आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:असा हा जातीचा ‘पिंजरा’

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"पिंजरा' या व्ही. शांताराम यांच्या अजरामर ठरलेल्या कलाकृतीचे यंदाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष... ‘पिंजरा’ मधील श्रीधर-चंद्रकला यांचे प्रेम हा साहित्यसृष्टीला ‘अस्पृश्य’ असणारा विषय नाही. तरीही ‘पिंजरा’ जिवाला चटका लावतो. तो कशामुळे? मास्तरामध्ये थोडाफार जिवंत असलेला ‘आदर्शवादी’ गुरुजी त्याला “विधिसंकेत” म्हणतो आणि सामाजिक ‘आदर्शवाद’ जिवंत ठेवण्यासाठी निर्दोष असणाऱ्या व्यक्तीने मृत्युदेखील पत्करला पाहिजे, असा ‘संदेश’ प्रेक्षकांना मिळतो. जातीसंघर्ष निकराला आलेल्या आजच्या काळात, या संदेशाची चिकित्सा करणे आवश्यक आहे.

कालवश शांताराम बापू हे भारतीय सिनेमा सृष्टीतील एक नामवंत नाव आहे. व्यावसायिक तसेच सामाजिक भान असणारे चित्रपट काढून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची पताका डौलाने फडकवित ठेवली होती. त्यांची उंची कोणत्याही मराठी सिने दिग्दर्शकाला अद्याप गाठता आलेली नाही. शांतारामबापूंचा मराठीत नावाजलेला व यशस्वी ठरलेला ‘पिंजरा’ १९७२ साली आला होता. यंदाचे पिंजराचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. कथानक वरवर पाहता तद्दन तमाशापटाचे आहे. अर्थात, तमाशापटावर हुकुमत असलेले अनंत माने दिग्दर्शन श्रेयनामावलीत असल्याने हे होणे अपरिहार्य होते. तरीही ‘पिंजरा’ हा तमाशापट नाही. तमाशाच्या कॅनवासवर रंगविलेले ते एक आशयगर्भ कलाचित्र आहे. “आउटफोकस” असलेला आदर्श गाव व “फोकस” असलेली तमाशा कलावंतीण यांच्या संघर्षाला तात्विक व मानवी कंगोऱ्यांची भरजरी झालर लागली असल्याने हा चित्रपट तमाशापटाच्या सीमारेषा ओलांडून फार पुढे जातो. ‘शांताराम टच’ असल्याशिवाय हे होणे नाही. श्रीधरपंत वैद्य हा अविवाहित ब्राह्मण तरुण गाव ‘आदर्श’ करण्याच्या ध्येयाने पछाडलेला आहे. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणे, प्रौढ साक्षरता वर्ग चालविणे, वेळप्रसंगी पारंपारिक वैद्यकीचा उपयोग करुन अडल्या-नडल्यांना मदत करणे अशा गोष्टींमुळे गावाचे पाटील सगळा गावकारभार या श्रीधर गुरुजीच्या सल्लामसलतीने करतात. विवेकानंद व हनुमान यांच्यावर विशेष श्रद्धा ठेवून असल्याने ब्रह्मचर्य पालन करण्यावर गुरुजीचा जादा कटाक्ष आहे. अशा आदर्श गावात मद्यपान तसेच तमाशावरही बंदी आहे. मात्र, खुद्द गावच्या पाटलाचा मुलगा बाजीराव व काही जणांना हे पटत नसल्याने उजळ माथ्याने नाही परंतु लपून छपून दारु विकणे, छेडछाड काढणे, असे उपद्व्याप ते करीत असतात.

या सोवळ्या गावात चंद्रकला चंद्रावळीकर या देखण्या नर्तकीचा तमाशा येतो. परंतु गावाच्या प्रवेशद्वारापाशीच येथे तमाशाला बंदी असल्याची बातमी कळल्यामुळे खुद्द चंद्रकला श्रीधर गुरुजीची परवानगी घेण्यासाठी जाते. तिच्या रुप लावण्याचा काहीही परिणाम न होता गुरुजी आपल्या बंदीवर ठाम राहतो. हट्टाला पेटलेली चंद्रकला गावच्या माळरानावर कनात टाकते. रात्रीच्या वेळेस ‘आदर्श’ गावातील गावकरी तमाशाला हजेरी लावतात. म्हणून मग पाटलांना सांगून गुरुजी कनात उद्ध्वस्त करतो. त्यात चंद्रकलेचे घुंगरु व तमाशातील तुणतुणे यांची अवहेलना होते.

कनात उद््ध्वस्त झाल्यावर संतापलेली चंद्रकला गावाच्या हद्दीबाहेर नदीच्या पल्याड कनात बसवते. अर्थात, तिथेही गावकरी नदी ओलांडून तमाशा बघायला येतातच. त्यामुळे एकदा साक्षात गुरूजी गावक-यांना पकडण्यासाठी नदी पार करुन येतो. परंतु त्यापूर्वीच गावकरी पसार झालेले असतात. आणि मग एकट्या गुरुजीला पाहून चंद्रकला घुंगरांशी खेळताना पाय घसरुन पडण्याचे नाटक करते. त्यात तिचा गुडघा दुखावतो. घोट्यावर उपचार करण्याच्या निमित्ताने तिच्या रसभरीत कायादर्शनाने तरुण गुरुजीचे ‘ब्रह्मचर्य’ स्खलित होते. उपचाराच्या ‘निमित्ताने’ कनातीवर आलेल्या गुरुजी शोधण्यासाठी बाजीराव एकदा आपल्या पित्याला व गावक-यांना घेवून कनातीवर येतो. मात्र चंद्रकला त्याला लपवून ठेवते. त्यामुळे पाटील व गावकरी यांच्या मनातील गुरुजीची आदर्श प्रतिमा कायम राहाते, तथापि, खुद्द गुरुजीच्या मनातील ‘आदर्श गुरुजी’ मात्र मरु लागतो. तशातच बाजीरावाने छेड काढलेल्या एका विवाहितेच्या पतीकडून बाजीरावाचा खून होतो. मात्र, गुरुजीचाच खून करुन बाजीराव फरार झाल्याचा परिस्थितीजन्य निष्कर्ष गावकरी काढतात व “प्रारब्ध” फिरलेले ‘गुरुजी’ चंद्रकलाच्या फडातील सोंगाड्यासोबत तमाशातील कुत्र्यासारखे ‘मास्तर’ बनून राहतात. तिथे चंद्रकलाच्या अदावर फिदा होणारे ‘रसिक’ त्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर आघात करतात. त्याचा आर्थिक लाभावर होणारा दुष्परिणाम हेरुन, “व्यावहारिक” जुनी चंद्रकला म्हणजेच, आपल्या नायिकेची मोठी बहीण आक्का, मास्तराच्या जीवावर उठते. मग श्रीधरपंत वैद्य या गुरुजीच्या आदर्शवादाच्या वाताहतीची निमित्त व साक्षीदार झालेली चंद्रकला त्याच्यावरील प्रेमापोटी शेवटी आपल्या तमाशा फडापासून वेगळी होते. तथापि, ती नव्या जीवनाची स्वप्ने पाहात असतानाच जुन्या गुरुजींच्या खुनाबद्दल नव्या मास्तराला पोलिस पकडतात व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे मास्तराला फाशी होते. त्याआधीच न्यायालयात प्रथम चंद्रकलाची वाचा जाते व नंतर मास्तरांना फाशी झाल्याचे ऐकून मानसिक धक्क्याने तिचा जीवही जातो. चित्रपटाचे थोडक्यात कथानक हे असे आहे.

उच्चजातीय तरुण व कनिष्ठ जातीय तरुणी यांच्यातील प्रेमसंबंध हा विषय कथासृष्टीला नवा नाही. वसिष्ठ व अक्षमाला उर्फ अरुंधती , तथागत शिष्य आनंदावर भाळलेली चांडाळ कन्यका , सर्वोत्कृष्ट संस्कृत नाटक म्हणून गणल्या गेलेल्या ‘मृच्छकटिक’ मधील ब्राह्मण नायक व गणिका वसंतसेना ही नायिका यांत हे ‘विरोधाचे ऐक्य’ दिसून येते. हिंदीतील ‘सुजाता’ चित्रपट अशाच प्रेमकथेवर आधारित आहे. त्यामुळे ‘पिंजरा’ मधील श्रीधर-चंद्रकला यांचे प्रेम हा साहित्यसृष्टीला ‘अस्पृश्य’ असणारा विषय नाही. तरीही ‘पिंजरा’ जिवाला चटका लावतो. तो कशामुळे? वरवर पाहाता श्रीधरपंत वैद्य व चंद्रकला यांचे नवजीवन उमलण्याच्या क्षणीच कायद्यामुळे विस्कटून जाते व शोकांतिका घडते, असे चित्र दिसते. परंतु, खरा खुनी ‘मास्तर’ नाही, हे मास्तराला तसेच चंद्रकलेलाही माहीत होते. तरीही हे गुपित उघड न करण्यासाठी श्रीधर तिला शपथ घालतो. त्या शपथेचा भंग करण्याच्या ऐनवेळी चंद्रकलेची वाचा जाते. मास्तरामध्ये थोडाफार जिवंत असलेला ‘आदर्शवादी’ गुरुजी त्याला “विधिसंकेत” म्हणतो आणि सामाजिक ‘आदर्शवाद’ जिवंत ठेवण्यासाठी निर्दोष असणाऱ्या व्यक्तीने मृत्युदेखील पत्करला पाहिजे, असा “संदेश” प्रेक्षकांना मिळतो. जातीसंघर्ष निकराला आलेल्या आजच्या काळात या संदेशाची चिकित्सा करणे आवश्यक आहे.

श्रीधर या कथानायकाच्या शाळेत महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत, हे खरे आहे. मात्र त्याच्या आदर्शवादात या दोन्ही महापुरुषांना काहीही स्थान नाही. गुरुजी फळ्यावर तारीख लिहिताना केलेल्या चित्रणावरुन या चित्रपटातील ग्रामीण वास्तव हे १९७० च्या काळातील असल्याचे समजून येते. हा महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या पायाभरणीचा काळ आहे. या काळात ग्रामीण विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाने राजकीय व आर्थिक क्षेत्रांत जम बसविला. त्यामुळे ब्राह्मण समाजाचे अस्तंगत होऊ घातलेले नेतृत्त्व शहरी प्रभावक्षेत्रांपुरते मर्यादित झाले. अशा काळात ‘जुन्या’ ‘उदात्त’ व ‘नितीमान’ परंपरेच्या आधारे गावात “सुधारणा” करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्राह्मणी मूल्यव्यवस्थासमर्थक दबावगटाचा प्रतिनिधी म्हणून श्रीधर उभा राहातो. त्याच्या आदर्शवादात गावातील जातीसंस्थानिर्मूलनाचा अजेंडा नाही. पहिल्याच भेटीत लावण्यवती चंद्रकला जेव्हा काही गावकऱ्याांना त्यांचा व्यवसाय विचारते, तेव्हा कोणी शेतकरी असल्याचे सांगतात, तर कोणी विणकर (साळी-कोष्टी) तर कोणी कुंभार. याच गावकऱ्यांांचा हवाला देवून, तमाशा हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय असल्याचा तर्कशुद्ध युक्तीवाद बुद्धिमान चंद्रकला करते व गावात तमाशा करण्याची परवानगी मागते. तिच्या युक्तीवादापुढे निष्प्रभ झालेला श्रीधर नितिमत्तेचे कारण सांगून वेळ मारुन नेतो. याचा अर्थ स्पष्ट आहे. श्रीधरपंत वैद्य गुरुजीला जातीसंस्था टिकवून ‘आदर्शवाद’ जोपासायचा आहे. ग्रामीण भागातील मराठ्यांसारख्या शेतकरी जातींना जातवर्चस्व टिकविण्यासाठी व स्वस्त शेतमजूर मिळण्यासाठी कालबाह्य “गावगाडा” टिकविणे आवश्यक असल्यामुळे गावचा पाटील श्रीधर गुरुजींच्या आदर्शवादाचा अंमलबजावणीदार झालेला आहे. पुढे नव्वदीत गाजावाजा झालेल्या अण्णा हजारे-पोपट पवार या आदर्श गाव निर्मात्यांचा श्रीधरपंत वैद्य हा पूर्वसुरी आहे. अण्णा हजारे-पोपटराव पवार यांच्या कर्मभूमीत, अहमदनगर जिल्ह्यात, सोनई येथे "ऑनर किलिंग'च्या घटनेत मेहेतर समाजाच्या तीन युवकांना कडबा कापण्याच्या यंत्रात घालून ठार मारण्यात आले, तर खर्ड्यात नितीन आगे या मातंग समाजाच्या शाळकरी मुलाला अमानुषरित्या ठार मारण्यात आले. या दोन्ही प्रसंगी अण्णा हजारे व पोपटराव पवार अवाक्षरही काढू शकले नाहीत. यावरुन त्यांची आदर्श गावाची संकल्पना कशी आहे, हे सिद्ध होते. ज्या गावात जातीसंस्था जिवंत आहे ते गाव “आदर्श” कसे होऊ शकते ?

पिंजरा चित्रपटात गावातील कोणतीही पूर्वास्पृश्य जात दिसत नाही. सत्तरीच्या अखेरीस ग्रामीण भागात अन्याय-अत्याचारांची मालिका सुरू झाल्यामुळे ऐंशीच्या ऐन प्रारंभी पॅन्थर्सचा उठाव झाला होता.त्याचा मागमूसदेखील चित्रपटात कुठे दिसून येत नाही. चंद्रकला ही नायिका पूर्वास्पृश्य आहे, हे स्पष्टच आहे. श्रीधर गुरुजीचा आदर्शवाद व चंद्रकलाचा पोटापाण्याचा व्यावहारिक प्रश्न यांत गुरुजी पराभूत होण्याचे मूळ कारण असे आहे की,गुरूजीच्या आदर्शवादात जातीसंस्थाधिष्ठीत समाजात निर्माण झालेल्या प्रश्नांची व्यावहारिक उत्तरे नाहीत. आदर्शवादाचे हे प्रमुख वैगुण्य आहे. या वैगुण्यावर कुठोराघात का होत नाही? व्यवहारात पराभूत झालेला श्रीधर गुरुजींचा आदर्शवाद मग तात्विक पातळीवर आध्यात्माचा आसरा घेतो. ही प्रस्थापित जातीसंस्थासमर्थकांची नेहमीचीच चाल आहे. विशेषतः कालिदासाचे ‘शाकुंतल’ चंद्रकलेला समजावून सांगताना हे आध्यात्म उफाळून येते. मात्र कालिदास हा शाहीरच आहे, असे बुद्धिमान चंद्रकलेला वाटते. ‘महाकवी’ कालिदासाचे हे अवमूल्यन (?) श्रीधरला अजिबात पटत नाही. बचावार्थ तो आध्यात्माचा आसरा घेतो. त्याच्या आध्यात्माला उत्तर देताना, श्रीकृष्णाने गोपिकांची वस्त्रे लपविण्याचा प्रसंग कलात्मकरित्या सांगून चंद्रकला तिथेही त्याचा पराभव करते. अशा त-हेने लौकिक व पारलौकिक अशा दोन्ही स्तरांवर पराभूत झालेला श्रीधरपंत वैद्य गुरुजी मग सौंदर्य व बुद्धीमत्तेचा मिलाफ असलेल्या चंद्रकलाला शरण जातो. ब्राह्मणी आदर्शवादाचा व्यवहारात पराभव करुन पूर्वास्पृश्य चंद्रकला पहिली फेरी जिंकते.

तथापि, व्यवहारात पराभूत झालेला हा आदर्शवाद चित्रपटाच्या शेवटी विजयात रुपांतरित होतो. तो कशामुळे? हे समजण्यासाठी कथाकाराच्या प्रतिभेची झेप समजावून घ्यायला हवी. गावाची सुधारणा करणाऱ्या श्रीधरपंत वैद्य गुरुजीचा शारीरिक खून जरी चंद्रकलाचा ‘दास’ झालेल्या मास्तरने केलेला नसला, तरी त्याचा तात्विक खून मात्र ब्रह्मचर्य स्खलित झालेल्या व आता तंबाखू-दारू घेवू लागलेल्या मास्तरनेच केलेला आहे, याची श्रीधर पंत गुरुजीला मनोमन जाणीव आहे. तथापि, गुरुजीच्या खऱ्या खुनाचे रहस्य जर उघडकीला आले, तर कदाचित मास्तर खुनाच्या आरोपातून मुक्तही होतील,पण मग गुरुजीने उभ्या केलेल्या आदर्शांचे काय? गावात गुरुजीचा पुतळा उभारला गेला आहे. अवघा गाव त्यांचे गुणगाण गात आहे. अशा अवस्थेत तंबाखू खाणारा, दारु पिणारा व ब्रह्मचर्य गमावलेला मास्तर हाच आपला ‘आदर्श’ गुरुजी आहे, हे जर जनतेला समजले तर या जनतेचा चांगल्यावरचा विश्वास उडून जाईल. म्हणून जनतेचा चांगुलपणावरचा विश्वास कायम राहावा, यांसाठी ‘आदर्शवादी’ श्रीधरपंत वैद्य हे चारित्र्यहिन मास्तराला फासावर जाण्याचा मार्ग सांगतात. आदर्शवादाचे खरे सामर्थ्य हे आहे. आदर्शवाद वास्तवात येवू शकत नाही, हे माहीत असूनही त्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे तो जिवंत राहिला आहे व भारतीय समाजाची फसवणूकही करीत आहे. आज सभोवताली चाललेला कल्लोळ गुरुजीसारख्या आदर्शवादाचा पोकळ डोलारा उभा केलेल्या स्खलनशील कार्यकर्त्यांमुळे निर्माण झाला आहे. जातीसंस्थानिर्मूलक भौतिक मुक्तीची कास धरुन आदर्शवादाच्या भोंगळ स्वरुपाला पद्धतशीरपणे उघडे पाडल्यास या परिस्थितीतून मार्ग काढता येईल. चंद्रकला व श्रीधर या दोघांचा सामाईक परिघ हा मार्ग चोखाळण्यात अपयशी ठरल्यामुळे ते पराभूत झाले.

श्रीधरपेक्षा चंद्रकलाची शोकांतिका जास्त दुःखद आहे. जातीसंस्थानिर्मूलनाचा खरा संघर्ष हा ब्राह्मण पुरुष व पूर्वास्पृश्य समाजाच्या महिला यांच्यातील आहे, ब्राह्मण पुरुष व पूर्वास्पृश्य पुरुष यांच्यातील नाही. त्यामुळे श्रीधर-चंद्रकला यांच्यातील संघर्ष व मिलाप नीट समजून घेणे आवश्यक आहे. श्रीधरला आपल्या चुकीच्या का होईना, परंतु आदर्शासाठी फाशी जायचे आहे. परंतु चंद्रकलाचे काय? अलौकिक लावण्य व बुद्धिमत्ता असूनही ती पराभूत का होते ? पोटापाण्याचा व्यवसाय असलेला तमाशा फड तिने बहिणीसह सोडून दिला आहे. नवा तमाशा फड उभा करण्याचे सामर्थ्य असले तरी, हा मार्ग मास्तराच्या सांस्कृतिक मूल्यांशी जुळणारा नाही. शिवाय ती मास्तराच्या आदर्शवादावर भाळलेली असल्याने सर्वसामान्य गृहिणीचे स्वप्नही तिला खुणावते आहे. परंतु, निर्मम नियतीला तेही मंजूर नव्हते. श्रीधर गुरुजीला मास्तराच्या स्वरुपात का होईना परंतु आपल्याकडे खेचण्यात तिचे सौंदर्य व बुद्धिमत्ता कामयाबी झाली खरी, परंतु मास्तराच्या ब्राह्मणी आदर्शवादाला तिचे श्रीकृष्ण प्रेमाचे ब्राह्मणी तत्वज्ञान उत्तर देऊ शकत नाही. तिथे जातीसंस्थानिर्मूलक अब्राह्मणी फुले-आंबेडकरवादी तत्वज्ञान असते, तर ती श्रीधर गुरुजीच्या आदर्शवादाला पर्याय उभा करु शकली असती. या पर्यायाचा अभाव असल्यामुळे ती प्रेमात विजयी होऊनही सामाजिक संघर्षात पराभूत झाली. एवढेच नव्हे तर तिची शोकांतिका श्रीधर गुरुजीच्या त्यागापुढे झाकोळली गेली. याउलट श्रीधर पंत गुरुजी प्रेमात हरला व सामाजिक संघर्षात विजयी झाला. सबब, श्रीधर गुरुजींसारख्या स्खलनशील मानवांनी उभ्या केलेल्या आदर्शवादाला सामाजिक संघर्षात पराभूत करायचे असल्यास चंद्रकला ज्यांचे प्रतिनिधित्त्व करीत आहे अशा शोषित जातीजमाती समूहांकडे जातीसंस्थानिर्मूलक फुले-आंबेडकरवादी तत्त्वज्ञानासारखा समर्थ पर्याय असणे ही पूर्वशर्त आहे. अशी तत्त्वज्ञानाधिष्ठीत जातीसंस्थानिर्मूलक आंदोलने छेडण्याबाबत आज गांभीर्याने हालचाल करण्याची निकड निर्माण झाली आहे. अन्यथा स्खलनशील आदर्शवादाची ध्येयधोरणे न समजलेल्या चंद्रकलाची मृतावस्था प्राप्त होण्यास भारतीय समाजाला वेळ लागणार नाही. ‘पिंजरा’ चित्रपटाचा अन्वयार्थ हा असा आहे. म्हणून तो तमाशापट न ठरता चिंतनगर्भ कलाकृतीस पात्र झाला आहे.

चित्रपटातील कथानायकाची भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी केली असून, त्यांनी गुरुजी व मास्तर यांतील द्वंद्व तसेच चंद्रकलासमोरील आपली परावशता फार ताकदीने सादर केली आहे. शांताराम बापूंची तत्कालिन अवस्था विचारात घेवून त्यांनी नगण्यवत मानधनावर काम केले व आपल्यातील माणूसपणाचे सिनेमाबाह्य दर्शनही घडविले. संध्या यांच्याकडे लावणीनृत्यासाठी आवश्यक असणारे पदलालित्य नाही. मात्र ती कसर त्यांनी मुद्राभिनयाने भरुन काढली आहे. ‘सैंय्या झुठो का बडा सरताज निकला...’ अथवा ‘ऐ मालिक तेरे बंदे हम...’ या सुप्रसिद्ध गाण्यांतील मुद्राभिनयाची आठवण करुन देताना त्यांनी चंद्रकलेचा संताप, डावपेच व प्रेम उत्कटतेने वठविले आहे. निळू फुले यांनी लाचार हसण्याबोलण्यातून तमाशा कलावंतीणींसाठी कुटुंब गमाविलेल्या सोंगाड्याची व्यथा-वेदना नेमकेपणाने मांडली आहे. डॉ. श्रीराम लागूंशी पुढे भविष्यात झालेला अभिनयाचा ‘सामना’ दोनचार प्रंसंगात इथेही दिसतो व तिथे निळू फुले भाव खावून जातात. इतर कलाकारांचीही कामे चोख आहेत. राम कदम यांनी अप्रतिम संगीत देवून चित्रपटास चार चांद लावले आहेत, असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. ‘ गं साजणे ...’ पासून पकडलेली लय ‘ काळजाची तार...’ तुटेपर्यंत समेवर जाते व काळजाचा ठाव घेते. तांत्रिक व छायाचित्रण या आणखी जमेच्या बाजू आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या बेचैनीच्या काळाची पूर्वपिठिका विचारात घेवून आणि त्याची जातविरहित भविष्यकाळाशी सांगड घालण्यास्तव सत्तरीतील ग्रामीण जातीसंबंध समजण्यासाठी ‘पिंजरा’ पुन्हा नव्या चष्म्यातून बघणे आवश्यक आहे.

शुद्धोधन अहेर
ahersd26@gmail.com

बातम्या आणखी आहेत...