आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • West Bengal Teacher Recruitment Scam Updates । TMC Minister Parth Chatterjee Profile । How ED And CBI Started Investigation? CM Mamata Banerjee Vs Bengal BJP

दिव्य मराठी एक्सप्लेनरकोण आहेत पार्थ चॅटर्जी?:शिक्षक भरती घोटाळ्यात ममतांच्या विश्वासू मंत्र्याला का झाली अटक? वाचा सविस्तर

श्रीकांत झाडे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ममतांचे कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. तब्बल 24 तास चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याआधी पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. पार्थ यांच्या निकटवर्तीय असलेल्या अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या घरी 20 कोटींहून अधिक रोख रक्कम आढळल्याने याप्रकरणाची देशभरात चर्चा झाली.

या पार्श्वभूमीवर आच दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया की, कोण आहेत पार्थ चॅटर्जी? बंगालचा शिक्षक भरती घोटाळा काय आहे? शारदा चिटफंडनंतर विरोधकांनी ममता सरकारला पुन्हा का घेरले आहे?

सलग 5 वेळा आमदार आहेत पार्थ चॅटर्जी

पार्थ चॅटर्जी हे पश्चिम बंगाल सरकारमधील वाणिज्य आणि उद्योग विभागाचे विद्यमान मंत्री आहेत. ते राज्याचे माजी शिक्षणमंत्रीही राहिले आहेत. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, पश्चिम बंगालचे सरचिटणीस हे राजकीय पदही त्यांनी भूषवले आहे. पार्थ हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. 2001, 2006, 2011, 2016 आणि 2021 असे सलग पाच वेळा ते तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.

एमबीएची पदवी, बहुराष्ट्रीय कंपनीत केले काम

पार्थ चॅटर्जी यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1952 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण नरेंद्रपूर येथील रामकृष्ण मिशन स्कूलमधून झाले. त्यानंतर आशुतोष कॉलेजमधून अर्थशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी ISWBM मधून MBA ची पदवी मिळवली. यानंतर त्यांनी अँड्र्यू युल ग्रुप या बहुराष्ट्रीय कंपनीत एचआर मॅनेजर म्हणूनही काम केले.

2001 मध्ये राजकीय कारकीर्दीला सुरुवात

पार्थ चॅटर्जींची राजकीय कारकीर्द 2001 मध्ये सुरू झाली. त्याच वर्षी ते बेहाला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यानंतर त्यांची पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. 2011 मध्ये ते सलग तिसऱ्यांदा जिंकले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 59,021 मतांच्या फरकाने मोठा पराभव केला. त्यानंतर पुन्हा 2016 आणि 2021 मध्ये बेहाला पश्चिमच्या जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिले.

2011 ला पहिल्यांदा मिळाले कॅबिनेट मंत्रिपद

20 मे 2011 रोजी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांना वाणिज्य आणि उद्योग, सार्वजनिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि संसदीय कामकाज या खात्यांचे वाटप करण्यात आले. 2016च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्याकडे उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण खाते देण्यात आले. 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सलग पाचव्यांदा विजय मिळवल्यानंतर त्यांना पुन्हा वाणिज्य आणि उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स ही खाती देण्यात आली.

ED आणि CBI कडून तपास सुरू

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारी प्रायोजित आणि अनुदानित शाळांमधील गट 'क' आणि 'डी' कर्मचारी आणि शिक्षकांच्या भरतीतील कथित अनियमिततेची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशी करत आहे. त्याच वेळी ईडी या प्रकरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंगच्या तपासात गुंतलेली आहे.

तृणमूलने केला अर्पिता मुखर्जीपासून दुरावा

तृणमूलवर भाजपकडून राजकीय हल्ले सुरू असतानाच तृणमूलने भाजपवर केंद्रीय यंत्रणांद्वारे तृणमूलच्या नेत्यांना अडकवल्याचा आरोप केला होता. पण आता तृणमूलचा सूर बदलल्याचे दिसून येते. आता तृणमूल काँग्रेसकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे की, त्यांचा अर्पिता मुखर्जी यांच्याशी कोणताही संबंध नाही. पक्षाचा कोणताही नेता त्यांना ओळखत नसल्याचेही सांगण्यात आले.

तृणमूल काँग्रेसचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले होते. त्यात कोट्यवधींची रोकड आढळल्याने देशभरात याची चर्चा झाली.
तृणमूल काँग्रेसचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले होते. त्यात कोट्यवधींची रोकड आढळल्याने देशभरात याची चर्चा झाली.

या वक्तव्यानंतर भाजपने तृणमूल काँग्रेसला पुन्हा घेरले आहे. भाजपच्या प्रवक्त्यांने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ममता बॅनर्जी अर्पिता यांच्यासोबत व्यासपीठावर दिसत आहेत. भाजपने सवाल केलाय की, या नात्याला काय म्हणावे? त्याचवेळी भाजप नेते अग्निपॉल मित्रा यांनी अर्पिता या पार्थ चॅटर्जींची गर्लफ्रेंड असल्याचाही दावा केला.

कोण आहेत अभिनेत्री अर्पिता मुखर्जी?

ईडीच्या छाप्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अर्पिता मुखर्जी यांनी बंगाली चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. फार कमी काळासाठी त्या सक्रिय होत्या. अर्पिता मुखर्जींनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत बहुतेक साइड रोल्स केले आहेत. बंगाली चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ओडिया आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

अर्पिता मुखर्जीने बंगाली चित्रपट सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीत यांच्या प्रमुख भूमिकांसह काही चित्रपटांमध्ये साइड रोल देखील केला आहे. याशिवाय अर्पिता मुखर्जीने अमर अंतरनाद या बंगाली चित्रपटातही काम केले होते. अर्पिता मुखर्जी आता ईडीच्या छाप्यात 20 कोटींची रोकड सापडल्याने चर्चेत आली आहे. केंद्रीय एजन्सींच्या म्हणण्यानुसार, शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासादरम्यान अर्पिता मुखर्जीचा सहभाग समोर आला होता.

दुसरीकडे, भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. ममता या अर्पिताचे कौतुक करताना ऐकू येतात, तर अर्पिता हात जोडून त्यांचे आभार मानत आहेत.

EDच्या छाप्यांत मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरी 20 कोटींहून अधिक रकमेची रोकड सापडली.
EDच्या छाप्यांत मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरी 20 कोटींहून अधिक रकमेची रोकड सापडली.

'20 हजारांहून अधिकचा भ्रष्टाचार?'

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, जो भ्रष्टाचार झाला आहे, तो एक-दोन व्यक्ती किंवा संगनमताने नाही. हे संपूर्ण तृणमूल काँग्रेसचे संगनमत आहे. ज्यांच्या घरातून 20 कोटी रुपये मिळाले आहेत, त्यांचे चांगल्या कामांबद्दल ममता बॅनर्जी कौतुक करताना दिसत आहेत. त्यांनी उत्तर द्यावं की, या नात्याला काय म्हणावे? त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गरिबांच्या नोकऱ्या श्रीमंतांना विकण्याचा हा घोटाळा आहे. टीएमसीला उत्तर द्यावे लागेल. पार्थ, ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत अनेक छायाचित्रे आहेत. वीस कोटी ही छोटी रक्कम आहे, त्यात 20 हजार कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार आहे.

पश्चिम बंगालचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार दिलीप घोष म्हणाले की, तपासाची झळ ममता बॅनर्जींपर्यंत पोहोचेल. ही अटक खूप आधी व्हायला हवी होती. आणखी अनेकांना अटक करावी लागेल. जिल्हाध्यक्ष अनुब्रता मंडल यांच्याकडे दीडशे कोटींची मालमत्ता आढळली आहे. अर्पिता यांच्या घरातून 20 मोबाईल सापडले. त्यातून आणखी अनेक गुपिते उघड होतील.

भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी अर्पिता आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक जुना फोटो ट्वीट करून सरकारला जाब विचारला आहे.
भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी अर्पिता आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक जुना फोटो ट्वीट करून सरकारला जाब विचारला आहे.

'सर्वांना अडकवून ममता स्वच्छ बसल्या'

दिलीप घोष यांनी प्रत्येक आमदारावर जबाबदारी टाकल्याचा आरोप केला. नोकरीच्या नावाखाली पैसे गोळा करून वरात आणले. कालपर्यंत ममता बॅनर्जी आरोप करत होत्या, आता समोर येऊन उत्तर द्या. धमकी दिली, आता विधान बदलले आहे. पक्ष किंवा तृणमूल काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचे ते सांगत आहेत. हुशारीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण आता सुटण्याची शक्यता नाही. अटकसत्र सुरू झाले आहे. ममता सगळ्यांना अडकवून शांत बसल्या आहेत. ममतांनी पैसे सांभाळण्यासाठी आपल्या सोबत राहिलेल्या आपल्या बड्या नेत्यांना अडकवले आणि त्या स्वच्छ बसल्या आहे.

'वरपासून खालपर्यंत पैसा'

भाजप नेते अग्निमित्र पॉल म्हणाले की, बंगाल आनंदी आहे. ममता बॅनर्जींनी सर्व मंत्र्यांना हटवावे, असे न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते, पण ममता यांनी न्यायालयाचा आदेशही मान्य केला नाही. आम्हाला अजूनही धमक्या येत आहेत. संपूर्ण पक्षाने खालपासून खालपर्यंत पैसे खाल्ले आहेत. अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीची गर्लफ्रेंड आहे, तिच्या घरी 20 कोटी मिळाले. मोनालिसाच्या नावावर 10 फ्लॅटची कागदपत्रे सापडली आहेत. वरपर्यंत कारवाई व्हायला हवी.

पुतण्याला वाचवण्यासाठी मंत्र्यांचा बळी, अधीर रंजन यांची टीका

दुसरीकडे, काँग्रेस नेते आणि बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले की, पुतण्याला वाचवण्यासाठी मंत्र्यांचा बळी दिला जात आहे. जेव्हापासून पुतण्याची ईडीने चौकशी केली होती. तिथेच त्यांना याबाबत माहिती मिळत होती. दीदींनी पार्थदाला बुडवले आहे. एक चोर (कुणाल घोष) दुसऱ्या चोरावर भाष्य करतो. बंगालमध्ये भ्रष्टाचाराचा उद्योग झाला असून ममता बॅनर्जी यांनी हा उद्योग उभारल्याचे ते म्हणाले.

शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी कोण-कोण रडारवर?

शिक्षकांच्या नियुक्तीप्रकरणी पार्थ चॅटर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर आता विरोधी पक्ष भाजप आणि सीपीआय(एम) ममता बॅनर्जींवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत आणि ममता बॅनर्जींवर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि या प्रकरणात ममता बॅनर्जी यांचाही कुठेतरी सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, ममता बॅनर्जी सातत्याने केंद्रीय यंत्रणांवर गैरव्यवहाराचे आरोप करत आहेत.

सीबीआयने शिक्षण राज्यमंत्री परेश अधिकारी यांची चौकशी केली, तेही एजन्सींच्या रडारवर आहेत. परेशचंद्र अधिकारी यांच्यावर त्यांची मुलगी अंकिता अधिकारीसह कुटुंबातील सदस्यांना बेकायदेशीरपणे नोकरी दिल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर अंकिता अधिकारीला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि दिलेला पगार परत करण्यास सांगितले. याप्रकरणी सीबीआयने परेश अधिकारी यांची अनेकदा चौकशी केली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी परेशचंद्र अधिकारी यांच्या घरावरही छापा टाकला.

चिटफंड घोटाळ्यातही अनेक मंत्री-नेत्यांना झाली होती अटक

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेत्याला घोटाळ्यात अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी चिटफंड घोटाळ्यात ममता बॅनर्जी यांच्या अनेक मंत्री आणि नेत्यांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील शारदा चिटफंड घोटाळ्यात ममता बॅनर्जींचे मंत्री फिरहाद हकीम, माजी मंत्री मदन मित्रा, दिवंगत मंत्री सुब्रत मुखर्जी, माजी खासदार आणि सध्या तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. रोझ व्हॅली चिड फंड घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना अटक करण्यात आली आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांच्या हेराफेरीचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. मात्र, या प्रकरणात अटक झालेले सर्व नेते आणि मंत्री जामिनावर आहेत. या प्रकरणातील मूळ आरोपी आणि शारदा चिटफंडचे मालक सुदिप्त सेन आणि त्याचा सहकारी देवजानी सध्या तुरुंगात आहेत.

बातम्या आणखी आहेत...