आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • What Is 'Dokhmenashini'? | How Exactly Funeral Performed In Parsi Community | Is Still Same Way? Know All

'दोखमेनाशिनी' म्हणजे काय?:पारशी समुदायात नेमका कसा होतो अंत्यविधी; आजही तशाच पद्धतीने केला जातो का? जाणून घ्या सर्व

प्राची पाटील। औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका रस्ते अपघातात निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, पारशी समाजाची 'दोखमेनाशिनी' ही अंत्यसंस्काराची परंपरा अतिशय वेगळी आहे. त्यांच्यात ना मृतदेह जाळतात, ना दफन केले जाते. ही परंपरा नेमकी आहे तरी काय, सांगताहेत मुंबईतल्या अथॉरनॉन इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपल डॉ. रामियार करंजीया...

सहाव्या शतकामध्ये पर्शियामध्ये स्थापन झालेला पारशी धर्म. याची स्वतंत्र अशी विचार प्रणाली आहे. जगात मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे. मृत्यूनंतर माणसाच्या शरीराला नष्ट केले जाते. त्यासाठी हिंदू धर्मात मृतदेह जाळला जातो, तर मुस्लिम धर्मीय मृतदेहाचे दफन करतात. या दोन पद्धतींव्यतिरिक्त एक तिसरी पद्धतही अस्तित्वात आहे. ज्याविषयी फारशी कुणाला कल्पना नाही.

'दोखमेनाशिनी' म्हणजे काय?

पारशी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला 'दोखमेनाशिनी' असे म्हणतात. व्यक्तीचे निधन झाल्यावर मृत व्यक्तीचे शरीर 'दोखमेनाशिनी'साठी एकांतात नेले जाते. याठिकाणी व्यक्तीच्या मृत शरीराला गिधाडांसाठी सोडले जाते. मात्र, सध्या कमी झालेली गिधाडांची संख्या पाहता काही पक्ष्यांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.

पारशी समाजाचा इतिहास

पारशी लोक दहाव्या शतकात पर्शियामधील इस्लामी राज्यवटीकडून सुरू असलेल्या छळापासून सुटका करण्यासाठी स्थलांतर करून भारतात स्थायिक झाले. भारताच्या इतिहासात अनेक पारशी लोकांना विशेष स्थान आहे. व्यापार ही पारशी लोकांची अंगभूत कला असल्यामुळे आजवर भारतात अनेक यशस्वी पारशी उद्योगपती होऊन गेले. भारतीय जनगणनेनुसार पारशी लोकांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. स्वातंत्र सैनिकांपासून ते उद्योजकांपर्यंत पारश्यांचेही येगदान आहे.

3 हजार वर्षांपासूनच्या प्रथा

पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या प्रार्थनास्थळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्त्वे हा फारशी विचारसरणीचा गाभा आहे. पारसी धर्मात 3 हजार वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. यात अंत्यसंस्काराची प्रथा इतर धर्मियांपेक्षा वेगळी आहे.

नेमकी काय आहे प्रथा?

दिव्य मराठीने पारशी धर्माच्या अंत्यसंस्कार परंपरेविषयी दादर अथॉरनॉन इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपल डॉ. रामियार करंजीया यांच्याकडून जाणून घेतले. डॉ. रामियार करंजीया म्हणाले, आमच्या धर्मात ही 100 वर्षे जुनी परंपरा आहे. अंत्यसंस्काराची जी प्रथा आहे ती इराणपासून सुरू झाली. त्यानंतर भारतात आल्यानंतर देखील पुढे हीच प्रथा कायम ठेवण्यात आली. ज्या जागी हे अंत्यसंस्कार होतात त्या जागेला 'टॉवर ऑफ साइलेन्स' असे म्हटले जाते. याला छत नसते. आणि हे उंचीवर असल्यामुळे याला 'डुंगरवाडी' देखील म्हणतात.

'टॉवर ऑफ साइलेन्स' कसे असते?

डॉ. रामियार करंजीया म्हणाले, सर्वप्रथम माणूस मृत झाल्यानंतर त्याला शेवटची अंघोळ घातली जाते. त्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घातले जातात. मृतदेहाला मार्बल्स स्टोन्सवर ठेवून प्रार्थना केली जाते. त्यानंतर लोखंडी स्ट्रेचरवरून 'टॉवर ऑफ साइलेन्स'ला नेले जाते. याठिकाणी केवळ विशेष स्वंयसेवकांना परवानगी असते. नातेवाईक आत जाऊ शकत नाहीत. आतमध्ये स्टेडियमसारखी रचना असते. मधोमध एक कोरडी विहीर असते. मुंबईतील 'टॉवर ऑफ साइलेन्स'मध्ये एकावेळी 150 मृतदेह ठेवण्याची क्षमता असते. असे 3 'टॉवर ऑफ साइलेन्स' मुंबई शहरात आहेत.

90 टक्के लोक पारंपरिक पद्धत अवलंबतात

डॉ. रामियार करंजीया म्हणाले, सायरस मिस्त्री यांच्यावर या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार केले गेले नाहीत. मात्र, त्यांचे वडील पालनजी मिस्त्री यांचे 3 महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पारशी पद्धतीने करण्यात आले होते. आमच्यात 90 टक्के लोक पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करतात. तर 10 टक्के लोक सामान्य पद्धतींचा अवलंब करताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे तर गुजरातमध्ये सर्वाधिक ठिकाणी अहमदाबाद, बडोदा आदी शहरांमध्ये 'टॉवर ऑफ साइलेन्स' आहेत.

अंत्यसंस्कार असेच का?

डॉ. रामियार करंजीया म्हणाले, शरीर आणि आत्मा हे मृत्यूनंतर वेगवेगळे होतात. या दोघांप्रति आपली एक जबाबदारी आहे. शरीर हे नश्वर आहे. त्यामुळे शरीरामुळे इतर जीवीतांना नुकसान व्हायला नको. याच कारणामुळे अशाप्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. यामुळे निसर्गाची हानी होत नाही. इतर जीवीत यावर पोसले जातात.

अंत्यसंस्कारासमोरील अडचणी

अलीकडील काळात गिधाडांची संख्या विलक्षण वेगाने कमी झाली आहे. एका अंदाजानुसार येत्या काही वर्षांत आशियाच्या काही देशांतील 99 टक्के गिधाड नष्ट होतील. एका रिपोर्टनुसार, राजस्थानच्या केवलादेव नॅशनल पार्कमधील गिधाडांची संख्या 1986 मधील 816 वरून 1999 मध्ये 25 वर आली होती. गिधाडांची घटती संख्या ही मोठी अडचण पारशी धर्मियांच्या पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी येत आहे.

सोलर पॅनलद्वारे अंत्यसंस्काराचा पर्याय

पारंपरिक अंत्यसंस्काराला पर्याय म्हणून मुंबईतील बॉम्बे पारशी पंचायतकडून सोलर पॅनलद्वारे अंत्यसंस्काराच्या पद्धतीला सुरुवात करण्यात आली आहे. सप्टेंबर 2015 पासून पारशी समुदायातील अनेक कुटुंबांनी अंत्यसंस्कारासाठी या नव्या पद्धतीचा अवलंब केला आहे. गिधाडांच्या घटत्या संख्येमुळे पारशी समुदायातील सुधारणावादी लोकांनी सौर पॅनलचा पर्याय निवडला. यात सोलर पॅनलच्या ऊर्जेने मृतदेह हळूहळू जळून राख होतो.

जगात दीड लाख पारशी

आकडेवारीनुसार जगभरात केवळ दीड लाखाच्या आसपास पारशी समुदायाची लोकसंख्या आहे. यापैकी सुमारे 60 हजार पारशी हे मुंबईत राहतात. हे पारशी अंदाजे दहाव्या शतकात पर्शियातून भारतात स्थलांतरित झाले. मुंबईत पारशींची संख्या जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...