आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Uninterrupted Medical Care Of Tribal Tadavi Bhil Community; An Ambulance Worth Rs 14 Lakh Purchased With A Donation Of Rs 10; 170 Lives Saved

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:आदिवासी तडवी भिल्ल समाजाची अखंड रुग्णसेवा; 10 रुपयांपासूनच्या देणगीतून खरेदी केली 14 लाखांची रुग्णवाहिका; 170 जणांना जीवदान

शेखर पटेल | यावल, जि.जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सातपुड्यातील आदिवासी तडवी भिल्ल एकवटले, लवकरच दुसरी रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार

आदिवासी तडवी भिल्ल समाजातील युवकांची सातपुड्यातील आराेग्यसेवेच्या दयनीय परिस्थितीत नव्याने बदल घडवून आणण्यासाठी अखंड साधना फळास आली. गरीब व गरजूंना वेळेवर उपचार मिळावेत याच उद्देशातून युवकांनी समाजसेवक नोकरदार ग्रुपच्या माध्यमातून रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली आहे. यासाठी केळी मजुराच्या १० रुपयांपासून ते माेठ्या स्वरूपातील देणगीतून १४ लाखांची अत्याधुनिक रुग्णवाहिका विकत घेतली. या ‘तडवी भिल्ल समाज लाइफलाइन अॅम्ब्युलन्स सेवे’तून १३ महिन्यांत आतापर्यंत १७० जणांना जीवनदान मिळाले. यासाठी रुग्णवाहिकेवरील मालोद (ता. यावल) येथील राजू तडवी व नसरुद्दीन तडवी हे माेफत वाहकाची सेवा पुरवत आहेत. या रुग्णवाहिकेची सेवा आदिवासी अतिदुर्गम भागातील चोपडा, रावेर व यावल तालुक्यात सर्वाधिक प्रमाणावर मिळत आहे. ४९ मृतदेह त्यांच्या आप्तस्वकीयांपर्यंत पोहोचवून सामाजिक भान जपले आहे. ऑक्सिजन सिलिंडर व आवश्यक साहित्य या रुग्णवाहिकेत उपलब्ध आहे.

दरमहा देणगी जमा; देखभालीवर खर्च :

समाजबांधव आणि शासकीय सेवेत असलेले समाजातील युवकही या कार्यात याेगदान देतात. यासाठी हे सर्व जण दरमहा खात्यावर देणगीच्या स्वरूपात पैसे जमा करतात. यातून १३ महिन्यांत १२ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली. यातून काही रक्कम ही गाडीच्या देखभालीसाठी खर्च केली जाते. समाजबांधवांनी रुग्णवाहिकेच्या देखभाल दुरुस्तीसाठी रुग्णवाहिका प्रतिनिधी व संचालक मंडळ समिती स्थापन केली आहे. ही समिती रुग्णवाहिकेची काळजी घेते.

हरियाणात पोहोचवला मृतदेह

सहा महिन्यांपूर्वी एका ट्रक अपघातात अंबाला (हरियाणा) येथील चालकाचा यावलला मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह अंबाला येथे नेेण्यासाठी इतर शववाहिकांनी ७० हजार रुपयेे भाडे सांगितले होते. मात्र, तडवी समाजबांधवांच्या या शववाहिकेने केवळ डिझेलचा खर्च घेऊन ट्रकचालकाचा मृतदेह यावलहून अंबाला येथे पोहोचवून सेवाभाव जोपासला होता.

अगदी १० रुपयांपासून देणगी

आदिवासी तडवी भिल्ल समाजसेवक नोकरदार ग्रुपमध्ये केळी वाहणाऱ्या कामगारांपासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केळी कामगार बांधवांनी रुग्णवाहिकेसाठी अगदी १० रुपयांपासून देणगी दिली आहे, तर सर्वाधिक देणगी ७७ हजार ७८६ रुपये प्राप्त झाली आहे. समाजातील सर्व समाजबांधवांचे या उपक्रमात सहकार्य मिळाले आहे हे विशेष.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser