आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:पवारांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा आघाडीचा यशस्वी प्रयोग; भिन्न विचारसरणीचे पक्ष प्रसंगानुरूप एकत्र येण्याची प्रक्रिया गतिमान होण्याची चिन्हे

कृष्णराव भेगडे (माजी आमदार, मावळ)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालास शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपला सत्तेबाहेर ठेवत महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले हे या निकालाचे वैशिष्ट्य. १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालाचेही असेच होते. त्या वेळी सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या जनता पार्टीऐवजी दोन्ही काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. या सगळ्या घडामोडींचे साक्षीदार असलेले माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्याकडून त्या आठवणींना उजाळा...

विधानसभेची गेल्यावेळची निवडणूक एकतर्फी होऊन भाजप सहज बाजी मारेल असे वातावण होते. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर नाट्यमय घडामाेडी घडल्या आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात १९७८ नंतर दुसऱ्यांदा राज्यात आघाडीचा प्रयाेग यशस्वी झाला. अशाच पद्धतीने १९७८ च्या निवडणुकीपूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली माेठे जनआंदाेलन उभे राहिले हाेते. देशातील ढासळती आर्थिक स्थिती, बेराेजगारी, शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार, प्राथमिक गरजा भागविण्यात लाेकांना येत असलेल्या अडचणी यामुळे तरुणवर्गात माेठा असंताेष हाेता. वेगवेगळया राज्यात काँग्रेसविराेधी राजकारण जाेर धरत हाेते आणि आणीबाणीच्या विराेधात देशभरातील विराेधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी ‘जनता पक्षा’ची स्थापना केली. देशपातळीवर असे राजकारण सुरू असताना महाराष्ट्रात इंदिरा गांधी काँग्रेस व त्यांना प्रखर विराेध करणारी चव्हाण-रेड्डी यांची काँग्रेस व जनता पक्ष अशी त्रिशंकू लढत सुरू हाेती. समाजवादी काँग्रेसकडून मी त्यावेळी मावळात जनसंघाचे नेते नथूभाऊ भेगडे पाटील यांच्याविराेधात निवडणूक लढत हाेताे. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि ९९ जागा मिळवत जनता पक्ष सर्वात माेठा पक्ष ठरला. मात्र, मित्रपक्षांसह त्यांना बहुमताची १४५ ही ‘मॅजिक फिगर’ गाठता येत नव्हती. अखेर वसंतदादा व यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दाेन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि सरकार स्थापन झाले. सध्याची व ७८ ची स्थिती विचारात घेता सत्तेच्या गणिताची आकडेवारी जुळवण्यासाठी पक्षाच्या वाटचालीस, तत्वाला ब्रेक लावून लाेकशाहीतून कारभार करण्यासाठी ‘किमान समान कार्यक्रम’ आधारावर तडजाेडीची भूमिका स्वीकारून एकत्र यावे लागते हेच पाहवयास मिळते. त्यावेळी मात्र सत्ता स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे हे मुख्यमंत्री वसंतदादा यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत अपमानाचे राजकारण करत हाेते. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली ४१ आमदारांनी वसंतदादा सरकारचा पाठिंबा काढला आणि जनता आमदारांना साेबत घेऊन पुलाेदचे सरकार स्थापन झाले. हे सरकार १९८० पर्यंत कार्यरत राहिले आणि केंद्रात इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर राज्यात फेरनिवडणुक हाेऊन पुन्हा काँग्रेस सत्तेत आली.

गेल्या वर्षीच्या निकालानंतर पवारांनी आपला अनुभव पणास लावून फासे टाकले. सत्ता स्थापनेत दाखवलेले चातुर्य, सेना नेत्यांना दिलेला दिलासा, शिवसेनेने समान कार्यक्रमाच्या आधारावर एकत्र येण्याची घेतलेली भूमिका यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार राज्यात अस्तित्वात आले. यापासून धडा घेत भाजपने सध्या बिहार निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीयूच्या नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार घाेषित केले आहे. सध्याच्या वातावरणाचा एकंदर नूर पाहता येत्या काळात भिन्न विचारसरणीचे पक्ष प्रसंगी एकत्र येण्याची प्रक्रिया गतिमान होण्याची चिन्हे आहेत. (शब्दांकन - मंगेश फल्ले)