आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कळत नव्हतं तेव्हापासून एड्ससोबत जगत आहोत. समाजात पदोपदी हेटाळणीचा विषय ठरलो. एचआयव्ही पॉझिटिव्ह या शब्दाची तर कानाला सवयच झाली. याबद्दल फारसं काही वाटत नव्हतं, पण आता आपल्यासारखाच एक जोडीदार मिळाला आणि दोन पॉझिटिव्ह एकत्र आल्याने जीवनातील सकारात्मकता जणू दुप्पट झाली, अशी भावना लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या हॅपी व्हिलेजमधील एड्सबाधित तरुण-तरुणींनी व्यक्त केली. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी १४ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता चार जोडपी पवित्र लग्नबंधनात बांधली जाणार आहेत. यानिमित्ताने त्यांनी आयुष्यातील आजवरचे अनुभव व सहजीवनाबद्दलचे स्वप्न, आकांक्षा ‘दिव्य मराठी’सोबत शेअर केल्या.
समाजातील प्रत्येक वाईट प्रवृत्तीशी लढा देताना आपल्या आयुष्यात काही बदल व्हायला हवा, आनंद मिळायला हवा, अशी इच्छा एचआयव्हीबाधितांची असते. आता हाच बदल आणि आनंद हॅपी व्हिलेज सेवालयातील अनाथांना मिळणार आहे. अनोखा आणि अशक्यप्राय वाटणारा हा लग्नसोहळा घडवून आणण्यासाठी सर्वात मोलाची व महत्त्वाची भूमिका सेवालयाचे संस्थापक रवी बापटले यांची ठरली. त्यांनीच यासाठी पुढाकार घेऊन सेवालयातील मुलींसाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे स्थळे शोधली. विशेष म्हणजे हे विवाह आंतरजातीय, आंतरराज्य आहेत. यातील एकाचा पुनर्विवाहही होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह माधव बावगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्यशोधक पद्धतीने शपथ देऊन हा लग्नसोहळा होईल.
या लग्नसोहळ्यातील एक वधू असलेली २० वर्षीय नेहा म्हणाली की, राजकुमारच्या निमित्ताने मला चांगला जोडीदार मिळाला. आयुष्याकडून माझी काही स्वप्ने नाहीत, पण जोडीदाराने मला समजून घ्यावे हीच माफक अपेक्षा आहे. पुण्यात कात्रजला ममता फाउंडेशनमध्ये वयाच्या १८ वर्षांपर्यंत राहिले. आता सेवालयात आहे. आजवरच्या आयुष्यात अनेकांकडून हेटाळणी झाली. पण त्याच वेळी समजून घेणारे लोकही भेटले. मागील ४ वर्षांपासून सेवालयात राहणाऱ्या २१ वर्षांच्या अश्विनीने मात्र स्वत:च्या लग्नाची जोमात तयारी केली आहे. भूतकाळाबद्दल बोलताना ती म्हणाली की, बालपणी एड्सबद्दल माहिती नव्हते. पण दहावीची परीक्षा देताना या आजाराबद्दल कळले आणि मानसिकदृष्ट्या मी कोसळले. पण आहे ती परिस्थिती स्वीकारून आयुष्य आनंदात जगण्याचा निर्णयही त्याच वेळी घेतला. त्यामुळे दहावीही उत्तमरीत्या उत्तीर्ण होऊ शकले. तिचा विवाह राजबा या तरुणाशी होणार आहे.
मूळ पुण्याची २५ वर्षीय पूजाही लग्न होत असल्याने खूप आनंदी आहे. तिचा जोडीदार महेश हा लातूरजवळ शिवणखेड येथे नोकरी करतो. बालपणीचे मित्र-मैत्रिणी लग्नात सहभागी होणार असल्याने ती आनंदी आहे. विवाह सोहळ्यातील एक नवरदेव २४ वर्षांचा अक्षयही काही वर्षांपूर्वी डीजे ऑपरेटर म्हणून काम करायचा. एका वर्षापूर्वी तो सेवालयात आला आणि सोनीच्या रूपाने त्याला समजून घेणारी पत्नी मिळणार असल्याने त्याच्या चेहऱ्यावरील आनंद लपता लपत नसल्याचे चित्र आहे.
मान्यवरांनी घेतले पालकत्व
या लग्न सोहळ्यासाठी मान्यवरांनी मदतीचा हात पुढे करत वधू-वरांचे पालकत्व स्वीकारले. यात प्रामुख्याने लातूरचे डॉ. संध्या व डॉ. संजय वारद, आमदार अभिमन्यू पवार, परभणीचे डॉ. पवन चांडक, मुंबईचे कृष्णा महाडिक, कोल्हापूर येथील डॉ. प्रीती व डॉ. स्वप्निल कणिरे, राचोटी चंद्रय्या स्वामी, लातूरचे उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर यांचा समावेश आहे.
लग्नाला ३०० वऱ्हाडी
लग्नाची जोमात तयारी सुरू आहे. लग्नात ३०० वऱ्हाडी असतील. पालक म्हणून समाजातील अनेक प्रतिष्ठित लोक सहभागी होत आहेत. या निमित्ताने चार जोडप्यांना एकमेकांचा भक्कम आधार मिळणार असल्याचे मोठे समाधान आहे. सेवालयाचा परिसर सजून या सोहळ्यासाठी सज्ज आहे. हळदीपासून सर्व कार्यक्रम आम्ही करणार आहोत. - रवी बापटले, संस्थापक, सेवालय, हॅपी व्हिलेज, हासेगाव.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.