अजस्र पिवळ्या हाताच्या जेसीबीनं तो टिंब पुसला. या घटनेचे साक्षीदार होते झाडावर बसलेले असंख्य कावळे. या कावळ्यांनी जेसीबीवर सहस्त्र चोचा मारून तो उलथवून टाकण्याचा कट रचला. पण फार फार तर काचेला तडे गेले. झाड पडल्यानंतर कत्तलीचे पुरावे पुसायला तिथं एक रोडरोलर आला होता. आपल्या काळ्या कृत्यावर आणखी नवा काळा थर चढवून सगळे पुरावे नष्ट करण्यात आले. आता तिथं एक चौक तयार झाला. नव्या चौकात हळूहळू वर्दळ वाढली. वर्दळीमुळे आजूबाजूच्या झाडांवरच्या पाखरांनी झाडं सोडली. झाडांना शहर आवडतं, पण शहरी होणं आवडत नाही. शहरातल्या झाडांना सतत जमीनदोस्त होण्याची भीती असते. गावाकडच्या झाडांना ती नसते, कारण गावाला शहरासारखी भेसूर स्वप्नं पडत नाहीत. मागं पावसाची एक सर सांगत होती, वडाच्या एका बोन्साय झाडानं शहात्तराव्या मजल्याच्या गॅलरीतून जीव दिला म्हणे. झाडानं देहत्याग करावा, इतकं प्रगत होऊन बसलोय आपण.

चौकात वर्दळ वाढली. अपघात वाढले. चौक भेसूर दिसू लागला. चौकात सिग्नल बसवावा इतका तो महत्त्वाचा नव्हता. म्हणून मग तिथं कारंजा उभारायचं योजलं गेलं. एका एनजीओच्या सुपीक डोक्यात कल्पना आली, की आपण ग्रीन कारंजा या संकल्पनेअंतर्गत तिथं झाडाच्या आकाराचा कारंजा बसवू. काम सुरू झाले. काम मध्यात आले अन् थांबले. कंत्राट दिलेला मुकादम पळून गेला. नवीन कंत्राटदारानं नव्यानं काम सुरू केलं, तेव्हा जुन्या कामाचा एक मजूर तिथं अडून राहिला. त्याचा मोबदला मागू लागला. पण, टिंब पुसून टाकला. कारंजा सुरू झाला. वर्दळ वाढली. वर्षभराचं कंत्राट संपल्यावर आता चौक धूळ खात पडू लागला. त्या कारंजात झाड होतं, पण पाणी नव्हतं. रंगपंचमीला त्या झाडावर पाणी यायचं. चौकात खेळ खेळले जायचे. अंगावरचे कपडे तिथंच फेकून लोक निघून जायचे. झाडावर लक्तरं लटकायची. चित्रविचित्र रंगाच्या कपड्यांनी कारंजाचं झाड बीभत्स दिसायचं.

एकदा एक वाटसरू; ज्याचं घर पूर्वी इथंच कुठं तरी होतं, तो ते शोधत तिथं आला. त्याचा पत्ता कुणालाच ओळखीचा नव्हता. तो आठवण सांगे, की त्याच्या घरातून एक अजस्र झाड दिसायचं. झाड सापडलं की त्याचं घर सापडेल. तो आणखी सांगू लागला, की तो लहानपणी गिरकी गिरकी खेळायचा. वर आभाळाकडं बघत, मागं मान टाकून गर गर गिरकी घ्यायचा. मग थांबलं की समोरचं सगळं जग एकमेकांत मिसळून जायचं. बिल्डिंगमध्ये रस्ते, रस्त्यामधून ढग.. सगळं जग उलटंपालटं होऊन जायचं. मग घरासमोर जे झाडं होतं, त्याला आधार म्हणून धरलं की परत हळूहळू सगळं जग जागेवर यायचं. तो भरकटला होता. त्याचं जग उलटंपालटं झालं होतं. पण धरायला आज झाड नव्हतं. तो झाड शोधत होता. कुणीतरी त्याला त्या चौकातलं झाड दाखवलं. तो त्याच्या सावलीत बसला. झाडाला बिलगून रडला. त्याला लोकांनी सांगितलं, की ते झाड खरं नाही. त्यानं झाडावर लटकलेली सगळी लक्तरं काढली. तो तिथंच बसून, जागेवर पडून राहिला. काही वेळानं खिशातून एक कागद-पेन काढून त्यावर काहीतरी खरडत राहिला. तिथंच झोपी गेला. त्याच्या खिशातला हा कागद... झाडाला माहीतही नसतं त्याच्या सावलीत काय काय होतं? चार दगडं असतात त्यातला एक मोठा होतो मग त्या मोठ्याकडं लोक येतात चार लोक येतात त्यातला एक झोपी जातो झोप ढोंगाची असेल तर जनावर उठवतं चार जनावरं येतात त्यातला एक टांग देतो टांग वैयक्तिक असते, सामाजिक किंवा धार्मिकही चार गवतं उगवतात त्यातली एक दूर्वा होते गेऽऽऽली देवाला... पाखराच्या खोप्याची वीट चार पाखरं येतात त्यातलं एक फांदी होतं फांदीला पानं येतात, फुलं येतात, फळं येतात चार पानं येतात त्यातली एक वहीत जातं वहीला मागच्या पानावर फुलं येतात चार फुलं येतात त्यातलं एक वेणी होतं काहींची वेणी फळते चार फळं येतात त्यातलं एक जमिनीत जातं जमिनीला वर काय चाललंय कळत नाही चार फांद्या येतात त्यातलं एक सरपण होतं सरपण म्हणजे पडलेल्या फांद्या, तोडलेल्या नाही चार फांद्या येतात त्यातली एक कुऱ्हाड होते आताच्या लोकसंख्येला कुऱ्हाडसंख्या म्हणावं का? (जवळ) चार वाटा येतात त्यातली एक महामार्ग होते महामार्ग तरी कुठं धड होताहेत? चार फांद्या येतात त्यातलं एक सरण होतं सरणाचा धूर हवेत, झाडाचं धूड हवेत पण फळात बी नाही, बिया होत्या आठवतं? बियांना खोडंच असते उगवायची काही बिया माती धरतात काही आकाश... आणि आकाश धरलेल्या झाडाला.. झाडाला माहीतही नसतं त्याच्या सावलीत काय काय होतं? कारंजात पडलेल्या माणसानं कारंजातल्या पाइपाची दुरुस्ती केली. कारंजा सुरू केला. झाड पाण्यानं ओथंबून गेलं. चौकाला बहर आला. कारंजाखाली पडलेला चौकातला माणूस चौकात भिजत राहिला. तो तिथून उठलाच नाही. आता शहरानं त्या माणसाला पण त्या कारंजा चौकाचा एक भाग म्हणून स्वीकारलंय. तिथं सायंकाळी कावळेही येतात. कावळे, झाड, माणूस, कारंजा.. सगळं होतं तसंच आहे. कारंजात पडलेला माणूस आता रोज बसल्या बसल्या जमीन खरवडतोय. कारंजाचं पाणी जमिनीत मुरू लागलंय. मुळात झाड पाडू नये म्हणून आडवा झालेल्या कापडी पिशवीवाल्या माणसाच्या पिशवीतल्या धान्यापर्यंत ते पाणी जावं. तिथल्या चौकात नवं झाड उगवावं...

प्राजक्त देशमुख deshmukhprajakt@gmail.com

बातम्या आणखी आहेत...