आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिसेस ट्रॅव्हर्स अखेर करारपत्रावर सही करते आणि पुढच्या तीन वर्षांत ‘मेरी पॉपिन्स’ पडद्यावर झळकतो. त्याच्या प्रीमियरला ती न बोलावता हजर राहते. पडद्यावरच्या मिस्टर बँक्सना मेरी पॉपिन्सनं वाचवलं आहे, आता ते आणि त्यांचे कुटुंबीय आनंदात राहत आहेत, हे पाहून तिच्या चेहऱ्यावर आयुष्य सार्थकी लागल्याचा भाव दाटतो. तिच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि जगण्याचं प्रतिबिंब नेमकं उमटवणारा ‘सेव्हिंग मिस्टर बँक्स’च्या कथेचा हा शेवट प्रेक्षकांनाही भावल्याशिवाय राहत नाही.
लेखकाला पात्रं कुठं भेटतात, हे काही सांगता येत नाही. हे लोक त्याला कुठं तरी भेटलेले तरी असतात किंवा त्याच्या सहवासातले तरी असतात. पण, या सगळ्या व्यक्तिरेखांमधून सर्वाधिक प्रभावी त्याच ठरतात, ज्यांच्या उरात काहीतरी ठसठसणारं दुःख असतं. फक्त आनंदी माणूस गोष्ट वाचणाऱ्याला सहसा आकर्षित करून घेत नाही. व्यक्तिरेखांमध्ये दिसणारं हे ठसठसणारं दुःख येतं कुठून? की त्या वेदनेकडं लेखक आकर्षित होतो? की ती वेदना त्या लेखकाचीच असते? शेवटच्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच वेळा ‘होय’ असंच देता येईल. अनेकदा लेखकाची सगळ्यात परिणामकारक कलाकृती त्याच्या आयुष्यावर आधारित असते, असं म्हणतात ते खोटं नाही. ‘सेव्हिंग मिस्टर बँक्स’ या चित्रपटाची कथाही साधारण अशीच म्हणता येईल. ती घडते साठच्या दशकात. ‘मेरी पॉपिन्स’ या जगभरातल्या मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या पुस्तकाची लेखिका पी. एल. ट्रॅवर्स आणि तिच्या या पुस्तकावर चित्रपट काढू इच्छिणाऱ्या वॉल्ट डिस्नी या दोघांमध्ये ही गोष्ट मुख्यतः घडते. मिसेस ट्रॅव्हर्सच्या मेरी पॉपिन्सने मुलांना वेड लावले आहे. तिच्या लेखणीतून निर्माण झालेली पात्रे तिच्याच भावविश्वाचा मोठा भाग बनली आहेत. बालपणात भोगलेली दुःखं, वेदना तिला खुपतात. त्यांच्यावर फुंकर घालताना ती आपल्या लेखणीतून स्वत:च्या वाट्याला न आलेले लहानपण रेखाटते.
मिसेस ट्रॅव्हर्स इंग्लंडमध्ये राहणारी एक कटकटी बाई आहे. तिच्यात आजूबाजूच्या लोकांबद्दल काहीही ओलावा नाही. कटकटी असण्याबरोबर ती विचित्रही आहे. तिनं लिहिलेल्या ‘मेरी पॉपिन्स’वर आधारित चित्रपट बनवण्याची वॉल्ट डिस्नी यांची इच्छा आहे. लहान मुलांच्या काल्पनिक जगाला प्रत्यक्षात उतरवणारे वॉल्ट एखाद्या महाराजापेक्षा कमी नाहीत. त्यांच्या तुलनेत अगदीच सामान्य आयुष्य जगणाऱ्या मिसेस ट्रॅव्हर्सला मात्र त्याचे सोयरसुतक नाही. वॉल्ट एक - दोन नाही, तब्बल वीस वर्षे तिच्याकडं मेरी पॉपिन्सवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी परवानगी मागत आहेत, पण मिसेस ट्रॅव्हर्सला या पुस्तकाचे बाजारी रूप मान्य नाही. ती वीस वर्षे त्याला नकार देत आहे. आता मात्र आपल्या एजंटच्या विनवणीवरून ती अमेरिकेला जायला तयार होते. दोन आठवडे डिस्नी स्टुडिओत मेरी पॉपिन्सच्या स्क्रीप्टवर काम करायचे आणि आपल्या मतानुसार स्क्रिप्ट लिहिले गेले नाही, तर करारपत्रावर आपण सही करणार नाही, या अटीवर ती अमेरिकेला रवाना होते.
मेरी पॉपिन्स ही मिसेस ट्रॅव्हर्सची मानसकन्या. संकटात असलेल्या कुटंुबातल्या मुलांच्या मदतीला जाणं हे तिचं काम. अतिशय कडक स्वभावाची मेरी पॉपिन्स बँक्स नावाच्या कुटुंबीयांकडे राहायला आली आहे, अशी काहीशी कथा आहे. त्यात अनेक जादुई गोष्टी आहेत, अनेक गमतीशीर लोक आहेत, बँक्स कुटुंबातली दोन गोजरी मुलं, त्यांची आई आणि वडील, बँकेत काम करणारे मिस्टर बँक्स आहेत. ही गोष्ट मुलांमध्ये इतकी लोकप्रिय आहे, की डिस्नीसारख्या मुलांसाठी चित्रपट बनवणाऱ्या कंपनीला यावर आधारित सिनेमा बनवताना काहीच अडचण येणार नाही, असं कंपनीला वाटतं.
मिसेस ट्रॅव्हर्सचे नाव पॅमेला आहे, पण तिला कुणीही नावानं हाक मारलेली चालत नाही. ओळख ना देख, मग मला नावाने हाक का मारता? मला मिसेस ट्रॅव्हर्सच म्हणा, असा तिचा आग्रह आहे. आणि आणखी एक आग्रह आहे, तो म्हणजे मला कोणत्याही कामात मदत करु नका, माझी कामे करण्यास मी पूर्णपणे सक्षम आहे. I am perfectly capable of it.. हा तिचा मंत्र आहे. अशी कटकटी मिसेस ट्रॅव्हर्स लॉस एंजेलिसला येते आणि डिस्नीच्या लेखकांना सळो की पळो करुन सोडते. तिला खुश कसं ठेवावं, हा मोठा प्रश्न मेरी पॉपिन्सच्या स्क्रीप्टवर काम करणाऱ्या लेखकांना सतत पडलेला आहे. पण, काहीही केलं तरी ना तिचं समाधान होतं ना तिची वाणी कमी कडवट होते. वॉल्ट मात्र या सगळ्या गदारोळात मिसेस ट्रॅव्हर्सशी शांतपणे बोलत असतो. मी वीस वर्षे मेरी पॉपिन्सचा पाठपुरावा का केला, हे सांगताना वॉल्ट म्हणतात, की माझ्या लेकींना मेरी पॉपिन्सनं वेड लावलं आणि तेव्हा मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की या गोष्टीवर मी सिनेमा बनवेन आणि आपलं हे वचन पूर्ण करणं मला भाग आहे. एक बाप आपल्या मुलींना दिलेलं वचन विसरेल का? मग मला हा चित्रपट बनवायलाच हवा. वॉल्टचे म्हणणे मख्ख चेहऱ्यानं ऐकणारी मिसेस ट्रॅव्हर्स एका बाजूने पूर्णपणे भूतकाळात जगत आहे. नखशिखांत इंग्लिश लेडी म्हणून वावरणारी ट्रॅव्हर्स भूतकाळातली हेलन हॉफ आहे. ती, तिच्या बहिणी आणि आई-वडिलांबरोबर ऑस्ट्रेलियात राहत असताना जगलेलं आयुष्य ती वर्तमानकाळात पुन्हा पुन्हा जगत आहे. तिच्या आठवणी, तिचं बालपण तिला सोडत नाही. लहानपणी वडिलांसोबत घालवलेले जादुई क्षण, दारूच्या व्यसनापायी तिच्या वडिलांची झालेली दुर्दशा तिची पाठ सोडत नाही. हेलनचे तिच्या वडिलांवर - ट्रॅव्हर्स गॉफवर फार प्रेम आहे. ट्रॅव्हर्सने तिला काल्पनिक जगाची सफर करायला शिकवलं आहे. ट्रॅव्हर्सचे हेलनवर खूप प्रेम आहे, पण सततच्या अपयशांमुळे तो वैतागला आहे.
लॉस एंजलिसमध्ये मेरी पॉपिन्सवर काम करताना मिसेस ट्रॅव्हर्स तुकड्यातुकड्यांमध्ये कळत जाते. तिचं दुःख, तिचा वैताग, लहान मुलांसाठी काही तरी अद्भुत लिहिण्याची तिची हातोटी असताना प्रत्यक्षात मुलांसह सगळ्यांशी फटकून वागणाऱ्या मिसेस ट्रॅव्हर्समागची व्यक्ती समजून घेण्याचा प्रयत्न वॉल्ट यांच्यापासून सगळे जण करत आहेत. पण, त्यांना यश मिळत नाही. वॉल्ट एकदा आपल्या सेक्रेटरीला पण विचारतात, ‘तू बाई आहेस ना, मग मला सांग, हिचा उलगडा कसा करू?’ मिसेस ट्रॅव्हर्स पदोपदी स्क्रीप्टला आक्षेप घेत असते.. मला कार्टूनमधले पेंग्विन नको आहेत, मला हा चित्रपट सांगीतिका म्हणून चालणार नाही.. असे एक ना अनेक.. मेरी पॉपिन्स ही परीराणी नाही, ती कटक गव्हर्नेस (मुलांना सांभाळणारी) आहे, हे ती सतत सांगत असते. शेवटी वॉल्ट तिला विचारतात, आकाशातून उडत येणारी, बोलणाऱ्या छत्रीबरोबर गप्पा मारणारी मेरी पॉपिन्स मुलांना वाचवायला आली आहे ना? त्यावर, ‘मुलांना वाचवायला ती आली आहे, असं तुम्हाला वाटतं?’ असं विषादानं म्हणत मिसेस ट्रॅव्हर्स निघून जाते. आता तिला समजून घेण्यासाठी सगळे जण मनापासून प्रयत्न करू लागतात. हळूहळू तिला स्क्रीप्ट कधीमधी आवडू लागते, पण मेरी पॉपिन्सच्या कथेतल्या मुलांचा बाबा इतका कठोर का रंगवता आहात, असं विचारता विचारता ती रडू लागते. तिच्या म्हणण्यात तथ्य आहे, हे समजल्यावर लेखकही शेवट बदलतात आणि कथेतल्या मुलांच्या बाबाची चांगली बाजू दाखवतात. इतकेच नाही तर त्याच्यासाठी वेगळं गाणं लिहून त्याला पूर्णपणे न्याय देतात.
आता चित्रपट आरामात पूर्ण होईल आणि मिसेस ट्रॅव्हर्स करारपत्रावर सही करेल, असं वाटत असतानाच एक दिवस तिला कळतं की पडद्यावर पेंग्विन्स अॅनिमेशनच्या म्हणजे चित्राच्या स्वरूपात दाखवले जाणार आहेत. तिच्या रागाचा भडका उडतो आणि ती रागारागानं इंग्लंडला परतते. ती परतल्यानंतर वॉल्ट यांना तिचं खरं नाव, तिची पार्श्वभूमी कळते आणि ते तिच्या मागोमाग इंग्लंडला, तिच्या घरी जाऊन पोहोचतात. त्यांना बघितल्यावर चक्रावलेली मिसेस ट्रॅव्हर्स त्याला घरात घेते, पण करारपत्रावर सही करायला नकार देते. तेव्हा वॉल्ट तिला त्याच्या खडतर लहानपणाची गोष्ट सांगतो. तिला सांगतो, ‘माझे माझ्या आयुष्यावर प्रेम आहे, माझी कोणतीही तक्रार नाही, पण आजही मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी ते लहानपण मला खुपते. तू म्हणालीस मेरी पॉपिन्स मुलांना वाचवण्यासाठी आली नाही.. आणि ते खरेच आहे. ती मुलांच्या बाबाला वाचवायला आली आहे. त्या बाबाला वाचवण्यासाठीच ही गोष्ट पडद्यावर आली पाहिजे.’ मिसेस ट्रॅव्हर्स अखेर करारपत्रावर सही करते आणि पुढच्या तीन वर्षांत ‘मेरी पॉपिन्स’ पडद्यावर झळकतो. त्याच्या प्रीमियरला ती न बोलावता हजर राहते आणि पडद्यावरच्या बँक्स कुटुंबीयांना बघून आनंदाश्रू ढाळते. तिच्या मिस्टर बँक्सना मेरी पॉपिन्सनं वाचवलं आहे, आता ते आणि त्यांचे कुटुंबीय आनंदात राहत आहेत, हे पाहून तिच्या चेहऱ्यावर आयुष्य सार्थकी लागल्याचा भाव दाटतो. तिच्या व्यक्तिमत्त्वाचं अन् जगण्याचं प्रतिबिंब उमटवणारा कथेचा हा शेवट प्रेक्षकांनाही भावल्याशिवाय राहत नाही.
भक्ती चपळगावकर bhalwankarb@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.