आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कडक लॉकडाऊन सुरू असताना मे महिन्यात परप्रांतीय मजुरांसोबत साठवर्षीय विठाबाईदेखील झारखंडला गेली होती. घरच्यांना याची काहीच कल्पना नव्हती. सहा महिने झाले तरी विठाबाईचा पत्ता लागला नव्हता. “कोरोनाच्या साथीत गेली, अशी मनाची समजूत घातली होती. मात्र, प्रशासनाने विठाबाईला झारखंडमधून आणल्यामुळे जणू तिचा पुनर्जन्मच झालाय,’ अशी भावना व्यक्त करत विठाबाईचे पती बाबूराव कुंबफळे यांना आनंदाश्रू आले. मंगळवारी दुपारी ३ वाजता विठाबाई आपल्या घरी पोहोचली. कोळघर (ता. औरंगाबाद) येथील विठाबाई थोड्याशा भोळसर आहेत. लॉकडाऊनमध्ये करमाड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात काम करणारे मजूर खासगी बसने औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आले. या मजुरांच्या गर्दीत विठाबाईदेखील आली आणि मजुरांबरोबरच थेट झारखंडला पोहोचली. तिथे क्वाॅरंटाइन सेंटरला तिला थांबवण्यात आले होते. मात्र क्वाॅरंटाइन कालावधी संपल्यावर इतर मजूर जसे आपापल्या घरी गेले, तशी विठाबाई सेंटरमधून बाहेर पडत नव्हती. विठाबाईला हिंदी भाषा कळत नसल्याने मोठी अडचण झाली. त्यानंतर तिला लाटेहार जिल्ह्यातील एका गुरुकुलमध्ये हलवण्यात आले आणि तेथे तब्बल ६ महिने राहिली.
औरंगाबाद प्रशासनाची मदत :
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, तहसीलदार किशोर देशमुख, तलाठी अशोक काशीद यांनी ही महिला विठाबाईच असल्याची खात्री केली. व्हिडिओ कॉल करून तिच्या नातेवाइकांनाही ओळखायला लावले.
प्रयाग अक्काला पाहण्यासाठी गर्दी :
विठाबाईंना गावात प्रयागअक्का म्हणून ओळखतात. मंगळवारी दुपारी ३ वाजता प्रयागअक्का गावात आली, हे कळल्यावर गावातील अनेक महिला त्यांच्या घराकडे आल्या. सहा महिन्यांनंतर पत्नीला पाहून बाबूराव कुंबफळे यांनाही आनंदाश्रू अनावर झाले. आता विठाबाईला कुठेही जाऊ देणार नाही आणि तिचा चांगला सांभाळ करणार, असे तिच्या पतीने सांगितले.
झारखंडमधील अधिकाऱ्यांची माणुसकी
विठाबाई महाराष्ट्रातून आपल्या राज्यात आलीय, ही माहिती लाटेहारच्या समाजकल्याण अधिकारी प्रीती सिन्हा यांनी उपायुक्त अबू इम्रान यांना दिली. विठाबाई तीन वेळा अधिकाऱ्यांची नजर चुकवून गुरुकुलमधून भरकटली होती. मात्र, तीनही वेळा तिला शोधून सांभाळण्याचे काम तेथील अधिकाऱ्यांनी केले.
निघताना ओटी भरली; फळ, मिठाई आणि पैसेही दिले
विठाबाईला आणण्यासाठी कोळघरचे सरपंच परमेश्वर तुपे, पोलिस पाटील अनिल वावरे आणि विठाबाईचा मुलगा पांडुरंग कुंबफळे हे गुरुवारी महसूल विभागाच्या खर्चाने एक खासगी वाहन घेऊन झारखंडला रवाना झाले. तिथे पोहोचल्यानंतर यांना पाहताच विठाबाईला आनंदाश्रू अनावर झाले. ज्यांनी सहा महिने विठाबाईला व्यवस्थित सांभाळले, त्या समाजकल्याण अधिकारी प्रीती सिन्हा, उपायुक्त अबू इम्रान हेदेखील भावुक झाले. निघताना सिन्हा यांनी विठाबाईंची साडी-चोळी देऊन ओटी भरली. फळे, पाण्याच्या बाटल्या दिल्या. तर उपायुक्त इम्रान यांनी एका बंद लिफाफ्यात विठाबाईला दीड हजार रुपये दिले आणि त्यांना महाराष्ट्राकडे रवाना केले. विशेष म्हणजे कोळघरला पोहोचेपर्यंत सिन्हा आणि इम्रान यांनी सतत फोन करून माहिती घेतल्याचे पोलिस पाटील वावरे, सरपंच तुपे यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.