आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिनबायकांचं जग:ढाबे पर अकेली लडकी नहीं आती! आप दूसरी लेडी हैं जो यहाँ पे आयीं...

2 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

प्रवासादरम्यान संपूर्ण कुटुंबासोबत एखाद्या महिलेने ढाब्यावर जाणे वेगळे आणि एकटीने जाणे वेगळे. अर्थात महिलेने एकटीने ढाब्यावर जाऊ नये असा काही नियम नाही. मात्र तरीही स्त्रिया सहसा एकटीने गावाबाहेरच्या एखाद्या ढाब्यावर जाताना दिसत नाहीत. ढाब्यावर बहुतांश वेळा ट्रक ड्रायव्हर, आंतरराज्य प्रवास करणाऱ्या खासगी गाड्या इत्यादींची आवकजावक असते, थोडक्यात, अनोळखी लोकांमध्ये कशाला जा? असाही त्यामागे उद्देश असू शकतो. स्त्रिया एकट्या ढाब्यावर का जात नाहीत, यामागच्या कारणांचा अनुभव घेऊन मांडलेला हा रिपोर्ताज....

रात्री सव्वाअकरा वाजले होते. रस्त्यातला अंधार अंगावर येत होता आणि पोटात भुकेसह थोडी धाकधूकही. ढाब्यावरचं जेवण हा खरं तर अनेकांसारखा माझ्याही आवडीचा थांबा. पण या वेळचा प्रवास वेगळा होता. रात्रीच्या अंधारात ढाब्यावर जेवणासाठी मी एकटी मुलगी चालले होते. एरवी मी “मुलगी म्हणून काय झालं?’ किंवा “एकटी असली म्हणून काय झालं?’ ही वाक्यं सहज वापरतो. पण प्रत्यक्षात जेव्हा “एकटी’ म्हणून आणि त्यातही “मुलगी’ म्हणून एखादा अनुभव प्रथमच घेत असतो तेव्हा जरा जास्तच सावध असतो. शहरापासून दूर हायवेवरील ढाब्यावर रात्री एकटीने जेवायला औरंगाबादहून पस्तीस किलोमीटर अंतरावरच्या राजस्थानी चौधरी ढाब्यावर मी थांबले, तेव्हा तशीच काहीशा सावध, संकोची भावनांनी मनात गर्दी केली.

ढाब्याच्या आत बरेच दिवे लखलखत होते, पण बाहेर मिट्ट काळोख होता. आवारात पार्क केलेले पंधरा-वीस ट्रक. बहुतेकांचे ड्रायव्हर-क्लीनर जेवायला गेल्याने केबिन रिकामी होती. एखाद्या केबिनच्या अंधारात काहीतरी खडखडाट सुरू असलेला. एक ट्रक आला. त्यातून दोघेजण उतरले. ड्रायव्हरनं सिगारेट शिलगावली. क्लीनर टायर तपासू लागला. दोघे आळीपाळीने सिगारेट ओढत होते, खाली-वर काहीतरी बघत होते. मला बघताच थोडे चपापले. ते माझ्याकडे बघताहेत हे लक्षात येताच मी ही चाल वाढवली आणि तडक ढाब्यात शिरले. बाहेरच्या मंडपात विसेक खाटा लावलेल्या. बहुतेकांची जेवणे होऊन तेथेच कलंडलेले. काही जण मोबाइलमध्ये व्यग्र. मी प्रवेश करताच साऱ्या नजरा माझ्याकडे लागल्या. मी थेट टेबलाजवळच्या खुर्चीवर जाऊन बसले. भोवतालचे सारे डोळे माझं निरीक्षण करीत होते. माझ्यासह सगळ्यांनाच एक ताण जाणवत होता. मी शर्ट-पँट घातले होते आणि केसांचाही बॉबकट. त्यामुळे ऑर्डर घेणाऱ्या मुलाच्या आधी लक्षात आलं नाही. तो नेहमीच्या सरावाने ऑर्डर घेण्यासाठी टेबलापाशी आला, पण मला पाहताच पुन्हा मालकाकडे गेला अन् म्हणाला - उस्ताद, लडकी है!

बिनबायकांच्या जगातल्या पुरुषांना त्या जगात बाई आल्यावर काय करायचं हे उमगत नाही तसंच काहीसं तिथं झालं होतं. ऑर्डर घेणारा छोकरा काही पुन्हा आला नाही. मध्यमवयीन वस्तादच शेवटी आले. म्हणाले, “दीदी आओ, बैठो. वो क्या है ना, ज्यादातर औरतें यहां आती नहीं. आप दूसरी -तीसरी हैं. ज्यादा तौर पे ट्रक ड्राइवर ही खाने को आते हैं.’ तोपर्यंत ढाब्यात मुलगी आल्याची बातमी लाऊडस्पीकर न लावता प्रत्येक बाजेवर पोहोचली होती. कुणी थेट तर कुणी चोरट्या नजरेनं माझी चाचपणी सुरू केली होती. काही जण तर हातात घास पण नजर माझ्याकडे असेच जेवत होते. त्या साऱ्याकडे दुर्लक्ष करून मी जास्तीत जास्त नॉर्मल राहण्याचा प्रयत्न केला.

तेवढ्यात तो ऑर्डर घेणारा मुलगा पुन्हा आला. मालकाने सांगितलं म्हणून जबरदस्तीच आल्यागत. माझ्या टेबलाजवळ उभा राहून एका दमात सगळ्या दहा-पंधरा भाज्या सांगून मोकळा झाला. मी म्हटलं, बैंगन की सब्जी और रोटी. त्याचा प्रश्न - तंदूर रोटी की चपाती? हळूहळू किमान आमच्यातील ताण सैलावत होता ही माझ्यासाठी चांगली गोष्टी घडली होती. मुलगी पाहून भांबावून निघून गेलेला तो मुलगा जेवण घेऊन आला. सगळ्यांच्या मनातला पहिला प्रश्न त्यानं विचारला, आप अकेले आयी हो क्या? त्या मोकळेपणाचा फायदा घेत मीही प्रतिप्रश्न केला - क्यों, लेडीज नहीं आती क्या यहां? त्याने मानेनंच नाही म्हटलं आणि भटारखान्याकडे गेला. समोरच बाजांवर एक फळी ठेवून जेवणाची व्यवस्था होती. माझ्याकडेच बघत, बोलत भाजी चिरली आणि कांदा कापत होता. मी म्हटलं, तुम्हीच करता का सर्व काम आणि स्वयंपाक, तर म्हणे हो, वस्ताद आणि आम्हीच करतो. एक जण रोटी करत होता दुसरा चहा आणि वस्ताद मसाला वांग्याची भाजी करत होते. स्वयंपाक होईपर्यंत फ्रेश व्हावं म्हणून थोड्या वेळाने विचारलं, लेडीज वॉशरूम आहे का? थोडा वेळ थांबून म्हणाला, आहे ना. वो ट्रक उसके पीछे है. जवळ जाऊन पाहिलं तर एकात लाइट सुरू होता. दुसऱ्यात मात्र बंद जे महिलांसाठीचे स्वच्छतागृह म्हणून दाखवण्यात आले त्यात लाइटच नव्हते. तिथून परत आले. जेवण सुरू केलं तरी पुन्हा येणारे-जाणारे पाहत होते. मला वाटलं बैंगन - रोटी ऐवजी लोकांच्या नजरांचाच एकेक घास मी घेत होते.

तासाभरात ढाब्यात काम करणाऱ्या मुलांचा संकोच कमी झाला. दुसऱ्या ग्राहकांकडून येता-जाता “दीदी, कुछ चाहिए क्या, कुछ चाहिए क्या’ असं ते विचारू लागले. ढाब्याच्या मालकांनी “दीदी है’ या दोन शब्दात सुरुवातीचा ताण सैल केल्याने त्यांनाही नंतर माझ्याशी बोलणं सोपं झालं होतं. तोपर्यंत तो ताण कायम होता. ढाब्याचे मालक पप्पू चौधरी आणि बसलेल्यांपैकी काही जणांना मी विचारलं, महिला का येत नाहीत का इथे? चौधरी म्हणाले हम तो सबको खाना खिलाते हैं... इस ढाबे पर आयी तुम दूसरी लडकी. एवढंच म्हणाले. पण जाताना शेवटी “कुछ मीठा खायेंगी दीदी?’ म्हणत चॉकलेटही दिलं. संकोचात सुरू झालेल्या त्या संवादान,ं “एक लडकी’पासून ते “दीदी’ असं तासाभराच्या त्या प्रवासाचं अंतर कापलं होतं. पुरुषांना सहज वाटणाऱ्या अशा किती जागा आहेत अजून जिथं “एका लडकी’चं जाणं, असणं “सहज’ असत नाही, याचा अनुभव घेतला.

कावरा-बावरा झालेला छोकरा... बिनबायकांच्या जगातल्या पुरुषांना त्या जगात बाई आल्यावर काय करायचं हे उमगत नाही तसंच काहीसं त्या ढाब्यावर झालं होतं. ऑर्डर घेणारा छोकरा काही पुन्हा आला नाही. मध्यमवयीन वस्तादच शेवटी आले. म्हणाले, “दीदी आओ, बैठो. वो क्या है ना, ज्यादातर औरतें यहां आती नहीं. आप दूसरी -तीसरी हैं. ज्यादा तौर पे ट्रक ड्राइवर ही खाने को आते हैं.’ तोपर्यंत ढाब्यात मुलगी आल्याची बातमी लाऊडस्पीकर न लावता प्रत्येक बाजेवर पोहोचली होती.

विद्या गावंडे
संपर्क : ९९२३०६९९२५

बातम्या आणखी आहेत...