आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तासंघर्षात कोर्टच 'सुप्रीम'!:चिन्ह गोठवल्यास काय होईल? नवीन पक्षाची नोंदणी करावी लागेल? तज्ज्ञांकडून समजून घ्या...

विश्वास कोलते25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमधील न्यायालयीन संघर्षात बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे आता या संघर्षातील पुढच्या टप्प्यातील या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संघर्षात न्याायलयाच्या निर्णयावरच सर्वकाही अवलंबून असले तरी निवडणूक आयोगाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. त्यावरच शिवसेना कुणाची या प्रश्नाचे उत्तर अवलंबून असणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवले तर काय होऊ शकते? अशा स्थितीत कुणाला नवीन पक्षाची नोंदणी करावी लागेल?याविषयी दिव्य मराठीने घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट आणि विधीमंडळाचे माजी मुख्य तसेच सचिव डॉ. अनंत कळसे यांच्याशी संवाद साधून काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रश्न - या शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमधील संघर्षात निवडणूक आयोगाकडून काय निकाल दिला जाऊ शकतो?
प्रा. उल्हास बापट -
असं आहे की, 16 आमदार अपात्र ठरतील की नाही, यावरच सर्व अवलंबून आहे. यात एकनाथ शिंदेही आहेत. त्यामुळे ते जर अपात्र ठरले तर नवीन कायद्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्री राहताच येत नाही. त्यामुळे सरकारच पडेल. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की, निवडणूक आयोगाने निर्णय देऊच नये. आयोगाला त्यांची प्रक्रिया सुरूच ठेवता येईल पण निर्णय देता येणार नाही. चिन्ह गोठवताही येणार नाही.
यात आणखी दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे राज्यपालांचे अधिकार काय आहेत? आणि दुसरा म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याचा अर्थ काय आहे?
अशा पद्धतीने बाहेर पडून विधानसभेत जाऊन आम्हीच शिवसेना आहोत असे म्हणायचे. असं त्यांना म्हणता येईल असं मला वाटत नाही. कारण राज्यघटनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मूळ राजकीय पक्ष उद्धव ठाकरेंकडे आहे. आणि विधीमंडळ पक्ष शिंदेंकडे आहे.
पक्षांतरबंदी कायदा हा मूळ राजकीय पक्षाला लागू होतो, त्यामुळे त्यांनी अपात्र केल्यास हे 16 आमदार अपात्र होतात असे मला वाटते. यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे आता बघावे लागेल.

प्रश्न - आयोगाने जर चिन्हच गोठवले तर काय होईल?
प्रा. उल्हास बापट -
चिन्ह गोठवले तर उद्धव ठाकरेंचे नुकसान होईल हे उघड आहे. पण तो राजकीय भाग झाला. हा राजकीय प्रश्न आहे. मी घटनात्मक बाबींवरच बोलू शकतो.

हाच प्रश्न आम्ही विधीमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉ. अनंत कळसे यांनाही विचारले. त्यांनी काय म्हटले आहे तेही पाहा...

प्रश्न - निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला तर याचा उद्धव ठाकरे आणि शिंदे गटावर काय परिणाम होऊ शकतो?
डॉ. अनंत कळसे -
यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ सिम्बॉल अॅक्ट आणि 1968 च्या इलेक्टोरल सिम्बॉल नियमांत याबद्दल तरतूदी आहेत. मला आठवते की 1969 मध्ये काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली होती आणि सिंडीकेट, इंडिकेट झाले होते तेव्हा इंदिरा काँग्रेसला गाय-वासरू हे चिन्ह देण्यात आले होते आणि सिंडीकेट काँग्रेसला माझ्या माहितीप्रमाणे नांगरधारी शेतकरी हे चिन्ह देण्यात आले. त्यावेळीही आयोगाने दोघांसमोरही तीन तीन चिन्हांचा पर्याय ठेवला होता. यातून एखादे चिन्ह निवडण्यास आयोगाने तेव्हा सांगितले होते. त्यामुळे जर आताही शिवसेनेचे चिन्ह गोठवले तर हाच पर्याय आयोगाकडून दोघांसमोर ठेवला जाऊ शकतो. अशाच प्रकारच्या तरतूदी आहेत.

प्रश्न - अशा स्थितीत मग मूळ शिवसेना कुणाची असू शकते?
डॉ. अनंत कळसे -
सध्याच्या परिस्थितीत हे संपूर्णपणे सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे. कारण न्यायालयाने आयोगाला 27 तारखेपर्यंत यावर कसलाही निर्णय घेऊ नका असे स्पष्ट सांगितले आहे. या प्रकरणाशी निगडीत इतरही प्रश्न सध्या घटनापीठासमोर आहेच. त्यामुळे घटनापीठाच्या पुढच्या सुनावणीत याविषयी निर्णय लागू शकतो.

प्रश्न - असे झाल्यास कुणाला नवीन पक्षाची नोंदणी करावी लागणार?
डॉ. अनंत कळसे -
सध्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयावरच सर्व बाबी अवलंबून आहेत. त्यामुळे जर शिवसेनेचे चिन्ह गोठवले तर कुणाला नव्या पक्षाची नोंदणी करावी लागेल हे आताच सांगणे कठीण आहे. तसे बघितल्यास शिवसेना पक्ष आधीच नोंदणीकृत असल्याने असे झाले तर केवळ शिंदे गटासमोर हा प्रश्न उभा राहू शकतो.

डॉ. अनंत कळसे यांनी सांगिलेल्या 1969 मधील काँग्रेसच्या फुटीदरम्यान काय झाले होते तेही पाहूया...
1969 मध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये फुट पडली होती तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर इंदिरा गांधींनी काँग्रेस-आरची स्थापना केली. यावेळी निवडणूक आयोगाने काँग्रेस-आर आणि काँग्रेस-ओ या दोन्ही काँग्रेसला प्रत्येकी तीन चिन्हांचा पर्याय दिला होता. यापैकी एका चिन्हाची निवड दोन्ही पक्षांना करायची होती. यावेळी काँग्रेस-आरला गाय-वासरू हे चिन्ह मिळाले होते.

बातम्या आणखी आहेत...