आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • What Exactly Did Barack Obama Write In That Book?, Article By Divya Marathi State Editor Sanjay Awate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एडिटर्स चॉइस:बराक ओबामांनी ‘त्या’ पुस्तकात नक्की काय लिहिलं ?

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक
  • डॉ. मनमोहन सिंगांचा गौरव, विभाजनवादी राष्ट्रवादाचे आव्हान, राहुल यांना म्हटले प्रामाणिक!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे ‘ए प्रॉमिस्ड लँड’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्या पुस्तकाची भारतात उलटसुलट चर्चा आहे. चर्चा काय झाली आणि नेमके आहे काय या पुस्तकात?

बराक ओबामांचे ‘ए प्रॉमिस्ड लँड’ अर्थातच वाचायचं होतं. सवयीप्रमाणे ते ‘ऑनलाइन’ मागवलं. पण, ते फिजिकली पोहोचण्यापूर्वीच अख्खं पुस्तक इंटरनेटवर लिक झाल्यानं त्याची पीडीएफ आधी पोहोचली.

ओबामांचं हे पुस्तक इंटरनेटवर ‘लिक’ झालं, तेही सर्वप्रथम भारतात. कसं काय लिक झालं? कारण एकच. त्यांनी राहुल गांधींबद्दल जे लिहिलं आहे, त्यामुळं हे पुस्तक आवर्जून लिक केलं गेलं असणार!

७६८ पानांचे हे पुस्तक वाचत होतो. त्यात राहुल यांच्याबद्दल साधा एक परिच्छेद आहे. पण, प्रकाशनपूर्व समीक्षणात ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने त्याचा आवर्जून उल्लेख करावा आणि भारतभर सर्वदूर त्याची चर्चा व्हावी, हे अर्थातच ठरवून केले गेले. प्रकाशकांची ही खेळी यशस्वी ठरली. पण, पुस्तक नेटवर चोरले गेल्याने थोडी कोंडीही झाली. राहुल गांधी भारतासाठी एवढे महत्त्वाचे आहेत, याची कल्पना प्रकाशकांना असावी, पण त्यासाठी सर्व काही पणाला लावून, पुस्तक असे हॅक होईल, हे काही त्यांच्या डोक्यात आले नसावे!

१७ नोव्हेंबरला पुस्तक आले आणि एका दिवसात एकट्या अमेरिकेत त्याच्या नऊ लाख वगैरे प्रती विकल्या गेल्या. मिशेल ओबामांचे ‘बीकमिंग’ दोन वर्षांपूर्वी असेच विकले गेले होते. पण, तो विक्रम या पुस्तकाने मोडला. मिशेल यांचे पुस्तकही मी वाचले आहे. ते काही मला तेवढे आवडले नव्हते. असो. राहुल गांधी यांच्यासंदर्भातील वाक्याला आणि प्रकाशनपूर्व जाहीर होण्याला व्यावसायिक संदर्भ होता, हे लक्षात घेतले पाहिजे.

बरं, एवढे या पुस्तकात राहुल यांच्याबद्दल आहे काय? झालेली चर्चा आणि प्रत्यक्ष मजकूर यात मोठी तफावत आहे. मुळात हे पुस्तक म्हणजे ओबामांच्या अध्यक्षीय कारकीर्दीचा दस्तऐवज आहे. तोही पहिला भाग. म्हणजे पहिली टर्म. २००८- २०१२. साधारणपणे दशकभरापूर्वी त्यांनी केलेले राहुल गांधींचे निरीक्षण. त्या परिच्छेदाचा साधा अर्थ असा आहे - “या पठ्ठ्याचा अभ्यास चांगला आहे. पण, त्यातल्या ‘मास्टरी’साठी आवश्यक असणारा स्वाभाविक कल किंवा पॅशन यामध्ये हा नेता थोडा कमी पडतो.”

आता, दहा वर्षांपूर्वीच्या या निरीक्षणात अडचण काय आहे? ओबामांसारख्या प्रतिभावंत स्टेट्समनला राहुलबद्दल एवढे आवर्जून नोंदवावे वाटले, हेही राहुल दखलपत्र असल्याचे अधोरेखित करणारे आहे.

एवढेच नव्हे तर, राहुलबद्दल ‘स्मार्ट, आईसारखाच देखणा, प्रामाणिक कळकळ असलेला’ असेही ओबामांनी म्हटले आहे, याची कोणी दखलही घेतलेली नाही. खोट्याचा सर्वदूर सुळसुळाट झालेला असताना, राहुल यांना ओबामांनी प्रामाणिक कळकळ असलेला आणि स्मार्ट, उमदा नेता म्हणावे, हे महत्त्वाचे आहे.

बाकी, ओबामा कुटुंबीय भारतात आलेले असताना, त्या ‘डिनर’च्या वेळी मनमोहन सिंग ७८ वर्षांपेक्षा अधिक थकलेले वाटत होते, अशी निरीक्षणे त्या त्या वेळची आणि अध्यक्षांपेक्षाही लेखकाची अधिक असतात. उलटपक्षी, मनमोहन अथवा सोनिया यांच्या क्षमतेविषयी ओबामा कुठेही संदिग्ध नाहीत.

पुस्तक नीट वाचल्यावर लक्षात येते, ते चर्चेपेक्षा वेगळेच. मनमोहन आणि ओबामा यांच्यातील बंध जाणवतात. दोघांनी एकूण मानवी समुदायाबद्दल चर्चा केलेली दिसते. मोठ्या कठीण काळात हे दोघेही आपापला देश चालवत होते. ते ‘शेअरिंग’ दोघांनी केले. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सुधारणांविषयी ओबामा कौतुकाने बोलतात.

‘महात्मा गांधींच्या पायाशी बसून, मला त्यांच्याकडून धैर्य घ्यायचे आहे,’ असे म्हणतानाच, ‘गांधींचा हा देश धर्मवाद्यांच्या, जातीयवाद्यांच्या, हिंसक लोकांच्या तावडीत तर सापडणार नाही ना,’ अशी चिंता ओबामा व्यक्त करताहेत. तसे या पुस्तकात थेटपणे सांगताहेत. ओबामा पहिल्यांदा भारतात आले, तेव्हा त्यांनी ‘मणीभवन’ला भेट दिली होती. तो संदर्भ या पुस्तकात येतो.

“डॉ. मनमोहन सिंग दुसऱ्यांदा निवडून आले. कारण, त्यांनी लोकांना भावनिक आवाहन केले नाही, तर लोकांच्या जगण्याचा स्तर उंचावला,’ असेही ओबामा या पुस्तकात नमूद करतात. “डॉ. सिंग हे असामान्य समंजसपण असलेले, कमालीचे सुसंस्कृत, सभ्य नेते वाटले,’ असे म्हणतानाच, डॉ. मनमोहन हे भारतीय लोकशाहीचे प्रतिनिधित्व करतात की सन्माननीय अपवाद म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे,’ असेही ओबामा विचारतात. त्यांना राहुल यांची आणि काँग्रेसची चिंता का वाटते, हे म्हणून समजून घेतले पाहिजे. ओबामांनी लिहिलेले महत्त्वाचे वाक्य हे आहे, ज्यावर कोणी बोलत नाही. ते वाक्य असे - “आपल्या आईने ठरविलेले जीवनध्येय पूर्ण करतानाच, भाजपने निर्माण केलेल्या विभाजनवादी राष्ट्रवादावर मात करत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व टिकवून ठेवणे राहुल यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्याला जमेल का?” असे ओबामा म्हणताहेत.

‘धर्मांध राजकारणाने विभाजनवादी राष्ट्रवादाला जन्म दिला. गांधींच्या या देशाचे धार्मिक आधारावर विभाजन केले. ते या देशासमोरचे महत्त्वाचे आव्हान आहे. कर्तबगार नेते असलेले डॉ. मनमोहन सिंग थकलेले आहेत. सोनियांना ही धुरा राहुल यांच्याकडे द्यायची आहे. राहुल अभ्यासू आहेत. पण, ‘नर्व्हस’ आहेत. स्वाभाविक कल किंवा पॅशन यात ते कमी पडताहेत. पण, ते स्मार्ट, देखणे, प्रामाणिक आणि कळकळ असलेले नेते आहेत. त्यांना हे आव्हान पेलेल का?’ … ओबामांनी जे लिहिले आहे, त्याचा खरा भावानुवाद हा आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वीच ओबामांना ही चिंता वाटत होती, हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. मनमोहन सिंगांनाही तीच काळजी होती. ओबामा आणि डॉ. मनमोहन एका बोटीत होते. या पुस्तकासंदर्भातील बातमीत महत्त्वाचे वाक्य असे असायला हवे होते - ‘विभाजनवादी, धर्मांध राजकारणाला तोंड देणे राहुल यांच्या काँग्रेसला झेपेल का?,’ अशी चिंता अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केली आहे.

बातमी झाली भलतीच!

बातम्या आणखी आहेत...