आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:कुठं नेणार हे ‘इन्फो वॉर’?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आणि त्यानंतर अदानी समूहाची झालेली मोठी हानी यांमुळे ‘इन्फो वॉर’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वास्तविक हे दोन कॉर्पोरेट जायंट्समधलं युद्ध असलं, तरी सामान्य लोक, गुंतवणूकदार यांच्या मनात संभ्रम निर्माण करणे, हा भाग त्यात होताच. इन्फर्मेशन ओव्हरलोडच्या या जगात अलीकडे अशी ‘इन्फर्मेशन वॉर’ सतत घडत आहेत. त्यांचा सामान्य लोकांवरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याने त्याविषयी प्रत्येकाने सजग असले पाहिजे.

हिं डेनबर्ग रिसर्च नावाच्या एका अमेरिकन कंपनीने भारतीय उद्योजक आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांच्याबद्दल काही संशोधनात्मक माहिती प्रसिद्ध केली आणि त्यानंतर भारतीय शेअर बाजारात एकच दाणादाण उडाली. हिंडेनबर्ग रिसर्चचा कथित अहवाल प्रसिद्ध झाल्यावर गुंतवणूकदारांनी झपाट्याने आपले शेअर विकण्यास सुरुवात केल्याने अदानींच्या कंपन्यांचे शेअर अक्षरशः ‘न भूतो’ असे कोसळले. एकाच दिवसात अदानींच्या संपत्तीत ६.५ अब्ज डॉलरची घट झाली. इतकंच नव्हे, तर फोर्ब्जच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार आता ते जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्यावरुन २२ व्या स्थानावर गेले आहेत. शनिवारअखेर अदानी ग्रुपच्या संपत्तीत तब्बल ९ लाख कोटी रुपयांची घट झाली. ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर शेअर बाजारात जो हाहाकार माजला, तेवढ्यापुरती ही घटना मर्यादित नाही. या अहवालानंतर त्याची जागतिक पातळीवर झालेली चर्चा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातून सुरू झालेलं माहितीचं युद्ध अर्थात ‘इन्फो वॉर’ एवढी मोठी उलाढाल घडण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे.

माहितीचं अत्यंत वेगवान प्रसारण करून त्यातून आपला हेतू साध्य करण्याचे प्रकार अनेक देश, कॉर्पोरेट कंपन्या आणि बलाढ्य उद्योगपती अनेकदा करतात. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या आणि अजूनही निर्णायक निकाल न लागलेल्या रशिया - युक्रेन युद्धादरम्यानही हे ‘इन्फो वॉर’ ठळकपणे घडत होतं. अद्ययावत तंत्रज्ञान व वेगवान प्रसारण क्षमता असलेल्या इंटरनेटचा वापर करून लढलं जाणारं हे वेगळ्या प्रकारचं युद्ध आहे. त्यामुळं या ‘इन्फर्मेशन वॉरफेअर’चे परिणाम काय होऊ शकतात, त्यातून कोणते सामाजिक धोके उद्भवू शकतात आणि त्याचा सामना करण्यासाठी काय करता येऊ शकतं, याचा ऊहापोह करणं आवश्यक आहे.

राजकीय चर्चांमध्ये ‘प्रपोगंडा’ हा शब्द आपण अनेकदा ऐकला आहे. राजकारणासाठी हा शब्द नवीन नाही. हिटलरच्या मंत्रिमंडळात जोसेफ गोबेल्स नावाचा एक नेता ‘मिनिस्टर ऑफ प्रपोगंडा’ म्हणून काम पाहत होता, हे सर्वज्ञात आहे. पुढे याच गोबेल्सच्या काम करण्याच्या पद्धतीवरून ‘गोबेल्स नीती’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. गोबेल्सच्या आधी अमेरिकन सरकारने जॉर्ज क्रील यांच्या अध्यतेखाली ‘कमिटी ऑन पब्लिक रिलेशन’ नावाची समिती नेमली होती. सरकारकडूनच लोकांचे मत बनवण्यासाठी या समितीचा उपयोग झाला. अमेरिकन कसे श्रेष्ठ आहेत, इतर देश कसे दुय्यम आहेत, जर्मनी कशा पद्धतीने अमेरिकेच्या साधनसंपत्तीवर कब्जा मिळवू पाहत आहे, अशा विविध बाजूंनी प्रपोगंडा करण्याची पद्धत अमेरिकन सरकारने विकसित केली होती. लोकांची विचारशक्ती कमकुवत करणे हासुद्धा त्यामागचा उद्देश होता. जागतिक पातळीवर अनेक युद्धांत, विशेषतः शीतयुद्धादरम्यानही माहितीचे असे विपर्यस्तीकरण व्हायचे. युद्धे जमिनीवर लढली जायची, तशीच ती अशा माहितीच्या आधारेही लढली जात होती. परंतु, अशी माहिती पसरवण्याला काही तांत्रिक मर्यादा होत्या. आजच्यासारखी वेगवान प्रसारणाची साधनं त्या काळी उपलब्ध नव्हती.

काळ बदलत गेला. गेल्या शतकाच्या शेवटी संगणक आणि इंटरनेट या मानवी जीवन आमूलाग्र बदलवणाऱ्या दोन गोष्टी जगाच्या क्षितिजावर अवतरल्या. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला तर इंटरनेटच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे माहिती तंत्रज्ञानाचे आयामच संपूर्णपणे बदलवून टाकले. अविश्वसनीय वेगाने माहितीचं प्रसारण होऊ लागलं. जगाच्या एका टोकाला घडणाऱ्या घटनेची माहिती काही क्षणांमध्ये दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवणं शक्य झालं. या बदलाचे अनेक मानवोपयोगी परिणाम झाले, यात शंका नाही. पण, सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असलेल्या प्रपोगंडा नावाच्या शास्त्राने आता वेगवान इंटरनेटच्या विश्वात रौद्ररूप धारण केलं. शत्रुदेशाला नामोहरम करण्यासाठी, देशांतर्गत राजकारणात आपल्या विरोधी पक्षाबद्दल लोकांत नाराजी, रोष पसरवण्यासाठी, कॉर्पोरेट विश्वात आपल्या स्पर्धकाविषयी संदिग्धता निर्माण करण्यासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर होऊ लागला.

इन्फर्मेशन वॉरफेअरची ही सुरुवात होती. अमेरिकेतील २०१६ च्या निवडणुकीवेळी झालेल्या ‘फेसबुक - केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ घोटाळ्यामुळे मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांकडे असलेली लोकांची खासगी माहिती राजकीय उद्देशांसाठी किती सहजपणे उपलब्ध होऊ शकते, याचं सत्य जगासमोर आलं. रशिया-युक्रेन युद्धात तर ‘माहिती” हा युद्धाचा अविभाज्य भाग बनला. जगाच्या इतिहासात टीव्हीवर सर्वाधिक काळ दाखवले गेलेले युद्ध म्हणून त्याकडे पाहता येईल. रशियाच्या माहिती युद्धामध्ये डिप फेक टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. म्हणजे कॉम्प्युटरच्या मदतीने तयार केलेली खोटी ऑपरेशन्स, जी प्रत्यक्ष झालेली नाहीत, ती सतत दाखवत राहायची. रशिया आपल्यावर हल्ला करू शकतो, असे भयाचे वातावरण युक्रेनच्या लोकांमध्ये तयार करायचे जेणेकरुन ते आपल्या देशाच्या सरकारविरोधात जातील, असा त्याचा उद्देश होता. परंतु, याचा उलटा परिणाम झाला आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हे देशाचे हीरो बनले. डिप फेक टेक्नॉलॉजीमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून खोटी चित्रे, ग्राफिक्स, विविध विषयांवर लेख, फोटो टाकले जातात. युद्धाची माहिती मिळवण्यासाठी माध्यमे शोध घेत असतात. त्यांना प्रचंड प्रमाणात अशी माहिती मिळते. हीच माहिती जगभरात प्रसारित केली जाते आणि त्यातून तयार होतं ते ‘परसेप्शन’! जनतेत असे परसेप्शन तयार करणे किंवा आपल्याला हवं ते आकलन करण्यासाठी लोकांना भाग पाडणे, हा माहितीच्या युद्धाचा अपेक्षित परिणाम असतो. तो ज्या बाजूच्या लोकांना साधला जातो, त्यांचा या युद्धात विजय होतो. पण, हे युद्ध जिंकण्यासाठी सत्यासत्यतेचा कोणताही पडताळा न करता प्रसारित करण्यात आलेली माहिती, बातम्या, ब्रेकिंग न्यूज भीतीचं वातावरण निर्माण करतात. या माहितीचा समाजमनावर अत्यंत विपरीत परिणाम होतो.

इंटरनेटने जग जवळ आणलं, असं आपण म्हणतो. परस्परसंवाद घडवून आणण्याची प्रचंड ताकद असलेल्या या तंत्रज्ञानाने मानवी जीवन प्रभावित केलं आहे. परंतु, त्यातून संपूर्ण मानवजातीसमोर काही अभूतपूर्व आव्हानेही उभी राहिली आहेत. इन्फर्मेशन वॉर आणि त्यातून उद्भवलेले धोके हा त्याचाच एक भाग. फेक न्यूज, द्वेष पसरवणाऱ्या बातम्या, डीप फेकसारख्या तंत्राचा वापर करून तयार झालेले व्हिडिओ ही सगळी या युद्धात वापरली जाणारी शस्त्रे आहेत. यांपासून दूर राहण्यासाठी सामान्य माणसाने काय करावं, हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्यापर्यंत जी माहिती सतत पोहोचत असते, ती वाचताना, पाहताना आणि पुढे पाठवताना सजग असणं हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आपल्यापर्यंत आलेली प्रत्येक माहिती खरी नसते, हे लक्षात आल्यानंतर त्यातील खोटेपणा ओळखणं फारसं अवघड नसतं. मुळात सजगता नसेल तर बातमीबद्दल शंकाच उपस्थित होत नाही.

ही सजगता प्रत्येकाने स्वतःमध्ये आणणं अत्यावश्यक आहे. संशय आणि शंकेला जागा ठेवूनच कोणतीही बातमी वा माहिती स्वीकारायला हवी. त्यासाठी फेक न्यूजचा पर्दाफाश करणाऱ्या वेबसाइट्सना भेटी द्याव्या लागतील. माहितीचा स्रोत कोणता, हे तपासून घ्यावं लागेल. कोणतेही तंत्रज्ञान कायमस्वरूपी नसते. त्यात बदल होत असतात. या बदलत्या स्वरूपानुसार त्याच्या वापरामागील हेतूमध्येही बदल होत असतो. किंबहुना, वापरकर्ता त्याच्या सोयीने त्याचा वापर करत असतो. त्याचा त्यामागचा उद्देश सकारात्मक की नकारात्मक आहे, हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं आभासी जगात रमण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत: अधिकाधिक वास्तवाच्या जवळ जाणं, सकारात्मक आणि सजग राहणं हाच इन्फर्मेशन वॉर रोखण्यासाठीचा सर्वात प्रभावी मार्ग ठरू शकतो.

प्रतीक कोसके pratikkoske@gmail.com

बातम्या आणखी आहेत...