आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सांगतो ऐका...:काय बघतो रे..?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता मात्र विश्रामचा राग अनावर झाला. एक तर त्याला अर्ध्या तासापासून वाटतंय, की हा माणूस आपल्याकडं बघतोय. आणि आता तोच उलट म्हणतोय की तुम्हीच माझ्याकडं बघताय. पण, खरी गोष्ट हीच होती. तो माणूसही खूप वेळापासून हाच विचार करत होता. विश्राम आपल्याकडं का बघतोय?

वि श्राम आणि नरेंद्र एक तास झाले चांगला बार शोधत होते. विश्रामचं गावात किराणा दुकान होतं. बरं चालू होतं. खरं तर चांगलं. दुकान एवढं उत्तम चालायचं की यंदा विश्राम निवडणुकीत उभा राहणार होता. पैसा खेळत होता. अंगात धाडस होतं. ‘अरे’ला ‘का रे’ करायचा स्वभाव होता. विश्रामचा राग गावात फेमस होता. त्याचा वारंवार उल्लेख व्हायचा. आणि त्यानं तो सुखावून जायचा. दर आठवड्याला विश्रामला सामान घ्यायला शहरात यावं लागायचं. तो दिवस विश्रामसाठी दिवसभर खरेदी आणि रात्री दारू असा ठरलेला.. आज खूप उशीर झाला होता. रात्रीचे बारा वाजत आले होते. कोपऱ्यातला एक टेबल निवडून दोघे बसले. ऑर्डर दिली. गप्पा सुरू झाल्या. विश्रामसोबत गप्पा मारायच्या म्हणजे समोरच्यानं त्याचं कौतुक करायचं, हे ठरलेलं. नरेंद्र तेच करत होता. विश्रामला आपल्या कौतुकाचा कधी कंटाळा यायचा नाही. तो मन लावून ऐकत राहायचा. पण, आज त्याचं लक्ष नरेंद्रच्या बोलण्याकडं नव्हतं. तो अधूनमधून पलीकडच्या कोपऱ्यात बसलेल्या माणसाकडं बघत होता. खूप वेळ झाला तो माणूस मधूनमधून आपल्याकडं बघतोय, हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं नरेंद्र बोलत असताना विश्राम सारखा वळून त्या माणसाकडं बघत होता. विश्रामचं लक्ष गेलं की कधी तो माणूस नजर वळवायचा. कधी विश्रामचं लक्ष असायचं आणि अचानक त्याची नजर विश्रामकडं जायची. या गोष्टीमुळं विश्राम आता हळूहळू विचारात पडला. विश्रामच्या मनात भीती होती, की हा माणूस आपल्याला ओळखणारा तर कुणी नाही ना? कारण त्यानं निवडणुकीत उभं राहायचं ठरवलं होतं, तेव्हापासून तो आपल्या प्रतिमेबद्दल सावध झाला होता. आपण दारू पितो, हे गावात कुणाला कळू नये याची तो काळजी घ्यायचा. नरेंद्र सारखा एखाद-दुसरा मित्र सोबत ठेवायचा. आणि शहरात आल्यावरच दारू प्यायचा. त्यामुळं विश्राम दारू पितो, हे गावी फार कुणाला माहीत नव्हतं. पण, आता हा माणूस कोण? आपल्याकडं का बघतोय? या प्रश्नांनी विश्राम अस्वस्थ झाला. तो माणूस टेबलवर एकटाच होता. त्याचा पेग आणि समोर चीजचे तुकडे. त्याच्या कपड्यावरून बऱ्यापैकी श्रीमंत वाटत होता. त्याच्यासमोर जी बाटली होती, ती पण चांगलीच महागडी होती. विश्रामचं स्वतःच्या बाटलीकडं लक्ष गेलं. ती त्या मानानं स्वस्तातली होती. अचानक विश्रामला वाटलं, की तो माणूस आपल्याकडं तुच्छतेनं बघतोय. त्याच्यासमोर चीज आहे. आपण शेंगदाणे खातोय. आपण भारी काहीतरी मागवलं पाहिजे. विश्रामने उगाच मेन्यू मागवला. वाचू लागला. नरेंद्रचं बोलणं चालू होतं. आता विश्राम त्याच्याकडं मुळीच बघत नव्हता. विश्रामनं वाचता वाचता नजर वर करून त्या माणसाकडं बघितलं. तो माणूस विश्रामकडं बघत होता. त्यानं नजर फिरवली. आता मात्र विश्रामला अस्वस्थ वाटू लागलं. हळू आवाजात गझल चालू होती. गझलचे शब्द काळजाला भिडणारे होते... करोगे याद तो हर बात याद आयेगी...

गझल आता विश्रामच्या डोक्यात जाऊ लागली. त्याला विनाकारण सगळ्याच गोष्टींचा राग येऊ लागला. तो वैतागून नरेंद्रला, ‘शांत बस!’ म्हणाला. नरेंद्रला काही कळलंच नाही की विश्राम का रागावला? पण, त्याला विश्रामच्या स्वभावाची कल्पना होती. नरेंद्र काही बोलला नाही. उरलेला ग्लास एका घोटात संपवून तो गझल गुणगुणत राहिला. विश्रामचं पुन्हा त्या माणसाकडं लक्ष गेलं. तो माणूस बघतच होता. आता विश्रामला त्याची नजर आणखी तुच्छतापूर्ण वाटू लागली. त्यात नरेंद्रचं गुणगुणनं त्याला त्रास देऊ लागलं. त्यानं पुन्हा नरेंद्रला शांत बसवलं. आता नरेंद्रकडं करण्यासारखं काहीच उरलं नाही. त्यानं पुन्हा पेग भरला. आणि कुणीतरी कामगिरी सोपवावी तशी तो दारू पिऊ लागला. विश्रामचं मात्र दारूतून लक्ष उडून गेलं होतं. त्यानं मेंदूला खूप ताण देऊन पाहिला, पण काही केल्या त्याला त्या माणसाची ओळख पटत नव्हती. आणि समजा तो ओळखीचा असता तर त्यानं हात दाखवला असता. हसला असता. पण, त्या माणसानं असं काही केलं नाही. तो फक्त अधूनमधून विश्रामकडं बघत राहिला. विश्रामचा संताप वाढत राहिला. त्यानं एकदा वेटरला बोलवलं. तो माणूस कोण आहे, असं हळूच विचारलं. वेटरला काही माहीत नव्हतं. त्यानंसुद्धा त्या माणसाला पहिल्यांदाच पाहिलं होतं. विश्राम खूप संयम ठेवून होता. त्या माणसाकडं बघायचं टाळत होता. पण, पेग भरता भरता एकदा त्याची नजर गेलीच. तो माणूस फोनवर बोलत होता. बोलता बोलता त्यानं विश्रामकडं पाहिलं. आता मात्र विश्रामच्या संयमाचा बांध फुटला. तो सरळ उठून त्या माणसाकडं गेला. आणि म्हणाला, ‘काय बघतो रे..?’

विश्राम आपल्याकडं येईल आणि असा काहीतरी प्रश्न विचारेल, असा त्या माणसाला अंदाजच नसावा. तो विश्रामकडं बघतच राहिला. विश्राम ओरडला.. ‘काय विचारतोय मी? काय बघतो माझ्याकडं?’ त्या माणसाला आश्चर्य वाटलं. त्यानं विचारलं, ‘मी?’ विश्राम आणखी रागात बोलू लागला.. ‘हो तूच! मघापासून बघतोय मी.. काय बघतो माझ्याकडं?’ त्या माणसाला हे नवीनच होतं. त्याला हसू आलं. तो बोलला, ‘मी कशाला बघू? उलट मलाच प्रश्न पडला की तुम्ही का बघताय माझ्याकडं?’ आता मात्र विश्रामचा राग अनावर झाला. एक तर विश्रामला अर्ध्या तासापासून वाटतंय, की हा माणूस आपल्याकडं बघतोय. आणि आता तोच उलट म्हणतोय, की तुम्हीच माझ्याकडं बघताय. पण, खरी गोष्ट हीच होती. तो माणूसही खूप वेळापासून हाच विचार करत होता. विश्राम आपल्याकडं का बघतोय? बारमध्ये असं खूप वेळा होतं. एक तर दारू पिताना माणसाला एक अपराधी भावना असते. त्यात कुणीतरी आपल्याकडं बघतोय, असं वाटू लागलं, की ही भावना आणखी तीव्र होत जाते. पण खूपदा लोकांना ती लक्षात येत नाही. विश्रामसारख्याला तर शक्यच नाही. विश्रामने त्याला शिवी हासडली. तो माणूस इंग्रजीत काहीतरी बोलला. तर विश्राम त्याला, इंग्रजीत बोलतो? म्हणून आणखी शिव्या देऊ लागला. वेटर आला. पण, आता विश्राम आवरायच्या पलीकडे गेला. खरं तर वेटरला कारण काहीच कळत नव्हतं. त्यात आपण एवढे बोलतोय तरी हा माणूस जागचा उठत नाही, उलट बसूनच शांतपणे उत्तर देतोय, हे विश्राम पचवू शकत नव्हता. त्यानं न राहवून त्या माणसाला थोबाडीत ठेवून दिली. मग मात्र तो माणूस उठला आणि त्याने पण विश्रामला कानाखाली मारली. दोघांची मारामारी सुरू झाली. तो माणूस तसा साधाच. विश्रामच्या सोबतीला आता नरेंद्र पण आला. दोघांनी त्या माणसाला चांगलाच मारला. फक्त मारामारी चालू असताना विश्राम तोल जाऊन पडला. आणि फुटलेल्या बाटलीची काच त्याच्या हातात शिरली. रक्त वाहू लागलं. नरेंद्रने रुमाल बांधला. बर्फ आणला. हळूहळू त्यांच्या लक्षात आलं, की तो माणूस संधीचा फायदा घेऊन गायब झालाय. नरेंद्र विश्रामचं रक्त थांबवायचा प्रयत्न करत राहिला. पण, रक्त थांबत नव्हतं.

नरेंद्र आणि विश्राम घाबरून गेले. हॉटेलचा मालक आला. त्यानं दवाखान्याचा पत्ता सांगितला. कारण विश्रामची अवस्था गंभीर होती. नरेंद्र घाईत विश्रामला घेऊन गेला. रात्रीचा एक वाजला होता. नर्सने डॉक्टरला फोन केला. कारण तिला आधी आत्महत्येचीच केस वाटली. डॉक्टरने काय करायचं ते सांगितलं. थोड्या वेळात येतो म्हणाले. पण, विश्रामची अवस्था बिकट होत चालली. खूप रक्त वाहिल्याने त्याला ग्लानी आल्यासारखं वाटू लागलं. आपली शुद्ध हरपतेय, याची जाणीव होऊ लागली. नरेंद्र बाहेर पडून जवळच्या दोघा-तिघांना फोन करू लागला. नर्सने नव्याने पट्टी बांधायला घेतली. नर्स नवीनच होती. ती स्वतःच घाबरली होती. त्यामुळं नरेंद्र आणखीनच घाबरून गेला. तो बाहेर फोनवर बोलत राहिला. विश्राम भेदरलेल्या नर्सकडे बघत होता. आपला शेवट जवळ आलाय, असं त्याला वाटू लागलं. अचानक दार उघडलं. विश्रामला आता धूसर दिसत होतं. डॉक्टर जवळ आले. विश्राम हैराण झाला. त्यानं मघाशी मारहाण केलेला माणूसच डॉक्टर होता. विश्रामला मेल्याहून मेल्यासारखं वाटू लागलं. त्याचे डोळे उघडे राहणं अशक्य वाटत होतं. नर्स काहीतरी बोलत होती. डॉक्टर इंजेक्शनची तयारी करत होते. इंजेक्शन द्यायच्या आधी डॉक्टरांनी विश्रामचा डोळा दोन्ही बोटांनी उघडला. म्हणाले, ‘काय बघतो रे..?’ विश्राम त्राण नसतानाही नकारार्थी मान हलवत होता.बघतात माणसं एकमेकांकडं. खूपदा ते गरजेचं असतं. जसं आता डॉक्टर विश्रामकडं बघत होते.

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com

बातम्या आणखी आहेत...