आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबातमी वाचण्यापूर्वी, हा फोटो बारकाईने पाहा…
अमेरिकन तपास संस्था, युरोपियन देश आणि UN च्या मते, तुरुंगातील कोठडीत बसलेला अतिशय साधा दिसणारा हा व्हिक्टर बाऊट तो घातक शस्त्र व्यापारी आहे, ज्याने शेकडो वेळा संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांचे उल्लंघन करून आफ्रिकन देशांमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण केली.
तालिबान, अल-कायदासह अनेक दहशतवादी संघटनांना शस्त्रे विकली. याच आरोपांत अटक झाली, अमेरिकन न्यायाधीशांनी त्याला आयुष्यभर तुरुंगात सडण्याची शिक्षा दिली. अमेरिकन तुरुंगात व्हिक्टर हा सर्वात हाय प्रोफाईल रशियन कैदी होता. परंतु 10 वर्षांनंतर, अमेरिकेने अखेरीस अमेरिकन महिला बास्केटबॉल खेळाडू ब्रिटनी ग्रिनरच्या बदल्यात त्याला सोडले.
अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली ब्रिटनीला रशियाच्या तुरुंगात कैद होती. गेल्या आठवड्यातच रशिया आणि अमेरिकेने अबुधाबी विमानतळावर कैद्यांची देवाणघेवाण केली.
2008 मध्ये व्हिक्टरला अटक झाल्यापासून पुतिन त्याची सुटका करण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. व्हिक्टरने पुतिन यांचे छायाचित्र अमेरिकेतील त्याच्या तुरुंगाच्या कोठडीतही लावले होते. आणि आता रशियाला परतल्यावर व्हिक्टरने पुतिन यांचा सहयोगी मानल्या जाणाऱ्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ रशियाचे सदस्यत्वही घेतले आहे. व्हिक्टरला संसदेतही जागा मिळू शकते, असे मानले जात आहे.
कोण आहे हा व्हिक्टर बाऊट....ज्या व्यक्तीला त्याच्या कृष्णकृत्यांमुळे 'मर्चंट ऑफ डेथ' असे नाव देण्यात आले होते...ज्याच्या विरोधात एकदा मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये आणि एकदा बेल्जियममध्ये वॉरंट जारी करण्यात आले होते...आणि प्रत्येक वेळी तपास यंत्रणांना तो चकवत राहिला.
जाणून घ्या, कोण आहे हा रशियन डेथ डीलर… आणि त्याची सुटका पुतिनसाठी का महत्त्वाची होती.
व्हिक्टरने रशियाच्या मिलिटरी इन्स्टिट्यूट फॉर फॉरेन लँग्वेजेसमध्ये शिक्षण घेतले होते... रशियन गुप्तचर संस्थेत प्रवेश करण्याचा हा मार्ग आहे.
व्हिक्टर बाऊटचा जन्म 1967 मध्ये तझाकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे झाला. तेव्हा तो पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचा एक भाग होता. त्यावेळच्या नियमांनुसार वयाच्या 18 व्या वर्षी 1985 मध्ये तो रशियन सैन्यात दाखल झाला. काही वर्षांच्या लष्करी सेवेनंतर, त्याला मॉस्कोमधील परदेशी भाषांसाठीच्या लष्करी संस्थेत दाखल करण्यात आले.
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील रशिया अँड ट्रान्सनॅशनल क्राइम विषयाचे व्याख्याते आणि रशियन गुप्तचर संस्थांचे तज्ञ मार्क गेलिओटींनुसार, ही संस्था रशियन लष्करी गुप्तचर संस्था GRU मध्ये प्रवेश करण्याचा सर्वात सामान्य मार्ग होता.
या संस्थेत 2 वर्षे घालवल्यानंतर व्हिक्टरला जलद पदोन्नती मिळाली. लवकरच तो हवाई दलात अधिकारी झाला. 1988 मध्ये तो आफ्रिकेतील मोझांबिकमध्ये रशियन लष्करी अधिकारी म्हणूनही राहिला होता.
जेव्हा सोव्हिएत युनियन तुटले तेव्हा व्हिक्टरने मालवाहू व्यवसाय सुरू केला… त्याच्याकडे UAE मध्ये 60 विमाने होती.
1991 मध्ये, व्हिक्टरने लग्न केले. सोव्हिएत युनियन तुटण्याचा हा काळ होता. 1993 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनाच्या वेळी, व्हिक्टरने सैन्य सोडले आणि आपला व्यवसाय सुरू केला.
प्रथम त्याने अन्न आयातीचा व्यवसाय सुरू केला, परंतु भागीदारांशी मतभेद झाल्यानंतर ही कंपनी 8 महिन्यांत बंद झाली. यानंतर त्याने एअर कार्गोचा नवा व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला, त्याने रशियन सरकारकडून जुनी मालवाहू विमाने भाड्याने घेतली आणि नंतर ती इतर कंपन्यांना 3 पट अधिक भाड्याने दिली. जेव्हा या व्यवसायात प्रगती झाली तेव्हा व्हिक्टर 1994 मध्ये यूएईला गेला.
व्हिक्टरने UAE मध्ये 'Air Sayse' नावाने एअर कार्गो कंपनी सुरू केली. एकेकाळी त्याच्याकडे यूएईमध्ये 60 विमानांचा ताफा होता. शारजाह विमानतळावरून तो आपली कंपनी चालवत असे. व्हिक्टरचा दावा आहे की, त्यावेळी तो टीव्ही, टेलिफोन आणि फ्रीजसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंचा पुरवठा करत असे.
अफगाणिस्तानातून सुरू झाला शस्त्रास्त्रांचा प्रवास...त्यावेळी तालिबानच्या विरोधात अहमद शाह मसूदला शस्त्रे पोहोचवत असे.
व्हिक्टरच्या म्हणण्यानुसार तो अफगाणिस्तानातही ग्राहकोपयोगी वस्तूंचा पुरवठा करत असे. त्यावेळी त्याने अफगाणिस्तानचे तत्कालीन संरक्षण मंत्री अहमद शाह मसूद यांच्याशी मैत्री केली होती.
तालिबान सत्तेवर आल्यानंतर अहमद शाह मसूद विरोधी पक्षाचे प्रमुख नेते होते. व्हिक्टरच्या म्हणण्यानुसार, मसूदनेच त्याला प्रथम विचारले की तो त्याच्या मालवाहू विमानांतून शस्त्रे आणू शकतो का?
व्हिक्टर तुटलेल्या सोव्हिएत युनियनची शस्त्रे विकायचा... नेहमी कोणत्या ना कोणत्या मध्यस्थामार्फत काम केले
सोव्हिएत युनियन तुटले तेव्हा रशियन सैन्याची बरीचशी शस्त्रे काळ्या बाजारात पोहोचली होती. या शस्त्रांचा मोठा साठाही रशियन गुप्तचर संस्थांच्या हाती होता. अमेरिकन अहवालानुसार, शीतयुद्धाच्या या काळात रशियाने आफ्रिका आणि मध्य पूर्वेसह अनेक ठिकाणी अशांतता पसरवण्यासाठी या शस्त्रांचा वापर केला.
व्हिक्टरही या शस्त्रांची तस्करी करत असे, असे मानले जाते. मात्र, तो नेहमी कोणत्या ना कोणत्या मध्यस्थाच्या माध्यमातून काम करत असे.
अफगाणिस्तानातही मिर्चेव नावाच्या व्यक्तीचा वापर शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी केला जात होता. मिर्चेव्ह हा शस्त्रास्त्रांचा व्यापारीही होता.
व्हिक्टरने आपल्या पायलटला तालिबानच्या ताब्यातून सोडवले होते…अमेरिकेचा आरोप शस्त्रे विकल्याची डील होती
अफगाणिस्तानात शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू असताना व्हिक्टरचे एक विमान तालिबानने ताब्यात घेतले होते. त्यातीचा माल आणि क्रू तालिबानने ताब्यात घेतले होते.
व्हिक्टरने नंतर तपास यंत्रणांना सांगितले की त्याने त्याच्या क्रूची सुटका करण्यासाठी बचाव मोहीम आखली होती. तथापि, त्याने नंतर जबाब बदलला आणि सांगितले की क्रू आणि विमान तालिबाननेच सोडून दिले होते.
अमेरिकन तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की व्हिक्टरने आपले विमान आणि कर्मचारी यांच्यापासून सुटका करण्यासाठी तालिबानला शस्त्रे देण्याचे आश्वासन दिले होते.
आफ्रिकेत जिथे जिथे गृहयुद्ध झाले, तिथे व्हिक्टर बाऊट दिसला
व्हिक्टर बाऊट, कोणत्याही शस्त्रास्त्र विक्रेत्याप्रमाणे, नेहमीच रहस्यांनी वेढलेला असायचा. रिपोर्ट्सनुसार, आफ्रिकेतील त्याचा शस्त्रास्त्रांचा व्यवसाय अंगोलापासून सुरू झाला.
अमेरिकेच्या प्रयत्नांमुळे येथे गृहयुद्ध संपुष्टात आले. बंडखोर आणि सरकार यांच्यातील शांतता करारानंतर, संयुक्त राष्ट्रांनी अंगोलामध्ये शस्त्रास्त्रे खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली.
1998 च्या सुमारास बंडखोरांचा गट UNITA पुन्हा सक्रिय होऊ लागला. त्याचा नेता जोनास साविम्बीने व्हिक्टरशी संपर्क साधला आणि शस्त्रे मागितली. व्हिक्टरने संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांचे उल्लंघन करून साविम्बीला शस्त्रे विकली.
विशेष म्हणजे काही दिवसांनी त्याने अंगोला सरकारशी शस्त्रे विकण्याचा करार केला. यूएस तपास यंत्रणांच्या मते, अंगोला हे फक्त एक उदाहरण आहे. आफ्रिकेत जिथे जिथे गृहयुद्धाची परिस्थिती होती तिथे व्हिक्टर बाऊटला पाहण्यात आले.
व्हिक्टरने बंडखोर आणि सरकार या दोघांनाही शस्त्रे विकायचा.
UN अहवाल...व्हिक्टरने लायबेरिया, काँगोसह अनेक देशांमध्ये शस्त्र विक्री निर्बंधांचे उल्लंघन केले
ऑक्टोबर 2002 मध्ये, यूएनने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, व्हिक्टर बाऊटने अनेक आफ्रिकन देशांमध्ये शस्त्र विक्री निर्बंधांचे उल्लंन केले.
त्याचवेळी अंगोलामध्ये शस्त्रास्त्रांच्या विक्रीत व्हिक्टरचा हात असल्याचेही ब्रिटिश तपासात उघड झाले आहे. ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाल सार्वजनिक केला आणि व्हिक्टरला 'मर्चंट ऑफ डेथ' असे नाव दिले.
ज्या देशांमध्ये व्हिक्टर थेट शस्त्रास्त्रे विकू शकत नव्हता, तेथे तो शेजारील देशांच्या सरकारांमार्फत शस्त्रे पोहोचवत असे. त्याच्या कनेक्शनमध्ये अटक करण्यात आलेल्या केनियातील व्यावसायिक संजीवन रुप्रा यांच्या म्हणण्यानुसार, अनेक कंपन्यांनी व्हिक्टरची विमाने वापरली होती. यूएनच्या मते, त्यांचा वापर बंडखोर सैन्यानेही केला होता.
2002 मध्ये इंटरपोलने वॉरंट जारी केले... व्हिक्टर रशियाला पळून गेला
व्हिक्टरची कृत्ये कायद्याच्या नजरेत येत नव्हती असे नाही. जून 2000 मध्ये, आफ्रिकन देश सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकने व्हिक्टरवर खोटी कागदपत्रे बनवल्याचा आरोप केला आणि त्याला अनुपस्थितीतच तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
या आरोपांनुसार, व्हिक्टरने अनेक बनावट कागदपत्रे तयार केली, ज्यात शस्त्रास्त्रांच्या विक्रीसाठी आवश्यक अंतिम वापरकर्ता प्रमाणपत्राचा समावेश आहे.
फेब्रुवारी 2002 मध्ये, बेल्जियम सरकारने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली व्हिक्टरविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. 2002 मध्येच व्हिक्टरचे नाव संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात आल्यानंतर इंटरपोलने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.
व्हिक्टर रशियाला गेला. रशियाने इंटरपोलचे वॉरंट नाकारले आणि आपल्या नागरिकाला अटक करण्यास नकार दिला.
जेव्हा अमेरिकेने निर्बंध लादले तेव्हा व्हिक्टरने स्वतःला तंबू पुरवणारा व्यापारी म्हणून दाखवले
2005 मध्ये अमेरिकेने व्हिक्टरवर कठोर निर्बंध लादले. त्याची अमेरिकेतील मालमत्ता आणि बँक खाती जप्त करण्यात आली. त्याच्या 30 कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली. कोणत्याही अमेरिकन व्यक्तीने त्याच्यासोबत व्यवसाय करण्यावर बंदी घालण्यात आली.
दरम्यान, व्हिक्टरने सार्वजनिकरित्या दाखविले की तो इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात फळे, भाज्या आणि तंबू इत्यादींचा पुरवठा करत आहे. त्याने रशियात काळ्या समुद्राजवळ जमीनही विकत घेत सेंद्रिय बिया आणि चीज बनवायला सुरुवात केली.
अमेरिकन अंडरकव्हर एजंटने कोलंबियन बंडखोर बनत शस्त्र मागितले... व्हिक्टर लगेच तयार झाला
व्हिक्टरच्या आफ्रिकेतील व्यवसायावर अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने बारकाईने लक्ष ठेवले होते. पण आजवर अमेरिकेला उघडपणे काहीच करता आले नव्हते.
2007 मध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या प्रशासनात हुआन जराते उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले. त्यांनी अमेरिकन ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीसोबत व्हिक्टरला पकडण्याची योजना आखली.
DEA एजंटसनी व्हिक्टरशी संपर्क साधला. या अंडरकव्हर एजंटसनी व्हिक्टरसमोर स्वतःला FARC या कोलंबियन बंडखोर संघटनेचे सदस्य म्हणून दाखवले. त्यावेळी कोलंबियामध्ये गृहयुद्ध सुरू होते.
या एजंटांनी व्हिक्टरला सांगितले की त्यांना शस्त्रे हवी आहेत. त्यात विमानविरोधी क्षेपणास्त्रेही होती. त्यांचा वापर ते अमेरिकन पायलट आणि सैनिकांना मारण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. व्हिक्टरने ताबडतोब शस्त्रे विकण्याची तयारी दाखवली.
एजंटनी व्हिक्टरला भेटण्यासाठी रशियाबाहेर बोलावले. 2008 मध्ये त्याने थायलंडमधील बँकॉक येथे येण्याचे मान्य केले. येथे झालेल्या बैठकीदरम्यान अमेरिकन एजन्सीच्या सांगण्यावरून थायलंडच्या पोलिसांनी त्याला अटक केली.
2011 मध्ये व्हिक्टरला अमेरिकेच्या हवाली केले… साथीदाराच्या साक्षीमुळे 25 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
2008 मध्ये अटक झाल्यानंतर व्हिक्टरने थायलंडमध्ये दोन वर्षे तुरुंगात घालवली. 2011 मध्ये त्याला अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आले होते. अमेरिकेने त्याच्यावर या आरोपांखाली खटला चालवला-
व्हिक्टरला अटक करण्याच्या योजनेत, अमेरिकन एजन्सींनी त्याचा एक ब्रिटिश साथीदार अँड्र्यू स्म्युलियनचा वापर केला होता. त्याला अमेरिकेतही आणण्यात आले. व्हिक्टरविरुद्धच्या खटल्यातील तपास यंत्रणांचा तो सर्वात महत्त्वाचा साक्षीदार होता.
स्म्युल्यानच्या साक्षीमुळे व्हिक्टरला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवणार असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. या साक्षीच्या बदल्यात स्म्युल्यानची शिक्षा केवळ 5 वर्षांपर्यंत कमी करण्यात आली. तो 2008 पासून तुरुंगात होता, त्यामुळे शिक्षा भोगल्यानंतर केवळ एक वर्षानंतर त्याची सुटका झाली.
व्हिक्टर रशियाच्या माजी उपपंतप्रधानाचा निकटवर्तीय आहे… 10 वर्षे शांत राहण्याचे बक्षीस आहे सुटका
व्हिक्टरच्या अटकेनंतर रशियाने लगेचच यावर टीका करत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते.
काही अहवालांनुसार, व्हिक्टर आणि रशियाचे माजी उपपंतप्रधान इगोर सेचिन खूप निकटवर्तीय आहेत. 1980 च्या दशकात दोघेही रशियन सैन्यात आफ्रिकेत एकत्र तैनात होते. इगोर सेचिन हा पुतिन यांचा उजवा हात मानला जातो. तथापि व्हिक्टरने नेहमीच हे संबंध नाकारले आहेत.
अमेरिकन तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की व्हिक्टरने रशियन गुप्तचर संस्था जीआरयूच्या सांगण्यावरून काम केले. जीआरयू स्वतः व्हिक्टरच्या माध्यमातून शस्त्रे विकत असे. जेव्हा व्हिक्टर पकडला गेला तेव्हा तो GRU ची रहस्ये उघड करेल अशी शक्यता होती. मात्र 10 वर्षे तुरुंगात राहूनही तो अमेरिकेसमोर तुटला नाही.
या कारणास्तव, रशियन एजन्सी त्याच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न करत होत्या.
कैद्यांची देवाणघेवाण अमेरिकेसाठी नवीन नाही
इतर देशांमध्ये तुरुंगात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी कैद्यांची देवाणघेवाण अमेरिकेसाठी नवीन नाही.
रिसर्च : हिना ओझा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.