आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनबायकांचं जग:25 वर्षांत एकही महिला आली नाही...

उषा बोर्डेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काळ-वेळ कुठलीही असो, पुरुषांनी सदा गजबजलेलं ठिकाण म्हणजे पानटपऱ्या. मात्र एखाद्या वेळी बडीशेप, सुटे पैसे किंवा एखाद्या कठीण परिस्थितीत मदतीसाठीसुद्धा महिला पानटपरीवर जाऊ शकते हे आपण का विसरतो...? पानटपरीवर काही वेळ व्यतीत केल्यानंतरचा आमच्या प्रतिनिधीचा हा अनुभव...

स्थळ - मांगीरबाबा कमान (औरंगाबाद) वेळ - संध्याकाळी ६ वाजता कमानीजवळच्या पानटपरीमध्ये गुटख्याच्या पुड्या लटकलेल्या होत्या. पान-सुपारी, सिगारेट, बिडी बंडल, माचिस असं सर्वकाही ‘सजवून’ ठेवलेलं. संध्याकाळ व्हायला लागली तशी लोकांंची ये-जा वाढली. तिथे मी काही वेळापासून उभी असल्याने येणारे-जाणारे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. वाटसरू, फेरीवाले माझ्याकडे मान तिरकी करून, डोळ्यात आश्चर्याचे भाव आणून बघत होते. एखाद्या टपरीशेजारी महिला उभी असलेली पाहण्याची त्यांची बहुधा ही पहिलीच वेळ होती.

काही वेळाने तिथे चार-पाच मुले आली. त्यांनी सिगारेट मागितली. ते सर्वजण मिळून सिगारेट ओढत गप्पा मारू लागले. दरम्यान, रस्त्यावरून येणाऱ्या -जाणाऱ्या मुली-महिलांकडेही ते पाहत होते. माझ्याकडे सारखी त्यांची नजर वळत होती. हा प्रकार मला गोंधळात टाकणारा होता. आपण फक्त पंधराच मिनिटे येथे उभे राहिलो आहोत आणि हे लोक एखाद्या वस्तूसारखं महिलांकडे बघत आहेत ही गोष्ट खूप खटकत होती. मग मी टपरीवाल्याकडे गेले. त्याला विचारलं, ‘भय्या सिटी बस आली नाही अजून, किती वाजता येते? वेळ फिक्स नाही का?’ तो म्हणाला, ‘नाही मॅडम, आताच एक बस येऊन गेली. तुम्हाला कोणत्या नंबरची सिटी बस हवी आहे?’ मी त्याला सिटी बसचा नंबर सांगितला. नंतर त्याला विचारले, ‘भय्या, तुमच्या टपरीवर कधी महिला-मुली काही घ्यायला येतात का?’ तेव्हा तो आश्चर्याने माझ्याकडे बघू लागला. जणू काही मी त्याला काहीतरी जगावेगळा प्रश्न विचारलाय असे भाव त्याच्या डोळ्यात होते. ‘कधी पानसुपारी घेण्यासाठी, कधी सुटे पैसे मागण्यासाठी महिला कधी आल्यात का?’ - मी

त्यावर तो म्हणाला, ‘नाही मॅडम, आज २५ वर्षे झाली, पण आजपर्यंत कुठलीच महिला माझ्या पानटपरीवर आली नाही.’ मग मी विचारलं, ‘तुमची टपरी तर बसस्टॉपजवळ आहे, कुणी एखादी महिला सुटे पैसे घेण्यासाठी तर आली असेल ना...’ त्यावर तो नाहीच म्हणाला. मी त्याच्याशी बोलत असताना तेथे बरेच लोक जमा झाले होते. त्यानंतर मी तिथून निघाले. त्यावर टपरीवाला म्हणाला, ‘मॅडम, तुम्ही कोण आहात सांगा.. कारण, इतके प्रश्न कोणी विचारत नाही. कोणी महिला आजपर्यंत आली नाही.’ तेव्हा मी त्याला पत्रकार असल्याचे सांगितले. माझ्या येण्याचे कारणही सांगितले. पानटपरीवर महिला-मुली जात नाहीत. कारण, तिथे स्त्रियांनी जाणे योग्य समजले जात नाही. मात्र, जवळपास प्रत्येक पानटपरीवर घोळक्याने गर्दी करणारे पुरुष गाणे म्हणत-सिगारेट ओढत आणि गुटखा खात येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची छेड काढतात त्यावर समाज शांत बसतो. आपल्याला काय करायचे आहे? या विचाराने छेड काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो. आपल्या घरातल्या आई-बहीण, मुलगी यांनाही आयुष्यात कधी ना कधीतरी एखाद्या टपरीसमोरच्या वाटेवरून जावेच लागलेले आहे एवढे जरी सर्वांनी लक्षात ठेवले तर छेडछाडीच्या घटनांना आळा बसू शकतो...

टपरीवाल्याच्या नजरेत आश्चर्याचे भाव
‘भय्या, तुमच्या टपरीवर कधी महिला-मुली काही घ्यायला येतात का?’ तेव्हा तो आश्चर्याने माझ्याकडे बघू लागला. जणू काही मी त्याला काहीतरी जगावेगळा प्रश्न विचारलाय असे भाव त्याच्या डोळ्यात होते. तो म्हणाला, ‘नाही मॅडम, आज २५ वर्षे झाली, पण आजपर्यंत कुठलीच महिला माझ्या पानटपरीवर कधी आली नाही.’

उषा बोर्डे
संपर्क : ९३४००६१६४६

बातम्या आणखी आहेत...