आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकबोर्डबाहुलीला पीठ लावले, लाल रंग टाकला आणि ओरडले:18 वर्षापासून मूल झाले नाही, बाहुली तर बाहुली; त्यानंतर कोणी वांझ तर म्हणणार नाही

दीप्ती मिश्रा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तू वांझ आहेस. भल्या पहाटे 'मनहूस' चेहरा दिसला. आज खायलाही मिळेल की नाही, माहीत नाही.’ 18 वर्षानंतर जेव्हा मी गरोदर राहिले तेव्हा मला वाटले की, हे दुर्दैवी दिवस आता संपतील. आता असे टोमणे ऐकावे लागणार नाहीत, पण 2 महिन्यांनी गर्भ खराब झाला. आता लोकांना काय सांगणार… मी कोणालाच काही सांगितले नाही. मी आई होणार आहे, असे 6 महिन्यांपर्यंत सर्वांना वाटत होते.

एक दिवस पोटात दुखू लागले. डॉक्टरांकडे गेले, घरी आल्यावर बेडवर विचार करत पडले होते. तेवढ्यात एक जुनी बाहुली दिसली. रात्री बाहुलीला पिठाने माखले, लहान मुलासारखी बनवली. खोलीत आणि बेडवर रक्ताचा लाल रंग पसरवला. मग जोरजोरात ओरडू लागले. त्यानंतर काय झाले, हे सर्व जगाला माहिती आहे. टीव्ही, वर्तमानपत्रात सगळीकडे माझी बदनामी झाली.'

एवढं बोलून निशाला रडू कोसळले. ती तिचा चेहरा लपवू लागली.

गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील इटावामध्ये एका महिलेने प्लास्टिकच्या बाहुलीला जन्म दिल्याची बातमी आली होती. लोकांनीही उत्सुकतेने बातम्या वाचल्या. गावकऱ्यांनी तिला वेडे ठरवले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याला फसवणुकीची युक्ती म्हटले, मात्र महिलेची बाजू कोणीही ऐकून घेतली नाही. ती स्त्री म्हणजे निशा.

निशा म्हणते की, खूप बदनामी झाली आहे. मला तोंड दाखवायला कुठेच जागा उरली नाही.
निशा म्हणते की, खूप बदनामी झाली आहे. मला तोंड दाखवायला कुठेच जागा उरली नाही.

निशाशी बोलण्यासाठी मी दिल्लीपासून 335 किमी अंतरावर असलेल्या इटावा जिल्ह्यातील रामिकावर गावात पोहोचले....

रामिकावर हे निशाचे सासर आहे. घराचा पत्ता विचारल्यावर चावडीवर बसलेला एक ज्येष्ठ नागरिक म्हणाला, 'त्यांनी संपूर्ण गावाचे नाव बदनाम केले आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.’

मी त्यांच्याशी बोलण्यासाठी कॅमेरा चालू करताच ते उठतात आणि निघून जातात. मात्र, निघताना ते निशाच्या घराचा पत्ताही सांगतात.

इथून मी निशाच्या घरी पोहोचते. लाल साडी नेसलेली निशाची सासू रमा देवी कॉटवर बसलेली आहे. कॅमेरा पाहताच ती म्हणते, 'जो हुईगयो सो हुईगयो, अब का कर सकत। बहुत बदनामी हुइ चुकी। आप काहे बात बढ़ावत हैं। जान देओ।' (जे झाले ते झाले, आता काय करता येईल. खूप बदनामी झाली आहे. तुम्ही मुद्दा का वाढवताय, जाऊ द्या.)

मी विचारले निशा कुठे आहे?

उत्तर मिळाले- त्या घटनेनंतर मुलगा गावात आला आणि सुनेसोबत फतेहपूर सिक्रीला निघून गेला.

सुनेच्या या निर्णयावर रमादेवी काय म्हणाल्या, हे मी पुढे सांगेन. पण येथून मी फतेहपूर सिक्रीला निघाले.

इथे निशा आणि तिचा नवरा दोघेही भाड्याच्या छोट्या खोलीत राहतात. या एकाच खोलीत खाणे, पिणे आणि झोपणे सर्व. बेडवर बसलेली निशा लाल दुपट्ट्यात चेहरा लपवत रडत आहे. तिचे अश्रू पुसते आणि मला चहा-पाणी विचारते. मी चहा पिऊन आत्ताच आले सांगितल्यावर बेडवर एका कोपऱ्यात बसते.

या खोलीत निशा तिच्या पतीसोबत राहते. या खोलीत त्यांनी स्वयंपाकघरही बनवले आहे.
या खोलीत निशा तिच्या पतीसोबत राहते. या खोलीत त्यांनी स्वयंपाकघरही बनवले आहे.

निशा सांगते, 'वयाच्या 18 व्या वर्षी मी सासरी आले. खूप लाड झाले, पण मुलाला जन्म देऊ शकले नाही. नवऱ्याने माझे इटावापासून दिल्ली, गुरुग्रामपर्यंत सर्वत्र उपचार केले. मी 18 वर्षांपासून औषधे घेत आहे, परंतु काही उपयोग झाला नाही.

मोठ्या जावेला चार मुले आहेत. ती नेहमी म्हणते - तू वांझ आहेस, तू वांझच राहशील, तुला कधीच मुले होणार नाहीत. आपण मुलाला जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे मला ते शब्द लागायचे.

जावेला मुलगा झाला. तो माझ्यासोबत जास्तच राहायचा. त्याची आई म्हणायची की, तुला मूल होत नसेल तर काय झाले, त्याला आपलेच मूल समज, पण काही वर्षांनी तोही न्यूमोनियाने मरण पावला. यानंतर मला दुर्दैवी, मनहूस, कमनशीबी असे काय-काय म्हटले गेले.

लोक म्हणू लागले की, त्या मुलाचा मृत्यू माझी सावली पडल्यामुळेच झाला. जावेने चार वर्षांपासून मुलाला जन्म दिला नाही. मला बघून जावने तिच्या मुलांना लपवायला सुरूवात केली.

मी सकाळी-सकाळी कुणासमोर आले तर लोकांनी तोंड फिरवण्यास सुरूवात केली. म्हणायचे सकाळी सकाळी निपुत्रिकीचा चेहरा पाहिला? आज जेवणही मिळेल की नाही सांगता येणार नाही. मी जर कोणाच्या लग्नाला गेले तर लोक म्हणू लागले ‘कुठून आली शुभ प्रसंगी अशुभ करण्यासाठी.

लोकांच्या अशा टोमण्यांचा मला त्रास होत होता. मला स्वतःला वाटू लागले की, ही माझीच चूक आहे. जीव द्यावा असे वाटायचे, घर सोडून कुठेतरी जावेसे वाटले. पूजा करायचे, तर देवाची मूर्ती उचलून कुठेतरी फेकून द्यावे वाटत होते. माझे ऐकणारे कोणीच नव्हते.

निशा म्हणते, 'याच वर्षी मे-जूनची गोष्ट आहे. अडीच महिने पीरियड आले नाही. मी प्रेग्नेंसी किटची तपासणी केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली. कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी झाले, परंतु 15 दिवसांनीच गर्भ खराब झाला. यापूर्वीही असे दोन-तीन वेळा घडले होते.

मला वाटले की मी माझ्या घरच्यांना सांगितले तर लोक म्हणतील की मी खोटे बोलत होते. भीतीमुळे कोणाला सांगायची हिम्मत होत नव्हती. नवऱ्यालाही काही बोलले नाही.

दर महिन्याला डॉक्टरांकडे जात राहिले. दीर बाहेर बसायचे आणि मी आत वंध्यत्वावर उपचार करायचे. घरी आल्यावर मी सांगायचे की, मूल ठीक आहे. काहीच अडचण नाही. असेच मी 6 महिने कोणालाच काही सांगितले नाही.

एक दिवस पोटात दुखू लागले. डॉक्टरांना दाखवून आले तेव्हा मला घरात एक जुनी बाहुली दिसली. मला वाटले की मी जिवंत मुलाला जन्म देऊ शकत नाही. निदान मृत मूल जन्माला आले तर वंध्यत्वाचा डाग तरी दूर होईल. लोक मला दुर्दैवी म्हणणार नाहीत.

यानंतर रात्री लाल रंग टाकून पीठ मळून घेतले. सर्वजण झोपी गेल्यावर ते पीठ बाहुलीला लावले. तिला लहान मुलासारखे बनवले. पाण्यात थोडासा रंग विरघळवून खोलीत इकडे तिकडे पसरवला. मग आरडाओरडा सुरू केली. आवाज ऐकून सासू व इतर लोक आले. तेव्हा वाटले नव्हते की, ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल.

याच बाहुलीला पीठ लावून निशाने मुल जन्माला आले असल्याचे सांगितले होते.
याच बाहुलीला पीठ लावून निशाने मुल जन्माला आले असल्याचे सांगितले होते.

नवरा किंवा सासू नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नासाठी विचारत होते का?

निशा म्हणते, 'नवरा म्हणतो काळजी करू नकोस. मी तुझा चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेईन. मी तुला थोडीच सोडणार आहे. सासू-सासरे सुद्धा नवऱ्याचे पुन्हा लग्न करण्याबद्दल बोलत नाहीत, पण माझ्यामुळे त्यांची काळजी वाढत आहे.

आता पुन्हा निशाच्या सासूसोबत झालेल्या चर्चेकडे येते....

रमा देवी म्हणतात, 'सून मुलासोबत राहते. सहावा महिना चालू होता. आम्हाला खूप आनंद झाला होता. एके दिवशी तिच्या पोटात दुखत असल्याचा फोन आला. धाकट्या मुलाला पाठवून डॉक्टरांना दाखवण्यासाठी इथे बोलावले.

इथे येऊन फक्त दोन-तीन दिवस झाले होते. ती सकाळी म्हणाली - मम्मी पोटात खूप दुखत आहे. मला वाटले की भूत-प्रेताचे प्रकरण तर नाही. म्हणून मी संध्याकाळी शेजारी राहणाऱ्या एका बाबाला बोलावले. त्याने झांड-फूक केली. त्यानंतर सून झोपी गेली. आम्ही सगळे देखील झोपी गेलो.

पहाटे 3:30 ते 4 च्या दरम्यानची घटना आहे. सून अचानक ओरडायला लागली. आवाज ऐकून मी तिच्या खोलीत गेले तर जमिनीवर रक्त सांडलेले दिसले. मुल जवळच पडलेले होते. मी घाबरले आणि रडू लागले. थोडा अंधार होता, त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हते.

रडण्याचा आवाज ऐकून शेजारची सून आली. विचारले - काकू काय झाले? मी दाखवले की, मूल पडले होते. तिने हात लावून पाहिले आणि म्हणाली, काकू, हे कसले मूल आहे.

इतक्यात शेजारच्या दोन-चार महिलाही आल्या. कोणीतरी म्हणाले, भूत चेटकिणीने पछाडले आहे, मुलाचे रक्त चोखून घेतले आणि फक्त हाडे राहिली आहेत. यानंतर मी आशाला फोन केला. आशा म्हणाली सुनेला दवाखान्यात घेऊन चला. अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मी आशासह ऑटोमध्ये आपल्या सुनेसोबत कम्युनिटी सेंटरमध्ये पोहोचले.

याच रुग्णालयात निशाची तपासणी करण्यात आली. जिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की, हे मूल नसून प्लास्टिकची बाहुली आहे.
याच रुग्णालयात निशाची तपासणी करण्यात आली. जिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की, हे मूल नसून प्लास्टिकची बाहुली आहे.

लहान मुलगा म्हणाला बाळाला पण घेऊन जा. डॉक्टरकडून तपासणी करून घ्या, जेव्हा कधी मुलं होतील, तेव्हा असेच होते.

यापूर्वी देखील गर्भपात झाला आहे का?

दोनदा चांगली बातमी आली, पण गर्भ आधीच खराब झाला.

यानंतर मी रुग्णालयात पोहोचले जिथे निशाला तपासणीसाठी नेण्यात आले होते. येथे मी कम्युनिटी सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद कुमार शर्मा यांना भेटले.

असे सांगितले जाते की, 'महिला सकाळी सहा वाजता तिच्या सासूसोबत आली होती. तिने सोबत नवजात अर्भकही आणले होते. ते मूल मातीच्या बाहुलीसारखे दिसत होते. आम्ही म्हणालो दाखल व्हा, पण ती बाई निघून गेली. मुलाला हॉस्पिटलमध्येच सोडले. यानंतर आम्ही मुलाची तपासणी केली. प्लॅस्टिकच्या बाहुलीवर पीठ गुंडाळलेले होते. मग ते लाल रक्ताच्या रंगाने रंगवले गेले होते.

महिलेने असे का केले होते?

डॉ. विनोद शर्मा पटकन सांगतात, 'त्या महिलेने वंध्यत्व लपवण्यासाठी नाटक केले होते.'

त्यात रमा देवी सांगतात की, तिला खूप विचारलं, रागावले देखील, पण काहीही बोलली नाही, फक्त रडत राहिली. तिने कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून तिच्यावर 4 दिवस पहारा द्यावा लागला. मुलाने जेवढे कमावले त्यापेक्षा जास्त खर्च सुनेच्या उपचारावर केला.

मी विचारले, मुलाचे दुसरे लग्न करणार नाहीस का?

दुसऱ्या लग्नाचा विचार कधीच केला नाही.

यानंतर मी इंद्रेशला भेटेले. ती निशाची धाकटी बहीण असून इटावा येथील एका खासगी शाळेत शिक्षिका आहे.

ती म्हणते, 'दीदी खूप नाराज असायची. कधी कधी बोलणे झाले की ती रडायची. मुलबाळ नाही म्हणून लोक तिला प्रत्येक गोष्टीत टोमणे मारायचे. ती कमनशीबी असल्याचे सर्वत्र सांगितले जात होते. एकदा तर भावजीच्याही डोक्यात दुसऱ्या लग्नाचा विचार घुसला होता.’

या संपूर्ण घटनेबाबत मी निशाच्या पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. निशा, तिची सासू आणि गावातील लोकांशी बोलल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे कळते की, निशावर अत्याचार झाला आहे. निशा किंवा तिची सासू हे उघड करणे टाळत आहेत, पण निशाचा प्रत्येक शब्द सांगत आहे की, तिने हे पाऊल कोणत्या असहाय्यतेने उचलले असावे.

टीप- डॉक्टरांचे नाव सोडून बाकी सर्वांची नावे बदलली आहेत...

बातम्या आणखी आहेत...