आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीतच प्रवेश का? काँग्रेस, शिवसेना का नाही?

दीपक पटवे निवासी संपादक, जळगाव2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

भारतीय जनता पक्षाने एकनाथ खडसे यांच्यासाठी सर्व दरवाजे बंद केल्यामुळे खडसे यांना अन्य पक्षात जाण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. पण तो निर्णय घेताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पर्याय का निवडला असेल? शिवसेना आणि काँग्रेस हे त्यांना पर्याय का वाटले नाहीत? याकडे आधी थोडा दृष्टिक्षेप टाकूया. खडसे हे राज्य पातळीवरचे प्रभावी नेते आहेत या बद्दल शंका नाही. पण हे मोठेपण पाय मजबूत जमिनीवर रोवलेले असतील तरच टिकते, हे त्यांनी अनेक नेत्यांच्या बाबतीत जवळून अनुभवले आहे. त्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावरची गेल्या ३० वर्षांपासूनची पकड त्यांना सैल होऊ द्यायची नसेल. हा मतदारसंघ युतीच्या काळात भाजपकडे आहे. तरीही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले चंद्रकांत पाटील त्यांना सतत विरोध करीत आले आहेत. आज राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपतील फितूर गटाच्या मदतीने तेच चंद्रकांत पाटील आमदार झाले आहेत. भाजपच्या नेत्यांनीच खडसे यांच्या मुलीचा तिथला पराभव घडवून आणला आहे असा त्यांचा आरोप आहे आणि त्याचे पुरावेही त्यांच्याकडे आहेत. ३० वर्षांनंतर झालेला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे तिथे पुन्हा निवडून येणे हे त्यांचे लक्ष्य असेल. मग त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर ते त्यांच्या कन्येला, रोहिणी खडसे यांना तिथून उमेदवारी मिळवतील आणि यावेळी (२०१९) झालेल्या पराभवाचा वचपा काढतील. पुढच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची पुन्हा युती झालीच तर भाजपच तिथे उमेदवार देईल हे उघड आहे. त्यामुळे शिवसेनेत जाऊन फायदा नाही. जर युती झाली नाही आणि सध्याची आघाडी कायम राहीली तरी इतक्या वर्षांपासून तिथे उमेदवार देत असल्यामुळे आणि काँग्रेस, शिवसेनेने तिथून कधीच उमेदवार दिलेला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच वाटेला तो मतदारसंघ येईल. समजा युती झाली नाही आणि आघाडीही निवडणुकीच्या वेळी टिकली नाही तरी निवडणूक लढवायला कोणता तरी पक्ष लागतोच. काँग्रेस का निवडला नसेल, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीतही तो वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहात आला आहे. त्यामुळे काँग्रेसचे तिथे काहीही अस्तित्व नाही. या वयात शुन्यापासून सुरुवात कोण करेल? केली तरी काँग्रेसने तो राष्ट्रवादी काँग्रेसलाच सोडला तर काय उपयोग, असा विचार खडसे यांनी केला असावा. मुक्ताईनगरच्या बाहेर प्रभाव दाखवायचा तर राज्यातल्या ज्या ज्या मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे ते बहुतांश मतदारसंघ भाजपकडे आहेत आणि तिथे प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीच आहे. काँग्रेसचे अस्तित्व तिथे कमी आहे. त्यामुळे तिथे प्रभाव दाखवायचा तर राष्ट्रवादीसारखा अस्तित्वात असलेला पक्षच उपयोगाचा आहे, हे त्यांचे गणित असावे.

हेच सुत्र राष्ट्रवादी काँग्रेससाठीही लागू पडते. आतापर्यंत भाजपच्या विरोधात लढताना जिथे त्यांना विजय मिळवणे शक्य झाले नाही तिथे विजयाची शक्यता वाढू शकते. जळगाव जिल्ह्यात तरी असे पाच ते सहा मतदारसंघ आहेत. जिथे केवळ दोन आमदारांच्या उणिवेमुळे राष्ट्रवादी शिवसेनेपेक्षा लहान पक्ष ठरला तिथे पाच-सहा आमदारांचे काय मूल्य असू शकते, हे सांगायची गरज नाही.

गुणवंत सरोदे, वाय.जी. महाजन, हरिभाऊ जावळे ही लेवा पाटील समाजातील खासदार झालेली मंडळी. त्यांच्यामुळे आणि पुढे एकनाथ खडसे यांनी केलेल्या कामामुळे जळगाव जिल्ह्यातील लेवा समाज मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाबरोबर राहिला आहे. बुलढाण्याचाही त्यात समावेश करता येईल. आधी मधुकरराव चौधरी, वाय.एस. महाजन यांच्या प्रभावामुळे हा समाज काँग्रेसबरोबर होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळविण्याचे प्रयत्नही फारसे झाले नाहीत आणि तो समाज वळालाही नाही. आता खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गठ्ठा मते मिळण्याची आशा निर्माण झाली असेल तर ते अनपेक्षित मुळीच नाही. लेवाच नाही तर गुर्जर समाजही मोठ्या संख्येने खडसे यांचा समर्थक आहे. विशेषत: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरात त्यामुळेच खडसे यांच्या समर्थकांची संख्या आश्चर्य वाटावी इतकी आहे. छगन भुजबळ यांच्या माध्यमातून माळी आणि इतर ओबीसी समाज राष्ट्रवादीशी जोडण्याचे काम शरद पवार यांनी केलेले आहेच. त्यात लेवा समाजाची भर घालण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.

बातम्या आणखी आहेत...