आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:रद्दीचा व्यवसाय ठप्प, कचऱ्यातून भाजी वेचून जगण्याची धडपड

पुणे, मार्केट यार्डातून रमेश पवार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाने केले कष्टाला ‘लॉक', पण जगण्याच्या स्पर्धेत मार्केट यार्ड बनले अनेकांचा आधार

बांधावरचा भाजीपाला ग्राहकाच्या दारात पोहोचला, पण मार्केट यार्डांना आणि शेवटच्या घटकालाही त्याचा मोठा फटका बसला. अशापैकीच एक अजय ठक्कर. एरवी रद्दी विकून गुजराण करायचे, पण त्यांची कोंडी झाली. अशा वेळी टाकून दिलेली भाजी हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार ठरला.

एरवीही मार्केट यार्डात पडलेली भाजी गोळा करणारे अनेक जण दिसतात. पण पेहरावावरून अजय ठक्करविषयी कुतूहल वाटलं आणि त्याची धक्कादायक कहाणी पुढे आली. रद्दीचं दुकान चालवणाऱ्या ठक्कर यांना यार्डात टाकून दिलेली भाजी हाच या काळातील आधार ठरला. ते रोज सकाळी यार्डात पोहोचतात, फेकून दिलेल्या भाजीतून चांगली भाजी गोळा करतात. थोडी बरी आणि जास्त मिळाली तर ती विकून पैसा करतात. शिल्लक राहिल्यास घरी खाण्यासाठी नेतात. हाताला काम नाही तेव्हा चोरी करून पोट भरण्यापेक्षा कचऱ्यातील भाजी विकून पोट भरण्याचा सनदशीर पर्याय त्यांनी निवडला. मूळ गुजरातचे ठक्कर ८३ मध्ये मुंबईत आले. दहा वर्षांनंतर मेहुण्यांसोबत त्यांना कच्ची दाबेलीचा गाडा टाकला. पण पालिका प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून तोही बंद केला आणि रद्दीचा व्यवसाय सुरू केला.

सोहम्माला बाहेर पडण्यावाचून पर्याय नाही

पन्नास-साठ वयोगटातील मंडळींनी कोरोना काळात घराबाहेर पडू नये हे स्पष्ट संकेत. पण ६५ वर्षांच्या सोहम्माला ते परवडतच नाही. मार्केट यार्डातील पुठ्ठे गोळा करून त्यावर गुजराण करणारी सोहम्मा. शेजारच्या कच्च्या वस्तीत राहते आणि हे पुठ्ठे विकून पोट भरते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या गेल्या चार महिन्यामत अधिकच दाट झाल्यात. दृष्टीही अधू झाली. मुलं सांभाळत नाहीत म्हणून एकटीच जगते. कोरोनाच्या काळातही जगण्यासाठी मार्केट यार्डातच येते. सध्या तिलाही पुठ्ठे नाहीच मिळत. तिचाही आधार टाकून दिलेला भाजीपाला हाच झालाय.