आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रसिक'ची दशकपूर्ती:लैंगिक शिक्षणासाठी उपयुक्त ठरलेले "वात्स्यायनाचे जग' - वैद्य विजय कुलकर्णी

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत जानेवारी २०१५ पासून कामसूत्रावरील एका विशेष लेखमालेला माझ्या हातून प्रारंभ झाला. ही लेखमाला म्हणजे वात्स्यायनाचे जग... वात्स्यायनाच्या कामसूत्रावर आधारित आणि या कामसूत्राचे सोप्या मराठी भाषेत विविध विषयांच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करणारी ही लेखमाला रसिक पुरवणीने सुमारे दीड वर्ष सातत्याने प्रकाशित केली. सुरुवातीला आपण या विषयावर लिहाल का? अशी विचारणा मला संपादकीय टीमने केली. मी खरे तर भारतीय वैद्यकशास्त्राचा अभ्यासक परंतु कामशास्त्र हेदेखील या वैद्यकशास्त्राशी जवळचे नाते असणारे शास्त्र असल्याने कदाचित मला हे विचारले गेले असावे, मी थोडा विचार करून त्यावर होकारार्थी उत्तर दिले आणि या लेखमालेचा जन्म झाला.

सुमारे ३४ लेख या लेखमालेत माझ्याकडून लिहिले गेले, खरे तर कामशास्त्रावर मराठीतून अशाप्रकारे जाहीरपणे केली गेलेली चर्चा ही खूप कमी आहे आणि रसिक पुरवणीच्या रसिक वाचकांना यादरम्यान या लेखमालेतून मिळालेले कामशास्त्रावरील ज्ञान हे खरोखरच उपयुक्त होते असे माझ्या लक्षात आले. कारण ही लेखमाला प्रकाशित होत असताना मला यावर आलेल्या प्रतिक्रिया या खूप विशेष स्वरूपाच्या होत्या. अनेकांनी फोन करून मला या उपयुक्त लेखमालेबद्दल धन्यवाद दिले तर काहींनी ईमेलद्वारे याची उपयुक्तता मला सांगितली. अनेक जण प्रत्यक्ष भेटूनही मला या कामसूत्राच्या मिळणाऱ्या चांगल्या ज्ञानाबद्दल धन्यवाद देत होते. अनेकांनी याचे संकलन रुपी पुस्तक करावे अशीही सूचना केली. ती सूचना शिरसावंद्य मानून "वात्स्यायानाचे जग' याच नावाचे पुस्तक नाशिकच्या विराम प्रकाशनाने प्रकाशित केले. पुस्तकाला नाशिकमधील प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अभय सुखात्मे यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे.

आजही आपल्या समाजात एकूणच धर्म ,अर्थ ,काम आणि मोक्ष या चार पुरूषार्थांपैकी काम या पुरुषार्था वर जाहीरपणे चर्चा होत नाही. माध्यमिक शालेय स्तरापासून ते अगदी महाविद्यालयीन स्तरापर्यंत लैंगिक शिक्षण असावे असे अनेकदा अनेक स्तरांवर म्हटले जाते. परंतु त्याचे स्वरूप आजही स्पष्ट नाही. खरे तर ही लेखमाला म्हणजेच लैंगिक शिक्षणासाठी अतिशय उपयुक्त ठरावे अशी या मागील खरी संकल्पना आहे किंवा माझी धारणा आहे. शाळेमध्ये किंवा महाविद्यालयीन शिक्षणामध्ये अशा स्वरूपाच्या पुस्तकांचा संदर्भ म्हणून खरोखर समावेश होणे आवश्यक आहे. तरुण पिढीला लैंगिक शिक्षणाबद्दल योग्य मार्गदर्शन करायचे असेल तर वात्स्यायनाच्या कामसूत्राचा अभ्यास तरुण पिढीने निश्चितपणे करायला हवा. विवाह करण्याची इच्छा असणारे आणि विवाह झालेले असे सर्व गटातील तरुण-तरुणी यांच्यासाठी वात्स्यायनाचे ़जग हे पुस्तक म्हणजे ज्ञानाची एक पर्वणी आहे.

अश्लीलतेला कुठेही स्पर्श न करता किंवा होऊ न देता कामसूत्राबद्दल वात्स्यायनाने सांगितलेल्या ज्ञानाचे सोप्या मराठी भाषेत स्पष्टीकरण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यामध्ये खरेतर आयुष्याचे देखील ज्ञान वात्स्यायनाने सांगितलेले मला आढळले. कारण विद्यार्जन अर्थार्जन आणि मगच विवाह किंवा काम असा एक फार महत्वपूर्ण संदेश वात्स्यायनाने या कामसूत्रामध्ये दिलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे एकूणच चारही पुरुषार्थाबद्दल योग्य ती माहिती चांगल्या दिशेने मार्गदर्शन करणारी अनेक ग्रंथसंपदा भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला आढळते. वात्स्यायनाचे कामसूत्र हे देखील या ग्रंथ संपदेचा एक महत्त्वाचा असा भाग आहे. मूळ संस्कृत मध्ये असणाऱ्या या कामसूत्रा बद्दल फार मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये असलेली जिज्ञासा लक्षात घेऊन ही लेखमाला माझ्या हातून घडली असावी असे मला वाटते.

त्या मधून मिळणारे कामसूत्राबद्दलचे ज्ञान चांगल्या हेतूने आणि चांगल्या दिशेने तरुण-तरुणींच्या आणि एकूणच समाजाच्या ज्ञानासाठी उपयुक्त ठरावे आणि यामधूनच लैंगिक शिक्षण देखील मिळावे या धारणेतून तयार झालेल्या या पुस्तकाला रसिक पुरवणीचा फार मोठा हातभार लेखमालेच्या स्वरूपात लाभला आहे. दिव्य मराठीच्या या रसिक पुरवणीच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने दैनिक दिव्य मराठीच्या सर्व संपादक मंडळ, पत्रकार इत्यादी मंडळींना माझ्या मनापासून शुभेच्छा.

वात्सायनाचे जग
लेखक - वैद्य विजय कुलकर्णी
प्रकाशक - विराम प्रकाशन, नाशिक
संपर्क - ९८२२०७५०२१

बातम्या आणखी आहेत...