आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक-संचित:स्वप्नींचिया गोष्टी...

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगण्यातला मोकळा अवकाश स्वप्नांच्या देखण्या रांगोळ्यांनी भरून काढता येतो. सामान्य माणसांसाठी आयुष्याला न लाभलेला अर्थ मिळवून द्यायला तितकंही पुरेसं असतं! जगत असताना आपल्यापाशी नसलेल्याच गोष्टी जास्त असतात नेहमी. आपण कायमच वंचित आणि अभावग्रस्त समूहाचे शिलेदार. अशा वेळी या न लाभलेल्या गोष्टी स्वप्नं रंगवूनच मिळवत असतो आपण. आमच्या मानस सरोवरात डुंबणारे स्वप्नांचे हे राजहंस नसते आपल्यापाशी, तर या रुक्ष नि भयाण जगण्याचं काय झालं असतं?

स्वप्नं पडतात चिक्कार. स्वप्नात दिसतं कधीही न बघितलेलं जग. किंवा ते बघितलेलंच जग असावं, पण आता बहुधा ते विस्मरणात गेलेलं असतं. कधी तरी अगदी लहानपणी न कळत्या वयात अनुभवलेलं असं काही तरी असू शकतं त्यात. खरबरीत हात तुमच्या गालांवरून फिरवत, ‘बेग्गीनां व्हड्लो हो रे बाबा, दुनियेत नाव व्हव् दे माज्या पुताचा..’ असं काही तरी पुटपुटत अलाबला घेणारी, आशीर्वाद देणारी म्हातारी कधी तरी तान्ह्या वयात भेटलेली असते. तिचा तो वत्सल, मायाळू स्पर्श अचानकपणे दुसऱ्या कुठल्याही तशा स्पर्शात एखाद्या स्वप्नात आपल्याला सापडू शकतो. नुसते स्पर्शच नव्हेत, तर गुरांच्या गळ्यांतील घुंगरांचे आवाज, चुलीत करपलेल्या सुकटांचे वास, असं सगळं आपल्याला स्वप्नात दिसणारं आपल्या याच जन्मातलं असतं. बाकी काहीही असो; पण एक नक्कीच खरं आहे की, वर्तमान जगणं पूर्णपणे विसरून जावं, असंच काही तरी असतं त्या स्वप्नातल्या जगात. त्यात आनंदासोबत दुःख असलं किंवा उत्तेजित, उल्हसित होण्यासोबत निराशा यावी, मन उदासून जावं, भय वाटावं, असं काही असलं, तरी तेही एक प्रकारची सात्त्विक, सुंदर निरागसता लपेटून आलेलं असतं. त्यामुळे ते दुःख, निराशा, भयही हवंहवंसं वाटतं. कोलमडून पडावं, काळवंडून जावं, असं काही नसतं त्यात. आपल्याला आजच्या वैराण जगण्यापासून दूर कुठं तरी एका अद्भुत आणि मनोरम्य प्रदेशात घेऊन जाणारी ती जादू नक्की काय असते?

माणसाला कल्पना करता येतात. माणसाला स्वप्नं पाहता येतात. स्वप्नात जगण्याच्या प्रेरणा मिळतात. ऊर्जा मिळते. प्रत्यक्षात साकार न होणाऱ्या गोष्टी स्वप्नात तरी नक्की साकार होत असतात. स्वप्नं नसती तर माणसांचं काय झालं असतं, याची मात्र कल्पनाही करता येत नाही. जगातल्या वेगवेगळ्या भाषांतल्या लोकसाहित्यात स्वप्नांचा खूप कल्पक पद्धतीने उपयोग करून घेतला आहे. मिथकं आणि दंतकथांच्या विश्वातही स्वप्नांना फार महत्त्व आहे. आमच्याकडे, कोकण आणि गोव्याकडे तर प्रत्येक ग्रामदैवताशी संबंधित काही ना काही मिथ्यकथा असल्याच्या दिसतात. त्यात बहुतेक सगळ्या कथांमध्ये एक स्वप्न असतं. स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टी समान असतात. गुरं राखता राखता झाडाखाली पहुडलेल्या कुण्या गुराख्याचा डोळा लागतो. त्याच्या स्वप्नात कुणीतरी नागदेवता किंवा जख्खड म्हातारा वगैरे येऊन सांगतो - ‘मला बाहेर काढ, माझा जीव इथे गुदमरतोय..’ स्वप्नातल्या दृष्टांताप्रमाणे त्या झाडाखाली खणल्यावर तिथे मूर्ती किंवा लिंग वगैरे सापडते. पुढे मग एका रात्रीत तिथं देऊळ बांधल्याच्याही दंतकथा त्यात मिसळल्या जातात. एकूण काय, तर स्वप्नात दृष्टांत होतात, भविष्याचं सूचन केलं जातं, वर्षानुवर्षे भुईच्या आत कोंडून पडलेल्या जिवांचा उद्धार स्वप्नामुळे होतो.

एखाद्यासाठी आयुष्याचं प्रयोजनही स्वप्नात लाभतं. फार लांबचं कशाला, आपल्या तुकाराम महाराजांचंच पाहा ना! त्यांनाही स्वप्नातच दृष्टांत झाला होता! प्रत्यक्ष पांडुरंगासमवेत नामदेवांनी त्यांच्या स्वप्नात येऊन आदेश दिला, ‘अभंग लिही, शतकोटी अभंग लिही.’ दुष्काळ आणि त्यानंतरच्या सामाजिक, कौटुंबिक पडझडीमुळे तुकोबा मानसिकदृष्ट्या होरपळून निघाले होते. लौकिक जगण्यात उद्ध्वस्त झाले होते. अशा त्या तितरबितर काळात त्यांना आपल्या आयुष्याचं प्रयोजन काय आहे, कळत नव्हतं. पण, ते कळून आलं त्या एका स्वप्नामुळे. अर्थात, हे खरं आहे की, सर्जनशील कलावंतासाठी अशी स्वप्नं कदाचित निमित्तमात्रही असू शकतात. त्यांच्या मनात आधीपासूनच घोळणाऱ्या एखाद्या विचाराला स्वप्नात पुष्टी मिळते, असं फार तर म्हणता येईल. तुकाराम महाराजांसारख्यांसाठी तर जगण्याचा अनुभवच मुळात स्वप्नासारखा भासमय होता. कुटुंबसुख, व्यावसायिक यश, गावातली उंचावलेली पत, सगळंच स्वप्नवत. आणि बघता बघता दुष्काळाच्या एका फटक्यात क्षणात सगळं होत्याचं नव्हतं होऊन जाणं. त्या मोहनिद्रेतून भानावर आणण्यासाठी नामदेवांच्या अभंगांनी त्यांना प्रेरणा दिली असावी, असंही आपण म्हणू शकतो. पण, आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी मात्र ही स्वप्नंच जगणं सुसह्य करतात, भविष्याची सोनेरी वाट दाखवतात, हे खरं आहे. वाट दावुनी दूर राहिला पांडुरंग.. ही ओळ वाचताना माझ्या मनात तरी हा ‘पांडुरंग’ एखाद्या स्वप्नापेक्षा वेगळा नक्कीच नसतो.

गेल्या आठवड्यात दोन अप्रतिम नाटकं बघितली. दोन्हीकडे एक गोष्ट म्हटली तर समान होती. निर्दयपणे अंगावर येऊन कोसळणाऱ्या असह्य वर्तमानाला सामोरं जाताना माणसं कशी स्वप्नांचा आधार घेऊन जगत असतात, हे त्या दोन्ही नाटकांचं एक अंतःसूत्र होतं. त्यातलं पहिलं नाटक होतं संदेश कुलकर्णींनी लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं आणि अभिनय केलेलं ‘पुनश्च हनिमून’. तर दुसरं दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘तो राजहंस एक’. या दोन्ही नाटकांतली प्रमुखं पात्रं आपापल्या रोजच्या आयुष्याशी झटाझोंबी करताना मेटाकुटीला आलेली आहेत. काहीशी हताश झालेली आहेत. तरीही ती आयुष्यात गमावलेल्या गोष्टी लाभल्याची, आयुष्य सुंदर आणि आनंदी झाल्याची स्वप्नं पाहत राहतात. त्यांना त्यांच्या आयुष्याचा मोकळा अवकाश स्वप्नांच्या देखण्या रांगोळ्यांनी भरून काढता येतो. आयुष्याला न लाभलेला अर्थ मिळवून द्यायला तितकंही पुरेसं असतं ना सामान्य माणसांसाठी! जगत असताना आपल्यापाशी नसलेल्याच गोष्टी जास्त असतात नेहमी. आपण कायमच वंचित आणि अभावग्रस्त समूहाचे शिलेदार. अशा वेळी या न लाभलेल्या गोष्टी स्वप्नं रंगवूनच मिळवत असतो आपण.आमच्या मानस सरोवरात डुंबणारे स्वप्नांचे हे राजहंस नसते आपल्यापाशी, तर या रुक्ष नि भयाण जगण्याचं काय झालं असतं?

बातम्या आणखी आहेत...