आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखे प्रेम:तरुणपणी बहरलेे प्रेम, कौटुंबिक अडचणींमुळे लग्न लांबले; आता 35 वर्षांनंतर विवाहबंधनात

वैभव चिंचाळकर । अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमरावतीच्या ज्युदो प्रशिक्षकांची अनाेखी प्रेमकहाणी, दोघेही सध्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क सेवा देत आहेत

अमरावतीच्या ज्युदो प्रशिक्षकांची अनाेखी प्रेमकहाणी, दोघेही सध्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क सेवा देत आहेत. या अनोख्या प्रेमकहाणीची चर्चा सध्या सर्वत्र आहे.

हे प्रेमच निर्मळ, नि:स्वार्थ, एकमेकांना निवृत्तीपर्यंत समजून घेणारे होते. तरुणपणी १९८४ मध्ये शहरातील शिवाजी ज्युदो क्लबवर पहिल्या नजरेत राज्य ज्युदो प्रशिक्षक डाॅ. सतीश पहाडे, एनआयएस ज्युदो प्रशिक्षिका अर्चना केवाळे यांचे प्रेम जडले. दिवसागणिक ते खुलले, बहरले. त्यानंतर कार्यालयीन कर्तव्ये, घरगुती अडचणींमुळे ते एकमेकांना समजावत सावरत राहिले. अनेक काटेरी डोंगरही त्यांना एकमेकांपासून विभक्त करू शकले नाहीत. आयुष्यातील निवृत्तीच्या टप्प्यापर्यंत त्यांनी कधीही कुरबूर केली नाही. खेळाची सेवा करण्यासोबत खेळाडू घडविण्यात दोघेही व्यग्र राहिले. २०१८ मध्ये िनवृत्त झाल्यावर राज्य ज्युदो प्रशिक्षक डाॅ. सतीश व एनआयएस ज्युदो प्रशिक्षिका अर्चना यांनी मित्रांच्या आग्रहाखातर जीवनगाठ पक्की केली. सुमारे ३५ वर्षे या प्रेमीयुगुलाची प्रेम तपश्चर्या सुरू होती.

डाॅ. सतीश व अर्चना हे दोघेही ज्युदो खेळाचे चाहते असल्यामुळे सर्वप्रथम दोघेही १९७९ मध्ये एचव्हीपीएम येथील उन्हाळी क्रीडा शिबिरात भेटले. त्यानंतर दोघांनी प्रत्यक्ष ज्युदो खेळाला सुरुवात केली. या दोघांचे शिवाजी ज्युदो क्लबवर एकमेकांवर १९८४ मध्ये प्रेम जडले. त्यानंतर काही िदवसांत १९८४-८५ मध्ये डाॅ. सतीश हे एनआयएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यास गेले. दरम्यान, ख्यालीखुशाली कळायची. ते परत आल्यानंतर १९८६-८७ मध्ये अर्चना या एनआयएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेल्या. त्या परत आल्यानंतर दोघेही ज्युदोचा एकाच क्लबवर सराव घ्यायचे. १९९१ मध्ये डाॅ. सतीश यांना उस्मानाबाद येथे क्रीडा विभागात नोकरी िमळाली. १९९३ मध्ये डाॅ. सतीश यांची अमरावती येथील क्रीडा अधिकारी कार्यालयात बदली झाली. अर्चना यांना मात्र क्रीडा विभागात नोकरी िमळाली नाही. त्यामुळे त्या खासगी बँकेत नोकरी करू लागल्या. त्यानंतर १९९७ मध्ये अमरावती येथील राज्याच्या ज्युदो प्रबोधिनीत डाॅ. सतीश राज्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले. दरम्यान, डाॅ. पहाडे व केवाळे हे दोघेही सध्या शिवाजी क्लबमध्ये भविष्यातील ज्युदो खेळाडू घडवत आहेत.

कौटुंबिक अडचणींमुळे लग्न लांबले

खेळांसाठी असलेली व्यग्रता व कौटुंबिक अडचणींमुळे दोघांनाही लग्न करता आले नाही. एकीकडे प्रेम, तर दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या अशी ही प्रेमाची इनिंग रंगत राहिली. डाॅ. सतीश यांनी िनवृत्तीच्या ९ महिने आधी, तर अर्चना यांनी िनवृत्तीच्या १ वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती घेऊन आयुष्याच्या संध्याकाळी तरी एकमेकांची सोबत असावी, असा िनर्णय घेतला. तरुणपणी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे लग्न करून एक होता आले नसले तरी प्रेमाखातर त्यांनी अडचणींचा पहाड पोखरून नवी वाट तयार केली. कशाचीही तमा या प्रेमीयुगुलाने बाळगली नाही. हे प्रेम दोघांचेही एकमेकांवरील अतुट विश्वासाचे प्रतीक बनून राहिले. अर्चना माझ्यासाठी इतके वर्षे थांबली हा तिचा मोठेपणा असल्याचे डाॅ. सतीश सांगतात.