आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख / ‘मामा’शिवाय पर्यायच नाही...

aurangabad6 महिन्यांपूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते शिवराजसिंह चौहान जे जनमानसात “मामा’ म्हणून ओळखले जातात

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासांतच मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून “या ट्विटला सांभाळून ठेवा... येत्या १५ ऑगस्टला कमलनाथ मुख्यमंत्री म्हणून पुन्हा ध्वजारोहण करतील आणि परेडला सलामी देतील,’ असा इशारा देण्यात आल्यामुळे मध्य प्रदेशचा सत्तासंघर्षाचा तिसरा सीझन लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर भाजपने अखेर आपले सरकार स्थापन केले. भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते शिवराजसिंह चौहान जे जनमानसात “मामा’ म्हणून ओळखले जातात त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. इतर काही पर्यायांचा विचार करून झाल्यानंतरच भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांच्या नावावरच शिक्कामोर्तब का केले, हा आता राजकीय वतुर्ळात चर्चेचा विषय ठरतोय.  २०१८ मध्ये मध्य प्रदेशात जर भाजपची सत्ता आली असती तर निर्विवादपणे शिवराजसिंह चौहानच मुख्यमंत्री झाले असते. मग आता मात्र इतर पर्याय का शोधले गेले? खरे म्हणजे अपक्ष आमदारांना सोबत घेऊन त्याच वेळी शिवराज चौहान सरकार स्थापण्याच्या प्रयत्नात होते. कॉँग्रेसने जे त्या वेळी केले तेच भाजपसारखा पक्ष अगदी सहज करू शकत होता. मात्र तब्बल १५ वर्षे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची उपभोगल्यानंतर पुन्हा शिवराज यांना संधी देण्यास पक्ष उत्सुक नव्हता आणि म्हणूनच त्या वेळी त्यांना पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळत नव्हता. आता कमलनाथ सरकार अल्पमतात गेल्यानंतर स्वाभाविकपणे शिवराज चौहान हेच मध्य प्रदेशचे सर्वेसर्वा आहेत हे दिसून आले. शिवराज चौहान हे लालकृष्ण अडवाणी यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. मोदी-शहा यांनी भाजपमधील अडवाणी समर्थकांची एकेक करून कशी वाताहत लावली याची यादी फार मोठी होईल.  शिवराज चौहान यांच्याबाबतीत मात्र तसे घडले नाही याचे कारण मध्य प्रदेशच्या जनमानसामध्ये असलेली त्यांची प्रतिमा आणि त्यांची कार्यशैली. शिवराज यांनी मध्य प्रदेशात राबवलेल्या अनेक योजना पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्तरावर राबवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला ज्योतिरादित्य यांच्या पक्ष सोडण्याच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही किंवा पक्षाने दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून त्यांना संशयाचा फायदाही देता येणार नाही. परंतु त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने कोणत्याही पातळीवर प्रयत्न केले नाहीत, ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. ज्या ज्योतिरादित्य शिंदेंमुळे शिवराज चौहान यांना सरकार स्थापन करता आले त्या “महाराजा’ ज्योतिरादित्य यांच्याबाबतीतही फारसे काही चांगले घडणार नाही असा अंदाज आहे. कमलनाथ आणि दिग्विजयसिंह यांचे वय आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या वयामधली तफावत पाहता महाराजांचा सिंहासनावर बसण्याचा मुहूर्त नजीकच्या काही वर्षांत तरी येणार नाही हे निश्चित.

0