आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्सव सातासमुद्रापारचा:अमेरिका, स्कॉटलंड आणि थायलंडमध्ये अशाप्रकारे साजरा केला जातोय गणेशोत्सव

नितीन पोटलाशेरू, मंगेश शेवाळकर|औरंगाबाद, हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्कॉटलंडच्या मायकेल-करुणाचा इको-फ्रेंडली बाप्पा, अमेरिकेत तरुणाईचा ‘गणपती बाप्पा माेरया...’

कोरोनाचे संकट घोंगावत असले तरी कुटुंब, मित्रमंडळींमध्ये गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही गणेशोत्सवाची धूम आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे, पण तरीही कुटुंबांमध्ये एकत्र येत गणरायाची मनोभावे आराधना केली जात आहे. अमेरिका, स्कॉटलंड आणि थायलंडमध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे याच्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न....

स्कॉटलंडच्या मायकेल-करुणाचा इको-फ्रेंडली बाप्पा

शिक्षणाच्या निमित्ताने स्कॉटलंडला गेलेल्या मुंबईतील करुणा श्रीवास्तव यांचा अॅबरडीन शहरातील मायकेल स्कोझेक्लोडा यांच्याशी प्रेमविवाह झाला. अगदी लग्नाच्या पूर्वीपासून मायकेलला भारतीय सण, संस्कृती आणि येथील लोकांबद्दल प्रचंड आकर्षण होते. याचमुळे मायकेलच्या कुटुंबात भारतातील सण आजही साजरे होतात. स्कॉटलंडच्या संस्कृतीसह मुलांना भारतीय व मराठी संस्कृती कळावी म्हणून या वर्षीपासून दांपत्याने इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

विशेष म्हणजे एखाद्या मराठी कुटुंबामध्ये काही दिवस आधी बाप्पाच्या आगमनाची जशी तयारी केली जाते त्याप्रमाणे मायकेल-करुणा आणि त्यांच्या मुला-मुलीची गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली. बाप्पाची मूर्ती मातीचीच असली पाहिजे असा पूर्ण कुटुंबाचा आग्रह होता. त्याप्रमाणे माती आणली व यूट्यूबवर व्हिडिओ पाहत मायकेल व त्यांच्या मुला-मुलीने छोटीशी मूर्ती घडवण्याचा आनंद घेतला. करुणा यांनीही पुण्यात राहणाऱ्या आई सुनीता श्रीवास्तव यांच्याकडून फराळ व पूजेचा विधी जाणून घेतला. आईने व्हिडिओ कॉलवर सर्व गोष्टी सांगितल्यानंतर घरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

पाच दिवस असणार उत्सवाची धूम :

स्कोझेक्लोडा कुटुंबाने पाच दिवसांसाठी गणरायाची प्रतिष्ठापना केली. भारतीय कुटुंबात जसे दोन वेळा आरती, पूजा केली जाते नैवेद्य दाखवला जातो, त्याप्रमाणे हा सण साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे कुटुंबातील आई-वडील, अॅबरडीन शहरातील जवळची मित्रमंडळी त्यांच्या या उत्सवात सहभागी होत आहेत.

उत्सव पाच दिवस, तयारी मात्र १५ दिवसांपासून करतोय

मला भारतीय संस्कृतीबद्दल प्रचंड आकर्षण आहे. मुलांनाही भारतीय संस्कृती, सणांची माहिती व्हावी तसेच तेथील संस्कृतीशी नाळ जुळून राहावी म्हणून या वर्षीपासून गणेशोत्सव आम्ही साजरा करतोय. उत्सव पाच दिवसांचा आहे, पण याची तयारी आम्ही १५ दिवसांपासून करत होतो, असे मायकेल यांनी सांगितले.

अमेरिकेत तरुणाईचा ‘गणपती बाप्पा माेरया...’

भारतात उच्च शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील मिशिगन राज्यातील ट्रॉय व वेस्टलँड शहरात राहणारे भारतीय तरुण जल्लाेषात गणेशाेत्सव साजरा करत आहेत. या वेळी आयोध्येतील राम मंदिराचा देखावा त्यांनी उभारला आहे.

सागर खैरे, अनिरुद्ध शिरसाट, अभिषेक शेलार, गणेश भोकरे, सिद्धांत अभांगे, प्रिया हरकरे, कल्पेश कुबेर, अदिती कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी, शर्वरी भावसार, तनया शिवनामे, विवेक चौधरी, गीतांजली चौधरी हे सर्वजण मागील आठ ते दहा वर्षांपासून नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत राहतात. परदेशात राहूनही गणेशोत्सवासह ते गोकुळाष्टमी, दसरा, नवरात्र महोत्सव, संक्रांत, धूलिवंदन आदी सण-उत्सव साजरे केले जातात. कोरोनाचा धोका असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग पाळत ते हा सण साजरा करत आहेत. मिशिगन राज्यातील ट्रॉय या शहरात असलेल्या पटेल ब्रदर्स या दुकानातून गणेशमूर्ती खरेदी करून अगदी साध्या पद्धतीने मूर्तीची स्थापना केली आहे. या ठिकाणी दररोज दहा दिवस आरती तसेच प्रसादाचा कार्यक्रम घेऊन गणपती बाप्पाचा गजर केला जात आहे.

संस्कृतीची नाळ कायम

अमेरिकेमध्ये असतानाही या भागात असलेले प्रत्येक भारतीय सण-उत्सवाच्या काळात एकत्र येतात. लहान मुलांना भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी तसेच भारतीय सण व उत्सव यांची माहिती मिळावी या उद्देशाने हे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यामुळे अमेरिकेत राहूनदेखील भारतीय संस्कृतीची नाळ कायम राहणार आहे. - विवेक चौधरी, वेस्ट लँड (मिशिगन)

थायलंडमध्ये विघ्नहर्त्याची आराधना

थायलंडमध्ये प्राचीन काळापासून गणेश पूजनाची प्रथा आहे. यशाची आणि भाग्याची देवता म्हणून गणरायाचे येथे पूजन केले जाते. तसेच विघ्नहर्ता म्हणूनही गणेशाची आराधना करण्यात येते. थायलंडचे लोक गणपती पूजन करताना मूर्तीभोवती सुंदर सजावट करतात. कोणत्याही शुभ कार्याचा मुहूर्त येथे गणपती पूजनानेच केला जातो. थायलंडमध्ये सहावा आणि आठवा राम या हिंदू राजांच्या काळात अनेक गणेशमंदिरे बांधली गेली आहेत.