आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • We Do Not Believe That Taliban Are Terrorists, If Fighting For Freedom Is Terrorism Then Nehru, Gandhi And Sheikhuddin Were Also Terrorists

भास्कर एक्सक्लूझिव्ह:अर्शद मदनी म्हणाले - तालिबान हा दहशतवादी आहे यावर आमचा विश्वास नाही, जर स्वातंत्र्यासाठी लढणे हा दहशतवाद असेल तर नेहरू -गांधी हेही दहशतवादी होते

संध्या द्विवेदी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलाखत वाचा सविस्तर...

तालिबान आणि दारुल उलूम दोन्ही देवबंद विचारधारेचे पालन करतात. याच कारणामुळे तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर दारुल उलूमही चर्चेत आहे. दैनिक भास्कर ही पहिली माध्यम संस्था आहे, जी सहारनपूरच्या देवबंद येथील दारुल उलूममध्ये पोहोचली आणि जमियत उल उलेमा ए हिंदचे प्रमुख आणि अध्यक्ष अर्शद मदनी यांच्याशी बातचीत केली.

तालिबान आणि दारुल उलूममध्ये काय संबंध आहे? अफगाणिस्तानात सरकारला पायउतार करत सत्ता हस्तगत करणाऱ्या तालिबानच्या विचारसरणीशी दारुल उलूम किती सहमत आहे? फतव्यांचा कारखाना म्हटले जाणारे देवबंद तालिबानच्या दहशतीविरोधात काही फतवा काढेल का? असे अनेक प्रश्न आम्ही अर्शद मदनी यांना विचारले. त्यांनी या सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली आहेत. भास्करने मौलाना अर्शद मदनी यांच्याशी इतर अनेक मुद्द्यांवरही चर्चा केली. त्यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या पहिल्या भागात तालिबान आणि त्याच्या विचारधारेशी संबंधित प्रश्नांवर मदनी यांचे मत वाचा ...

Q. तालिबान आणि दारुल-उलूम यांना एकत्र जोडून त्यावर चर्चा केली जात आहे, या संबंधावर तुमचे काय मत आहे?

नक्कीच नाही, या चर्चांना काही अर्थ नाही. या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. लोकांना माहीत नाही. भारताच्या स्वातंत्र्यासाठी उलेमांने जी भूमिका वठवली होती, त्याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. 1915 मध्ये, तुर्की आणि जर्मनीच्या मदतीने मौलाना हजरत शेखुद्दीनने अफगाणिस्तानात ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी 'आझाद हिंद' नावाचे भारतासाठी तात्पुरते सरकार स्थापन केले होते. त्या सरकारमध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह यांना सदर, मौलाना बरकतुल्लाह भोपाली यांना त्यांचे वजीर-ए-आजम आणि उबेदुल्ला सिंधी यांना गृहमंत्री करण्यात आले होते.

या सर्वांनी अफगाणिस्तानात जाऊन काम केले. त्यावेळी तेथे अनेक अफगाणींनी उलेमांचे अनुकरण केले. मी आधीही सांगितले आहे - जे स्वतःला देवबंदी समजतात ते तेच लोक आहेत जे शेखुद्दीनच्या अनुयायांचे वंशज आहेत. तेव्हाच अफगाणिस्तानात देवबंदी मदरशांची स्थापना झाली. हे लोक कधीही दारुल उलूममध्ये आले नाहीत आणि कोणतेही शिक्षण घेतले नाही. कोणत्या सरकारने अफगाणींना व्हिसा दिला आणि त्यांना येथे अभ्यासासाठी आमंत्रित केले, हा माझा प्रश्न आहे.

Q. तर तालिबानी आणि दारुल उलूमची विचारधारा वेगळी आहे का?

तालिबानची विचारधारा अशी आहे की ते गुलामी स्वीकारत नाहीत. आपल्या पूर्वजांची देखील हीच विचारधारा होती. गुलामी विरुद्ध लढण्यासाठी दारुल उलूमची निर्मिती झाली. या विचारसरणीला अनुसरून त्यांनी (तालिबान) रशिया आणि अमेरिकेच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या. बाकी आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या काळात जेव्हा आपण एखादे पत्र लिहितो, तेव्हा ते सेन्सॉर केले जाते. फोनवर बोलणे ते देखील रेकॉर्ड केले जाते. कोणीही हे सिद्ध करू शकत नाही की दारुल उलूममधील कोणी तालिबानीशी बोलतो.

Q. तालिबानने अफगाणिस्तानात शरिया लागू केली. आता तेथे महिलांना पडद्याआड राहावे लागेल; पुरुष आणि स्त्रिया एकत्र शिक्षण घेऊ शकणार नाहीत. त्यांच्या शरिया आणि दारुल उलूमच्या शरियात काही फरक आहे का?

कोण म्हणतं की, फक्त शरियात मुले आणि मुली एकत्र अभ्यास करू शकत नाहीत. भारतात अशी किती तरी विद्यापीठे आणि महाविद्यालये आहेत जी कोएड नाहीत. मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालये आणि मुलांसाठी स्वतंत्र महाविद्यालये आहेत. तर या महाविद्यालयांचा पाया तालिबान्यांनी घातला होता का? ज्यांनी ते स्थापन केले ते सर्व तालिबानचे जनक आहेत का? भारतात तालिबानचे सरकार आहे का?

येथे 40,000 महाविद्यालये आहेत ज्यात सुमारे 10,000 फक्त मुलींसाठीची आहेत. मुलं आणि मुलींना वेगळं शिकवणं काय शरियत आहे? तालिबानने भारतातील या विद्यापीठांची घोषणा केली आहे का? भारतात 100 वर्षांपासून हे घडत आले आहे.

Q. महिला निषेध करू शकतात का?

पडद्यात राहून निषेध करू शकतात. पडद्याचा अर्थ म्हणजे बुरखा किंवा सैल कपडे. ज्यात स्त्रीचे शरीर किंवा तिचे सौंदर्य इतरांना दिसणार नाही. लिपस्टिक, क्रीम न लावता बाहेर येऊन विरोध करू शकतात. एकूणच, पडद्याआड येऊन निषेध न्याय्य आहे.

Q. अफगाणिस्तानमध्ये ज्या प्रकारे महिला निषेध करत आहेत त्याला इस्लाम परवानगी देतो का?

मला माहित नाही की महिला तिथे काय करत आहेत? तिथे काय चालले आहे? माझ्याकडे व्हॉट्सअ‍ॅप नाही आणि मी बातम्या वाचत नाही. मी स्त्रियांच्या मुद्द्यात अडकत नाही.

हेही वाचा... भास्कर एक्सक्लूझिव्ह -2:अर्शद मदनी म्हणाले- हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच, सरसंघचालक काहीही चुकीचे बोललेले नाहीत; माझ्या मते संघ आता योग्य मार्गावर!

Q. दारुल उलूममधून इस्लामविरोधातील कोणत्याही कृत्यावर जगभरातील लोकांना फतवे दिले जातात. इथून तालिबानींच्या दहशतीविरोधात कधी फतवा निघाला होता का की भविष्यात निघू शकेल?

आम्ही कोणालाही दहशतवादी मानत नाही. तालिबान देखील दहशतवादी नाही. जर तालिबान गुलामगिरीच्या साखळीतून मुक्त होत असेल तर त्याला दहशतवाद म्हटले जाणार नाही. स्वातंत्र्य प्रत्येकाचा अधिकार आहे. जर त्याने गुलामगिरीची साखळी तोडली तर आम्ही टाळ्या वाजवतो. जर ती दहशत असेल तर नेहरू आणि गांधी सुद्धा दहशतवादी होते. शेखुद्दीन हा सुद्धा दहशतवादी होता.

ब्रिटीशांविरोधात लढा देणारे ते सर्व लोकसुद्धा मग दहशतवादी आहेत. दुसरे म्हणजे, लोकांना फतव्याबद्दल समजत नाही. फतव्याचा अर्थ फक्त आणि फक्त एवढाच आहे की, जेव्हा कोणी आम्हाला एखाद्या मुद्द्यावर इस्लामचा निर्णय काय आहे, अशी विचारणा करतात. तेव्हा आम्ही त्या प्रश्नाचे सरळ आणि थेट उत्तर देत असतो. फतवा कुणावरही बंदी घालत नाहीत. विश्वास ठेवायचा की नाही ही सर्वस्वी तुमची निवड असते.

Q. तालिबानी आज जे करत आहेत ते बरोबर आहे का? क्रूरतेच्या बातम्या माध्यमांमध्ये सतत येत असतात.

मला माहित नाही की आज तिथे काय चालले आहे. आम्ही शिकणारे आणि शिकवणारे लोक आहोत. मी आधीच सांगितले आहे की आम्ही वर्तमानपत्र वाचत नाही, आमच्याकडे व्हॉट्सअ‍ॅप नाही. हे तर तुम्ही आम्हाला तिथे काय घडतंय ते सांगत आहात. असो, आज आम्ही काहीही ठरवू शकत नाही. आतापर्यंत त्यांनी नीट राज्यही केले नाही. प्रथम त्यांना मुक्तपणे राज्य करू द्या. जर त्यांनी पुढे तिथे शांतता राखली, तिथे प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, आदर आणि हक्क संरक्षित केले तर मग आपण असे म्हणू की ते सर्वोत्तम सरकार आहे. जर तालिबान सरकार हे मान्य करत नसेल तर आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असे आम्ही म्हणू. जोपर्यंत ते पूर्णपणे राज्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही काहीही बोलू शकत नाही.

Q. तालिबान सरकारबद्दल मत बनवण्यासाठी तुम्ही स्वतःला किती वेळ द्याल?

त्यांना वेळ देणारे आम्ही कोण आहोत? भविष्य सांगेल. आम्ही राजकीय लोक नाही.

(या मुलाखतीच्या दुस-या भागात वाचा, मुस्लिमांविषयी RSS च्या मतांसह अशाच आणखी काही प्रश्नांवर मौलाना अर्शद मदनी यांची उत्तरे)

बातम्या आणखी आहेत...